'हवेत झिंगलेल्यां'ना चाप कधी? : तिघा दारुड्यांची एअर होस्टेससह पायलटलाही मारहाण

    09-Jan-2023
Total Views |
MahaMTB

हवेत झिंगलेल्यांना चाप कधी?


नवी दिल्ली :
तीन दारूड्या प्रवाशांनी एअर होस्टेसशी गैरवर्तन केले आणि वैमानिकालाही मारहाण केली. दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या विमानात हा प्रकार उघडकीस आला. या विमानात तीन जणांनी धिंगाणा घातला होता. तिघेही प्रवासी दारू पिऊन धिंगाणा घालत होते. यावेळी एअर होस्टेसने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिच्याशीही गैरवर्तन केले. पायलटनेही हस्तक्षेप केल्यानंतर त्याला मारहाण केली. पाटणा विमानतळ पोलीस ठाण्यात या प्रकरणाची रितसर तक्रार नोंदविण्यात आली आहे. इंडिगोचे 6E-6383 हे विमान रविवारी रात्री ८.५५ वाजता पाटणा विमानतळावर आले. पोलीसांनी दोघांना अटक केली. एक जण फरार आहे. तिघेही बिहारचेच रहिवासी आहेत.

एका विमान प्रवाशाने तक्रारीत केलेल्या आरोपानुसार, विमानात बसल्यानंतरच तिघांनीही धिंगाणा सुरू केला होता. एअर होस्टेसने तिघांनाही ताकीद दिल्यानंतर तिच्याशीही गैरवर्तन केले होते. रोहित कुमार, नितिन कुमार आणि पिंटू कुमार, अशी तिघांचीही नावे आहेत. तिघेही नशेतच होते. यामुळे इतर प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला होता. त्यांनी कित्येकदा पायलटकडे तक्रारही केली होती. या संपूर्ण प्रकरणाची दखल विमानतळ प्राधिकरण आणि सीआयएसएफला देण्यात आली आहे. तिघांनाही विमानातून उतरल्यावर रोखले होते. मात्र, आपण एका राजकीय पक्षाचे आहोत, राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या ओळखीचे आहेत, असे सांगत त्यांनी अरेरावी केली होती. या बाचाबाचीत पिंटू कुमारने पळ काढला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.





लघुशंका करणारा जेरबंद!

एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमधील वृद्ध महिलेवर लघुशंका करणाऱ्याला जेरबंद करण्यात आले आहे. न्यूयॉर्क ते दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या विमानात ही गंभीर घटना घडली. मुंबईतील ३४ वर्षीय तरुण, शंकर मिश्राला मद्यधुंद अवस्थेत एका वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याचं प्रकरण घडलं होतं. शंकर मिश्राला शुक्रवारी, ६ जानेवारी रोजी रात्री उशिराच्यासुमार दिल्ली पोलिसांनी बेंगळुरूतून अटक केली. त्याला दिल्लीत आणण्यात आले. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरोधात कलम ३५४, २९४, ५०९, ५१० अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग


सप्टेंबर २०२२ मध्ये एका दारुड्या प्रवाशाने एका आठ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ५ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. आई-मुलीच्या तक्रारूनुसार, १९ सप्टेंबर रोजी ही तक्रार करण्यात आहे. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे या तक्रारीत म्हणण्यात आले आहे.





थाई स्माईल एअरवेजमध्येही गैरप्रकार

थाई स्माइल एयरवेजच्या एका विमानात प्रवाशांनी मारहाण केली होती. अधिक माहितीनुसार, हे विमान बँकॉकहून भारतात येत होते. संपूर्ण घटना ६ डिसेंबर २०२२ रोजीची आहे. एका सहप्रवाशाने मोबाईलवर हा व्हीडिओ शूट केल्यानंतर प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर स्माइल एयरवेजने तक्रार नोंदविली होती.




पाळीव प्राणी विमानातून नेण्यास रोखलं!


बंगळुरुतील एका पाळीव कुत्र्यासोबत सहलीला जाणाऱ्या एका कुटूंबाला रोखण्यात आलं. एअर इंडियाच्या विमानात चढताना हा प्रकार घडला होता. त्या कुटूंबानं एक सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करत या प्रकाराविरोधात आवाज उठवला होता. सचनि शेनॉय नावाच्या व्यक्तीने कुत्रा सोबत नेण्यासाठीच्या सर्व नियमांचे पालन केले होते. मात्र, तरीही त्याला रोखण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता. याउलट विमान कंपनीने आम्ही सर्व प्रकारची मदत करायला तयार होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.



झिंगलेल्यांना चाप कसा बसणार?


विमानात दारू पिऊन गैरवर्तन करुन धिंगाणा घालणाऱ्यांना चाप बसावा, अशी मागणी आता प्रवाशांकडून होऊ लागली आहे. सोशल मीडियावर अभिव्यक्त होऊन असे प्रकार थांबविले पाहिजेत, अशी तक्रार सरकारकडेही केली जात आहे.