मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत, पण खालच्या भाषेत आता ही टीका केली जाऊ लागली आहे. त्यातून त्यांनी महापुरुषांच्या अवमानाबद्दल ते केंद्रीय नेतृत्वावर, केंद्रीय मंत्रिमडळावर प्रहार करत आहेत. त्यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
आमदार भातखळकर म्हणाले की, "संजय राऊत यांच्याकडून वारंवार केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल अभद्र भाषेचा वापर होतोय. रोज अशी भाषा ते वापरत आहेत. त्यांना एवढेच म्हणेन की, तुम्हाला इडीने अटक केली होती, कोविड घोटाळ्याचेही आरोप तुमच्यावर आहेत. तुम्ही जामिनावर बाहेर आहात. तुमची भाषा सुधारा, जिभेला लगाम घाला. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांकडून पुराव्याची मागणी केली होती. त्यांचा अपमान तुम्ही केलात. आपले नेते उद्धव ठाकरे यांना शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची माहिती नव्हती, स्वराज्याची स्थापना कधी केली हेही त्यांना माहीत नव्हते. तेव्हा संजय राऊत तुमच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करूच. पण जर अभद्र भाषेचा प्रयोग सुरू राहिला तर आपल्याच भाषेत आपल्याला उत्तर दिले जाईल, हे लक्षात ठेवावे."