पाकिस्तानातील हिंदू मुलींच्या मरणकळा...

    07-Jan-2023   
Total Views |
Violence against Hindu girls in Pakistan


समोरची महिला हिंदू आहे म्हणून तिच्यावर अमानवी अत्याचार करण्याची पाकिस्तानमधली कोणती ही संस्कृती? पाकिस्तानमध्ये दररोज हिंदू मुलींवरअत्याचाराच्या घटना घडत आहेत.आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने या सगळ्या प्रकरणाबाबत वेळोवेळी प्रश्नही उपस्थित केला आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचार थांबायला हवेत, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही मागणी होताना दिसते. मात्र, तरीही पाकिस्तानच्या गल्लीबोळातला हिंदू असुरक्षितच!


लाली... त्या परिसरातील एक अत्यंत देखणी युवती. तिचा नुकताच विवाह झाला होता. मात्र, परिसरातील अब्दुल खोसो याची तिच्यावर वक्रदृष्टी पडली. नोव्हेंबर महिन्यात अब्दुलने लालीचे जबरदस्तीने अपहरण केले. तिला घरात कैद केले. लाली कशीबशी निसटून पुन्हा तिच्या घरी आली. हे अब्दुलसाठी अत्यंत अपमानकारक आणि आश्चर्यकारक होते. कारण, अल्पसंख्याक आणि पशूपेक्षाही दुय्यम दर्जा असलेल्या काफीरच्या मुलीने त्याला चक्क नाकारले होते. पुन्हा २५ डिसेंबर रोजी अब्दुलने काही गावगुंडांना हाताशी घेऊन लालीच्या घरावरच थेट हल्ला केला. लालीचे पुन्हा जबरदस्तीने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लालीचा भाऊ लालू काछी याने विरोध दर्शवला. प्रतिकार केला. अब्दुलने आणि गुंडांनी लालूला रॉड आणि हत्यारांच्या साहाय्याने मारहाण केली. लालू गंभीर जखमी झाला. रविवार, दि. १ जानेवारी रोजी रुग्णालयात लालूचा मृत्यू झाला. त्याची चार मूलं या एका दुर्देवी प्रसंगामुळे एकाएकी पोरकी झाली. न्यायालयात केस उभी राहिली.

लालीने अब्दुलविरोधात एक चकार शब्दही उच्चारू नये, उलट तिने अब्दुलसोबतच राहायचे आहे, असे न्यायालयात सांगावे, यासाठी अब्दुलसोबत त्याची पुरी वंशावळ गोळा झाली. त्यांनी लालीवर प्रचंड दबाव आणला. तिच्या घरातल्यांना धमकावले. तरुण मुलगा अब्दुलच्या अत्याचाराने बळी गेला. लालीचे जीवन अत्याचाराने वाळवंट झाले. पण, आता घाबरायचे नाही, तर नेटाने लढायचे असे ठरवून लालीचे कुटुंंब अब्दुलविरोधात ठाम उभे राहिले. अब्दुल खोसेवर गुन्हा दाखल झाला. त्याला तुरुंगवास होणार इतक्यात संबंधित अधिकार्‍याला कुणाचा तरी फोन आला आणि अब्दुलची तत्काळ सुटका झाली. काय म्हणावे? ही घटना आहे पाकिस्तानच्या उमरकोटमधली. या घटनेने पाकिस्तानातील हिंदू समाजात प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. तेथील मानव हक्क कार्यकर्ते या घटनेमध्ये न्याय मागत आहेत.

लालीचा या सगळ्यांत दोष तो काय? ती पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू समाजाची मुलगी होती, हाच तिचा दोष? अब्दुलने यापूर्वीही तिचे अपहरण केले होते. तिला बंदी बनवले होते. भितीने किंवा आपल्याला न्याय मिळणारच नाही, आपल्याला असेच अत्याचार सहन करीत राहावे लागेल, असा भेकड विचार करून लालीच्या नातेवाईकांनी किंवा तिथल्या अल्पसंख्याक समाजाने याविरोधात काही आवाज उठवणे तसे शक्य नव्हते. पण, विवाहित अब्दुलच्या तिथल्या स्थिरस्थावर असलेल्या कौमने, त्याच्या नातेवाईकांनी त्याला एका शब्दाने विचारले नाही की, ‘तू जे करतोयस तो अत्याचार आहे. मुलीची मर्जी नसताना तू तिला बंदी का केलेस?’ किंवा एकदा नव्हे, तर दोनदा अपहरण करण्याचा प्रयत्न केला, याबाबत अब्दुलच्या घरातील महिलाही गप्प राहिल्या. त्यांना लालीची अजिबात दया आली नाही? हा कोणता समाज? ही कोणती संस्कृती?

पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील घटना. शुक्रवार, दि. ६ जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली. १५ दिवसांपूर्वी उर्मिला या मुलीचे अपहरण करण्यात आले व तिच्या पालकांना सांगण्यात आले की, तिने इस्लाम कबूल केला आहे. तिच्या पालकांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात तिच्या अपहरणकर्त्यांनी सांगितले की, ती २० वर्षांची आहे आणि तिला अपहरणकर्त्यांसोबतच राहायचे आहे. मात्र, पालकांनी पुराव्यासकट सिद्ध केले की, उर्मिलाचे वय २० वर्षे नसून अवघे १३ वर्ष आहे. पालक म्हणून अल्पवयीन उर्मिलाला आमच्याकडे परत पाठवावे. यावर न्यायालयाने काय निर्णय द्यावा? तर पाकिस्तानी न्यायालयाने उर्मिलाला तिच्या पालकांकडे न सोपवता तिला ‘दारूल अमन’ या संस्थेत पाठवले. ती संस्था ठरवणार की, उर्मिला १३ वर्षांची आहे की २० वर्षांची! या निर्णयाने व्यथित झालेल्या उर्मिलाच्या पालकांनी ‘पाकिस्तान प्रेस क्लब’च्या बाहेर धरणेश आंदोलन केले. तरीसुद्धा उर्मिलाला तिच्या पालकांकडे सोपवले जात नाही.


अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करणे आणि त्यांना आपली बेकायदा पत्नी (त्यांच्या मान्यतेनुसार चार विवाह कायदेशीर आहेत, पाचवा विवाह कायदेशीर नाही) हे पाकिस्तानमध्ये सर्रास चालते. का? तर इथल्या हिंदूंनी त्यांचे राहते घर, स्थावर मालमत्ता सोडून पळून जावे किंवा तिथेच राहिले तरीसुद्धा त्यांनी घाबरून राहावे यासाठी! तसेही जगभरात प्रत्येक आईबाबाची मुलगी त्यांच्यासाठी राजकुमारी... दुधावरची सायच असते. तिच्या वाटेला कोणतेही दुःख येऊ नये, यासाठी ते स्वत:चे आयुष्य अक्षरशः तळवे झिजवतात. पाकिस्तानातील हिंदू आईबाबांचे मन यापेक्षा काही वेगळे नाही. आपल्या मुलीचे कधी अपहरण होईल, कधी तिच्यावर अत्याचार होईल, या भीतीनेच पाकिस्तानातील हिंदू अक्षरशः जीव आणि इज्जत मुठीत घेऊन राहतात. मुघलांच्या काळात आपल्या महाराष्ट्रातही असेच वातावरण होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘धर्मवीर’ संभाजी महाराज यांचे करोडो आभार की, त्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्य उभे राहिले!

असो. पाकिस्तानमधील अशीच आणखीन एक घटना. २०२२चा ऑक्टोबर महिना... मोहम्मद अकरम हा जमीनदार. त्याच्याकडे एक हिंदू महिला मजदूर होती. तिच्याकडून त्याने भरपूर काम करून घेतले. काम झाल्यानंतर थकल्या भागलेल्या आणि दिवसभर अन्न आणि पाणी प्यायलाही वेळ न मिळालेली ही महिला मजुरीचे वेतन घेण्यासाठी जमीनदाराच्या घरासमोर उभी राहिली. त्यावेळी त्याने तिला धमकावले की, “कसले पैसे? तुम्ही लोकांनी आमचे फुकट काम केले पाहिजे.” तरीही पोटापाण्यासाठी अगदी अजिजीने ती पैसे मागू लागली. अकरमने तिला जबरदस्तीने घराच्या बाजूच्या पडीक जागेत नेले. तिथे त्यांना आणखीन आठ जणांना बोलवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. इतके करूनही त्याला शांती वाटली नाही. त्याने मृतवत झालेल्या त्या मजूर हिंदू महिलेला त्याच्या घराच्या अंगणात उलटे लटकावले आणि मग येणार्‍या-जाणारेही निर्लज्जपणे वाट्टेल तसे तिला मारहाण करू लागले.

हे सगळे लिहितानाही वेदना होतायत. काय होती त्या हिंदू भगिनीची चूक? ती हिंदू होती आणि तरीही पाकिस्तानातील गैरहिंदू आणि त्यातही सत्ताधारी समाजाच्या जमीनदाराकडे आपल्या कष्टाचे पैसे मागितले, हाच तिचा गुन्हा! याबाबत पुढे काय झाले, याची कुठेही वाच्यता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सीएए’ कायदा केला आणि त्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशातले हिंदू परत आपल्या धर्मभूमीत येण्याची वाट मुक्त झाली. पण, तरीही तिथल्या हिंदूंमधले अज्ञान, गरिबी आणि तशी संधीच नसल्यामुळे तिथल्या हिंदूंना भारतात परत येण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.

खरंच पाकिस्तान म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांसाठी नरकच! हिंदू मुलींना छळलं काय, विनयभंग केला काय, त्यांचे अपहरण करून जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांना आपली बीबी (काहीही हक्क नसलेली) बनवली काय? असेच सगळे किळसवाणे वातावरण. हिंदूंच्या लेकीबाळी लैगिंक शोषणासाठीच असतात, असा जणू पाकिस्तान्यांचा समज आहे की काय कोण जाणे? दि. २२ डिसेंबर रोजी पाकिस्तानमध्ये दया भिल नावाच्या विधवेचा मृतदेह सापडला. तिचेही अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिचे शीर धडावेगळे केले होते. स्तन धारधार हत्याराने कापले गेले होते. इतकेच काय तर जागोजागी तिची त्वचाही सोलवटली होती. हे परमेश्वरा! इतका अनन्वित अत्याचार. का? कशासाठी? कुठून येते ही क्रूरता? हीच क्रूरता आफताब पूनावालाकडेही होती.

 ज्याने त्याच्यावर विश्वास टाकून आलेल्या आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या मुलीचे ३५ तुकडे केले होते. हीच क्रूरता दि. २६ ऑक्टोबर, २०२० रोजी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये तौसीफकडे पाहायला मिळाली होती. निकिता तोमर नावाच्या मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. ती प्रतिसाद देत नव्हती म्हणून तौसिफने धारदार हत्याराने निकिताची हत्या केली. हीच क्रूरता झारखंडच्या शाहरुखकडे होती. १९ वर्षांच्या अंकिता सिंहवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. तिने प्रेमाचा स्वीकार केला नाही म्हणून ती ज्या खोलीत झोपली होती, त्या खोलीत खिडकीतून पेट्रोल ओतून शाहरूखने आग लावली. अदिम समाजाच्या रिबीकाने आधीच विवाहित असलेल्या दिलदारसोबत लग्न केले. त्याबदल्यात दिलदार अन्सारीने रिबीकाचे इलेक्ट्रिक कटरने ५० तुकडे केले. हीच क्रूरता रियाज खानमध्येही होती. आधीच तीन लग्न केलेला हा रियाज.

उर्वीला त्याने प्रेमजाळ्यात फसवले. तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. हिंदू मुलगी फक्त मजेसाठी किंवा सजेसाठी, अशी मानसिकता असलेल्या रियाजने तिचा क्रूरपणे खून केला. हीसुद्धा तीच क्रूरता. या क्रूरतेचा संबंध कुठे आहे? हिंदू मुलींना फसवून त्यांच्यावर अत्याचार करून त्याबद्दल या सगळ्या राक्षसांना बिल्कूलही पश्चाताप नाही. कुठून येतेही निर्मम क्रूरता?
नुकतीच तुनिषा शर्माने आत्महत्या केली. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि सहकलाकार शिझानचे प्रेम होते. तिचे आणि त्याचे प्रेमसंबंध तुटले म्हणून निराशेने तिने आत्महत्या केली. पण, तरीही मुस्लीम तर सोडाच काही हिंदू व्यक्तीही म्हणतात, ‘लव्ह जिहाद’ वगैरे काही नसते. दोन व्यक्ती प्रेम करतात त्याला कसे ‘जिहाद’ म्हणतात ते मनुवादी...पण, पाकिस्तान ते भारत हिंदू मुलींना प्रेमाच्या नावाखाली जी किंमत चुकवावी लागते त्याचे काय? ‘लव्ह जिहाद’ शब्द वापरला म्हणून कुणाच्या भावना दुखत असतीलही. पण, फसणार्‍या आणि मरणार्‍या या मुलींचे काय? पाकिस्तानमधल्या लालीवरच्या अत्याचाराने पुन्हा वाटत राहते की हिंदू मुलगी असणे गुन्हा आहे का? निदान पाकिस्तानमध्ये तरी!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.