अर्थशास्त्रातील विद्वत् तारका!

    09-Jan-2023   
Total Views |
Aparna Kulkarni


अर्थशास्त्र आणि समाजकारण यांचा संबंध आणि संदर्भावर मंथन करणार्‍या आणि बुद्धिजीवी वर्गात स्वत:चे स्थान निर्माण करणार्‍या अपर्णा कुलकर्णी- धर्माधिकारी. त्यांच्या बुद्धिकार्याचा घेतलेला मागोवा..


केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला की अर्थसंकल्पावरच्या चर्चा प्रसारमाध्यमात सुरू होतात. अर्थसंकल्पाचा सामाजिक आणि राजकीय स्तरावरही अभ्यास असणार्‍या अनेक विद्वतजनांना या चर्चेमध्ये पाचारण करण्यात येते. या व्यासपीठावर आर्थिकतेचे सामाजिक आयामातून विश्लेषण करणारे तसे खर्‍या अर्थाने खूप कमी जण आहेत. या खूप कमी जणांपैकी एक आहेत प्रा. अपर्णा कुलकर्णी-धर्माधिकारी. प्रा. अपर्णा उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व. तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या दोन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अपर्णा. अर्थशास्त्र आणि संबधित अनेक आयाम स्पष्ट व्हावे म्हणून त्यांनी इतरही अनेक कोर्सेस केले आहेत. ‘नेट’ आणि ’सेट’ या परीक्षा त्या उत्तीर्ण आहेत.
सध्या त्या मुंबईतील नामांकित महाविद्यालयामध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ आहेत. अर्थशास्त्रासंदर्भात त्यांचे दहा संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या चर्चासत्रामध्ये त्यांनी अर्थसंकल्प अंदाजपत्र तसेच अर्थशास्त्राच्या विविध विषयांवर मत मांडले आहे. त्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या आणि ‘इंडियन पॉलिटिकल असोसिएशन’च्या सदस्यही आहेत. या सगळ्याबरोबरच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण मुंबईच्या जिल्हा प्रमुख आहेत.या अनेकविध भूमिका पार पाडताना अर्पणा यांचे ध्येय एकच आहे. ते म्हणजे, अर्थशास्त्र हा विषय केवळ अभ्यास किंवा अंदाजपत्रकापुरता मर्यादित न राहता त्याची व्याप्ती आणि त्याचे होणारे परिणाम याबाबत जनमानसामध्ये जागृती यावी. तसेच विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा नागरिक आहे.
या विद्यार्थ्यांची अर्थशास्त्रीय सामाजिक जाणिव प्रगल्भ व्हावी. अपर्णा यांचा एक ब्लॉगही आहे. त्याचे नाव आहे ‘सोसायटी अ‍ॅण्ड पॉलिसी बाय अपर्णा.’ केंद्र किंवा राज्य सरकारची एखादी योजना जाहीर झाली की, त्यावर या ब्लॉगच्या माध्यमातून चर्चा आणि परिसंवाद आयोजित केला जातो. एकंदर काय? तर अपर्णा यांनी अर्थशास्त्र आणि त्याद्वारे समाजचिंतन कार्य यावर आपले जीवनलक्ष्य केंद्रित केले आहे.असे जरी असले, तरीसुद्धा त्यांचे वैयक्तिक काही छंद आहेत. कथा, कविता लिहिणे आणि हो, सध्या त्या भरतनाट्यमही शिकत आहेत. सध्या अपर्णा ‘विदर्भातील एनजीओंचा मानवी विकासावर झालेला परिणाम’ या विषयावर पीएच.डीही करत आहेत. पीएच.डीचा अभ्यास करताना विदर्भातील प्रमुख स्वयंसेवी संस्थांशी त्यांचा संपर्क आला. त्यामध्ये बाबा आमटे, अभय बंग आणि रवींद्र कोल्हे यांच्या स्वयंसेवी संस्थांचे काम आणि ध्येय पाहून अपर्णा यांच्या मनामध्ये सेवाव्रताची असिम छाप उमटली आहे.
