व्यावसायिकांना ‘प्लॅटफॉर्म’ देण्यासाठी झटणारा ‘केदार’

    01-Oct-2023   
Total Views |
Article On Entrepreneur Kedar Padhye

मराठी माणूस उद्योगात यायचे म्हटलं की, जरा विचारच करतो. आपल्या अनुभवांचा फायदा इतरांना व्हावा, यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम डोंबिवलीकर केदार पाध्ये करीत आहेत, त्यांच्याविषयी...

मराठी माणूस उद्योगात यायचे म्हटलं की, जरा विचारच करतो. पण, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले, तर तोही व्यवसायात योग्यरित्या भरारी घेऊ शकतो. ‘कोविड’ काळातही अनेक उद्योजकांना फटका बसला. आपल्याकडे असलेल्या अनुभवांचा फायदा इतर उद्योजकांना व्हावा, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम डोंबिवलीकर केदार पाध्ये करीत आहे.

केदार यांचे मूळगाव लांजा. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण टिळकनगर विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. नोकरी न करताच व्यवसाय करायचे, हे त्यांचे आधीपासूनच ठरले होते. पण, नोकरीची संधी आल्याने त्यांनी सहा महिने नोकरी केली. केदार यांचे वडील सुरेश हेदेखील व्यावसायिकच होते. त्यामुळे उद्योजकतेचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले होते. केदार यांची आई सुनीता या गृहिणी आहेत. व्यवसायाची आवड असल्याने त्यांनी प्रथम डोंबिवलीत ‘बिसलेरी’ची एजन्सी घेतली. २० लीटरची ‘बिसलेरी’चा कॅन डोंबिवलीत प्रथम आणण्याचे काम केदार यांनी केले. त्यानंतर केदार यांनी ‘लॅण्डस्केप डिझाईनिंग’ या क्षेत्रात ‘न्यूआर्च लॅण्डस्केप’ या कंपनीबरोबर काम सुरू केले. २०११ मध्ये केदार यांनी आपल्या पत्नी मीनल सोबत एका जाहिरात संस्थेची स्थापना केली. ‘ट्रायनेट कम्युनिकेशन’च्या माध्यमातून ते जाहिरातीचे काम पाहू लागले. ‘ट्रायनेट’च्या कामाचा पसारा वाढत असल्याने अखेर दोन वर्षांपूर्वी केदार यांनी ‘लॅण्डस्केप डिझाईनिंग’च्या कामाला रामराम ठोकला.

उद्योजकांना व्यवसाय करताना अनेक अडचणी येत असतात. त्यांना पैशांचे पाठबळ नसते. या व्यावसायिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने केदार यांनी दि. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्ये ‘चैतन्य फाऊंडेशन’ची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरुवातीला गरजू व्यावसायिकांना कमी पैशांत किंवा मोफत जाहिराती तयार करून देण्याचे काम केले आहे. तसेच त्यांना लागणारे व्हिजिटिंग कार्ड तयार करणे, व्यावसायिकांना सरकारी परवान्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम ‘चैतन्य फाऊंडेशन’च्या माध्यमातून केदार करीत आहे. व्यवसाय संकल्पनेपासून ते व्यवसायाला आकार ओळख देऊन त्याची पायाभरणी करणे, अशा प्रत्येक स्टेजसाठी लागणारी मदत, सहकार्य आणि मार्गदर्शन अत्यल्प दरात करणे, हेच ‘चैतन्य फाऊंडेशन’चे प्रमुख उद्दिष्ट़ आहे. त्यांच्या या कामात त्यांच्या सहकारी प्राजक्ता पेंढारकर या विश्वस्त म्हणून त्यांना सहकार्य करीत आहेत.

‘चैतन्य फाऊंडेशन’चे प्रमुख उपक्रम सांगायचे झाले, तर त्यात गरजू उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढावा व तो जास्तीत जास्त लोकांच्या समोर चांगल्या प्रकारे घेऊन जाता यावा, यासाठी त्यांच्या व्यवसायाच्या विविध प्रकारच्या जाहिराती अत्यंत कमी किंमत घेऊन अथवा मोफत पद्धतीने तयार करून देणे, विविध शहरांत उद्योजकांना चालना मिळावी म्हणून प्रदर्शन आयोजित करून त्याठिकाणी सर्व समाजातील उद्योजकांना शक्य तेवढ्या कमी किंमतीमध्ये स्टॉल उपलब्ध करून देणे, उद्योजकांना मार्गदर्शन होणार्‍या विविध प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करणे, उद्योजकांना व्यवसायासाठी लागणारा सरकारी परवाना आणि प्रमाणपत्र शक्य तो मोफत अन्यथा फक्त सरकारी शुल्क भरून काढून देणे, गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, समाजातील इतर सामाजिक काम करणार्‍या संस्थांना त्यांच्या उपक्रमात शक्य ते सहकार्य करणे, यासारखे आणखीही बरेच उपक्रम ‘चैतन्य फाऊंडेशन’मार्फत राबविले जातात. आतापर्यंत फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. त्यात व्यवसाय करताना देहबोली खूप महत्त्वाची असते. त्यासाठी चार तासांची कार्यशाळा घेण्यात आली. व्यवसाय करताना भांडवल महत्त्वाचे असतो. त्यात ही शेअर मार्केट हे उत्तम साधन कसे होऊ शकते, यासाठी शेअर मार्केटवर कार्यशाळा घेण्यात आली.

नुसत्या सहीमधून आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे, हे समजत असते. त्यासाठी ही मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आयोजित केली होती. डोंबिवलीतील व्यावसायिकांना आपल्या वस्तू रस्त्यावर येऊन वस्तूंची विक्री करता यावी, यासाठी ‘स्ट्रीट स्टॉल’ हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘गोष्टी स्वप्नांच्या’ नावाने एक ठरावीक भागांची सीरिज सुरू केली. ज्यात शून्यातून चालू करण्यात आलेल्या किंवा येऊ पाहणार्‍या व्यावसायिकांच्या मुलाखती घेऊन, त्या युट्यूबवर प्रसिद्ध केल्या आहेत. याशिवाय अनेक योजना व्यावसायिकांसाठी राबविण्याचा केदार यांचा मानस आहे. त्यांच्या या संस्थेत पत्नी मीनल, प्राजक्ता पेंढारकर, अमित पेंढारकर हे विश्वस्त म्हणून सहकार्य करीत आहेत. व्यावसायिकांसाठी झटणार्‍या या हरहुन्नरी व्यावसायिकाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत‘कडून हार्दिक शुभेच्छा.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.