आता सिंधुदुर्गात होणार सागरी कासवांचे ‘सॅटलाईट टॅगिंग’

    06-Jan-2023   
Total Views |



satellite sea turtle


मुंबई (समृद्धी ढमाले) : कोकण किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या सागरी कासवांना ‘सॅटलाईट टॅग’ लावण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी मिळाली आहे. कांदळवन कक्षाच्या 'कांदळवन प्रतिष्ठान'ने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनाऱ्यावर विणीसाठी येणाऱ्या मादी कासवांना सॅटेलाईट टॅग लावण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात सागरी कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून याच हंगामात सॅटलाईट टॅगिंगचे काम केले जाईल.


गेल्या वर्षी कांदळवन कक्षाने भारतीय वन्यजीव संस्थानच्या सहकार्याने कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांना सॅटेलाईट टॅगिंग लावण्याचा प्रकल्प राबवला होता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पहिल्यांदाच हा प्रकल्प राबवण्यात आला होता. त्याअंतर्गत ‘आॅलिव्ह रिडले’ प्रजातीच्या मादी कासवांना सॅटेलाईट टॅग लावण्यात आले होते. जानेवारी, २०२२ मध्ये वेळास - आंजर्ले येथे दोन आणि फेब्रुवारी महिन्यात गुहागर येथे तीन कासवांना सॅटलाईट टॅग लावण्यात आले. परंतु, सहा महिन्यांच्या कालावधीतच हे सॅटलाईट टॅग अकार्यान्वित झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा सॅटेलाईट टॅगिंगचा हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात येणार असल्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानाचे उपसंचालक (संशोधन) मानस मांजरेकर यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. अकार्यान्वित झालेल्या सॅटेलाईट टॅगिंगच्या बदल्यात ‘लोटेक वायरलेस’ या कंपनीकडून तीन नवे ट्रान्समीटर देण्यात येणार असून अद्याप हे ट्रान्समीटर ‘भारतीय वन्यजीव संस्थानाकडे (डब्लूआयआय) आले नसून ते लवकरच सुपूर्द केले जातील, असेही मांजरेकर यांनी सांगितले.
“केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून समुद्री कासवांना ‘सॅटलाईट टॅगिंग’ लावण्याची परवानगी मिळाली आहे. अद्याप प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांची अंतिम परवानगी येणे बाकी आहे."
 - विरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ,कांदळवन कक्ष



सॅटेलाईट ट्रान्समीटर म्हणजे ?
सॅटेलाईट ट्रान्समीटर हे सामान्यपणे 'सॅटलाईट'शी जोडलेले असते. खास करुन वन्यजीवांच्या संबंधित अभ्यासासाठी अवकाशात सोडलेल्या काही उपग्रहांशी ते जोडलेले असते. ज्याला 'पोलार ऑरबिटिंग सॅटेलाईट' असे म्हणतात. वेळास, आंजर्ले आणि गुहागर किनाऱ्यांवरील कासवांना लावण्यात आलेले ट्रान्समीटर हे 'अॅडव्हान्स रिसर्च अॅण्ड ग्लोबल ऑब्जर्वेशन सॅटेलाईट' या कंपनीशी जोडलेले असून 'भारतीय अवकाश संशोधन संस्थे'चे (इस्रो) 'सरल' नामक सॅटेलाईट हे या कंपनीशी जोडलेले आहे.'सॅटलाईट ट्रान्समीटर'मध्ये महत्त्वाचा भाग हा बॅटरीने व्यापलेला आहे. त्याच्या पुढच्या बाजूला अँटेना असून 'ट्रान्समीटर'ची संदेशवहन प्रणाली आहे. बॅटरीवर दोन 'स्कू'सारखे बटन आहेत. ज्याला 'स्लाॅट वाॅटर स्वीच' म्हणतात, जे बॅटरीला कार्यान्वित करुन संदेशवहन प्रणालीला 'सॅटेलाईट'ला संदेश पाठवण्यासाठी मदत करतात. हे यंत्र पाण्यामध्ये असल्यावर पाण्याच्या दाबामुळे 'स्लाॅट वाॅटर स्वीच' बंद असते. मात्र, सागरी कासवांना विशिष्ट काळाने समुद्राच्या पृष्ठभागावर श्वास घेण्यासाठी यावे लागते. अशा वेळी कासवाने श्वास घेण्यासाठी डोके वर काढल्यावर त्याच्या पाठीवरील 'ट्रान्समीटर' पाण्याबाहेर येते. पाण्याच्या दाब कमी झाल्यामुळे 'स्वीच' सुरू होऊन बॅटरी कार्यान्वित होते. अशावेळी 'सॅटेलाईट' हे अवकाशातून त्याच प्रदेशामधून जात असेल, तर 'ट्रान्समीटर'ची संदेशवहन प्रणाली कासवाच्या स्थानाचे संदेश त्याला पाठवते. हे 'सॅटलाईट' दर दिवशी भारताच्या अवकाशातून साधारण चार ते पाच तासांसाठी प्रवास करते आणि अशावेळी ते पाच हजार किलोमीटर क्षेत्रातील संदेशांचा स्वीकार करते. यामुळे आपल्याला कासवाचे स्थलांतर मार्ग, अधिवासाच्या जागा, त्याची पोहण्याची खोली, पाण्याचे तापमान, पोहण्याची गती या सर्वांविषयी माहिती मिळते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.