अपर्णा तशा मूळच्या बीडच्या. बीडचे दत्तात्रय कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी या दाम्पत्यांना तीन अपत्ये. त्यापैकी एक अपर्णा. घरचे वातावरण अत्यंत धार्मिक. मध्यमवर्गीय ब्राह्मण घरात जे वातावरण तेच वातावरण कुलकर्णी यांच्या घरी. अपर्णा यांचे आजोबा हनुमंत. अतिशय शिस्तीचे भोक्ते. त्यांचा अपर्णावर भारी प्रभाव. त्यांना वाचनाची आवड. दररोज पहाटे ते श्रीसूक्त म्हणायचे. त्यामुळेच की काय लहाणपणीच आजोबांचे ऐकून ऐकूनच अपर्णा यांचे श्रीसूक्त कंठस्थ झाले होते. घरात सांस्कृतिक, साहित्यिक श्रीमंती. दत्तात्रय सरकारी दरबारी कारकून होते. पगार बेताचा आणि संयुक्त कुटुंब. त्यामुळे घरात दोनवेळचे अन्न ताटात पडणे आणि मूलभूत गरजा भागणे हीच चैन होती.
दिवाळीचा सण होता. आजूबाजूच्या शेजारच्या घरी सण अतिशय छानछोकित साजरा होत होता. आर्थिक चणचण असल्यामुळे कुलकर्णींच्या घरी मात्र दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी होत होती. हे सगळे पाहून त्यावेळी लहान असलेल्या अपर्णाला वाईट वाटले. नवीन भारीतले कपडे आणि फटाके मला का नाहीत? असे म्हणून त्या रडू लागल्या. त्यावेळी त्यांची आई भाग्यश्री म्हणाल्या, “रडू नको बाळ. तू इतकी मोठी होशील की, हे सगळे तू स्वत:च्या सामर्थ्यावर मिळवशील,” असे म्हणून त्यांनी एक कविता म्हटली. त्याची प्रमुख ओळ होती, “प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर हसा.” तो दिवस, त्या दिवसानंतर अपर्णा यांनी कधी दुसर्‍यांसोबत तुलना केली नाही.
आयुष्यात काही तरी बनायचे तर अभ्यास महत्त्वाचा हे ठरवून त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. दहावी उत्तीर्ण झाल्या. पुढे बारावीला त्या औरंगाबाद बोर्डातून बाराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. त्यावेळी त्यांची आई विश्व हिंदू परिषद मातृशक्तीची जबाबदारी सांभाळायच्या, तर अपर्णा या दुर्गावाहिनीच्या जिल्हा प्रमुख होत्या. ‘एनसीसी’, ‘एनएसएस’ या सगळ्याबरोबरच महाविद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये अपर्णा सहभागी होत होत्या. याच काळात त्या अभाविपचेही काम करू लागल्या. त्यावेळी पदवी परीक्षेत अपर्णा औरंगाबाद विद्यापीठ कलाशाखेत दुसर्‍या आल्या. पुढे ‘एमपीएससी’, ‘युपीएससी’ स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्या पुण्यात आल्या.
इथे डॉ. मालती रॉय, डॉ. अनिल वर्तक यांच्या शिकवण्याच्या हातोटीने अपर्णा यांची अर्थशास्त्राची गोडी वाढली. याच काळात डॉ. वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर्णा यांनी आर्थिक सुधारणा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, विशेष आर्थिक क्षेत्र याविषयी अभ्यासपूर्ण प्रात्यक्षिक चिंतन केले. पुढे त्यांनी ‘सेट’ आणि ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत झाल्या. पुणे येथे अध्यापक म्हणून काम करू लागल्या. याच काळात त्यांचा विवाह डॉ. प्रशांत देशपांडे यांच्याशी झाला. प्रशांत आणि अपर्णा दोघेही बुद्धिजीवी आणि समाजशील तसेच समविचारी. त्यामुळे विवाहानंतरही अपर्णा यांचे कार्यक्षेत्र बहरतच गेले. सध्या ठाण्याला स्थायिक असलेले हे दाम्पत्य म्हणजे विद्वत जगताचे हक्काचे ठिकाण म्हणता येईल. येणार्‍या काळातही त्यांना अर्थशास्त्र आणि समाजकारण यात कार्यरत राहायचे आहे.अशा अपर्णा अर्थशास्त्राच्या वर्तृळातील विद्वत् तारका!





 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.