मुंबई : गेल्या काही दिवसांपासुन अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादाला उधाण आल्याचे दिसत आहे. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना ही विकृती हद्दपार करण्यावरून टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला आहे.
"चाकणकरताई तुमचा अभ्यास किती आहे, तो पेपर तुम्ही सुप्रियाताईंच्या समोर सोडवा. आम्हाला सांगायची गरज नाहीये. तुमचा अभ्यास बघून तुमच्या पक्षाने तिथं बसवलं नाहीये. तुमचा अभ्यास किती आहे ते सुप्रिया सुळे यांना जाऊन सांगा. आमचा अभ्यास पक्का आहे. तुम्ही नोटीस पाठवली आम्ही उत्तर पाठवलं आहे." असे चित्रा वाघ म्हणाल्या.
"सल्ले तुमच्या घरात द्या. समाजस्वस्थ्याचं कारण असतं तिथं राजकारण करायची गरज नसते. जे राजकारण करण्यासाठी उड्या मारतायत त्यांना आम्ही गुळ-खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं. त्यांच्या नेत्या सांगतयतं हे थांबवा. सुप्रियाताई ही विकृती थांबवण्यासाठी आम्ही लढा सुरू केला आहे. वाईट याचं वाटतं तुम्ही ज्या बाईला बसवलं आहे तिला यामध्ये विकृती दिसत नाही.त्यामुळे तुम्हाला सल्ले द्यायचे असतील तर तुमच्या घरात द्या आमच्या घरात द्यायची गरज नाही." असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे ?
उर्फी प्रकरणत होत असलेल्या राजकारणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली होती. राजकारणात सुरू असलेल्या गलिच्छ आरोप प्रत्यारोप थांबवा मी माझ्या पक्षापासून सुरूवात करते, अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरू आहे. महिलांना माते समान सन्मान आहे तिथे हे घडतंय हे दुर्दैवी आहे अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती.