प्लास्टिक पुनर्वापराचा ‘अशाया’ प्रयोग

    06-Jan-2023   
Total Views |

प्लास्टिक पुनर्वापर




आजच्या युगातील सर्वात मोठी पर्यावरणीय समस्या कुठली असेल तर ती प्लास्टिकची. या प्लास्टिकमुळे प्रदूषणाच्या आणि आरोग्याच्या समस्यांनीही अलीकडच्या काळात जगाची चिंता वाढवली आहे. परिणामी, या पर्यावरणासाठी घातक ठरलेल्या प्लास्टिकला ‘रिसायकल’ करून, त्यापासून इतरही अनेक वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञानही समोर आले तर या प्रदूषणाला आटोक्यात आणण्यासाठी निश्चितच मदत होईल. असाच प्रयत्न ‘अशाया रिसायकल्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून डॉ. जितेंद्र समदानी आणि अनिश मालपाणी यांनी केला आहे. त्याविषयी सविस्तर...

स्टिक ही अशी गोष्ट आहे की, जिचे विघटन होण्यास किमान 40 ते 50 वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे प्लास्टिक पर्यावरणात साचून राहते. पावसाळ्यात आणि एरवीही आपल्याला पाण्यात वाहणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्यांपासून ते विविध वस्तू निदर्शनास येतात. असे हे जलप्रवाहात बाधा निर्माण करणारे, तुंबणारे प्लास्टिक पूरस्थितीलाही आयते आमंत्रण देणारे ठरते. म्हणूनच हे प्लास्टिक कधी नष्ट होणार? त्या संपूर्ण प्लास्टिकचे करायचे काय? हे प्रश्न आपल्याला कायमच भेडसावतात. याच प्रश्नावर उपाय आहे ‘रिसायकलिंग’चा. याच ‘रिसायकलिंग’च्या माध्यमातून नवनवीन उत्पादनांची निर्मिती करणे, कचरावेचकांना योग्य तो मोबदला मिळणे गरजेचे आहे. या सर्वच प्रश्नांना हात घालून त्यावर उद्योजकतेच्या माध्यमातून उत्तरे शोधण्याचे काम डॉ. जितेंद्र समदानी आणि अनिश मालपाणी करीत आहेत.
सर्वप्रथम जमा झालेल्या प्लास्टिकमधून पुनर्वापरायोग्य प्लास्टिक वेगळे काढावे लागते.नेमके हेच काम ‘अशाया’च्या माध्यमातून केले जाते. यांचा सर्वात मुख्य उद्देश हा चिप्सच्या रॅपरच्या रिसायकलिंगचा. हे प्लास्टिक खूपच जटील असते. त्यापासून एकापेक्षा अनेक गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक जेव्हा ‘अशाया’कडे येते, तेव्हा त्याचे सर्वप्रथम वर्गीकरण केले जाते. त्यातून हे सर्व प्रकारचे प्लास्टिक वेगळे काढले जाते आणि मग त्यावर प्रक्रिया केल्या जातात. सर्व प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून प्लास्टिकचे सर्व घटक विलग केले जातात. पॉलिस्टर, धातुमय पदार्थ तसेच इतर अनेक धागे वेगळे केले जातात आणि शेवटी जे काही प्लास्टिक उरते, त्यापासून मग वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे काम हे स्टार्टअप करते.

या प्रक्रियांमधून बरेच प्लास्टिक विघटनाच्या पातळीवर आणले जाते किंवा त्यांच्यापासून मिळणार्‍या गोष्टी पुन्हा एकदा वापरल्या जातात, जेणेकरून या प्लास्टिकचा पुनर्वापर होईल आणि हा प्लास्टिकचा कचरा कमी होईल. या प्रक्रियेमध्ये ‘अशाया’चे वैशिष्ट्य असे आहे की, ते कायमच लोकांनी वापरून फेकलेलेच प्लास्टिक प्रक्रियेसाठी घेतात. म्हणजे चिप्सचे पॅकेट जर आले, तर ते लोकांनी वापरून फेकलेलेच घेतात. कारण, तोच खरा कचरा असतो. या सर्व गोष्टींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर ही सर्वात मोठी गोष्ट असल्याने, या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी एक सुसज्ज अशी प्रयोगशाळाही आवश्यक. त्यासाठी ‘अशाया’ची प्रयोगशाळाही सज्ज आहे. या ‘रिसायकलिंग’ क्षेत्रात काम करणार्‍या जेवढ्या म्हणून कंपन्या आहेत, त्यांच्याकडे अशा प्रयोगशाळा असतात. पण, त्यातून या प्लास्टिकपासून काहीतरी वेगळी वस्तू किंवा ‘टायर’चे उत्पादन घेणार्‍या कंपन्या फारच कमी आहेत. तसेच असा विचार फारसा कोणी केलेलाही दिसत नाही. त्यामुळे या गोष्टी मुळापासूनच लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि नेमके तेच काम ‘अशाया’च्या माध्यमातून केले जाते.
याबाबतीत काम करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते प्लास्टिक विकत घेणे. हे करत असताना त्यातून कचरावेचकांना कामासाठी प्रोत्साहन मिळावे किंवा त्यांनाही याचा फायदा व्हावा, यासाठी हा प्लास्टिकचा कचरा चक्क तिप्पट किंमत देऊन रीसतसर खरेदी केला जातो. ‘अशाया’चे लक्ष्य आहे की, या प्लास्टिकमधून चश्म्याची निर्मिती करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यामुळे ‘अशाया’चे यादृष्टीने काम सुरु आहे. या कामातून फक्त व्यवसायच नव्हे, तर सामाजिक कार्यदेखील झाले पाहिजे, हाच या दोघांचा हेतू. सध्या भारतातील एकूण कचर्‍यापैकी केवळ 60 टक्के प्लास्टिक सध्या पुनर्वापराच्या प्रक्रियेमध्ये आहे. पण, जे उरलेले 40 टक्के प्लास्टिक आहे, ते या प्रक्रियेमध्ये कधीच आले नव्हते. ते देखील या प्रवाहात आणण्याचे ‘अशाया’चे उद्दिष्ट आहे.
बाहेरून एखादी पाण्याची, शीतपेयाची बाटली, प्लास्टिकच्या डब्ब्यातील खाद्यपदार्थ विकत घेतले, तर काही जणांचा कल ती बाटली, ते डब्बे न फेकता त्यांच्या पुनर्वापराकडे असतो. हीच बाब प्लास्टिकच्या इतर वस्तूंबाबतही होणे गरजेचे आहे. उद्या अशीही वेळ आली पाहिजे की, चिप्सचे पॅकेट रिकामे झाल्यावर ते अगदी धुवूनही वापरता आले पाहिजे आणि लोकांनी ते तसे खरंच वापरावे, असाच या स्टार्टअपचा प्राथमिक उद्देश आहे.


प्लास्टिक पुनर्वापर

 
भविष्यात सर्वच उद्योग हे काही ना काही तरी सामाजिक विषयाला हात घालणारेच असतील, असे या उद्यमी जोडीला वाटते. तसेच पर्यावरणाशी संबंधित उद्योग जेव्हा सुरु होतो, तेव्हा त्यातून आपण नेमके काय देतोय, हा विचार करणे गरजेचे आहे. त्यातून समाजाला काय फायदा होणार? लोकांचे जीवनमान सुधारणार का? त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगला बदल आपल्याला घडवून आणता येईल का? या सर्व गोष्टींकडे लक्ष असणे गरजेचे आहे. तसेच प्लास्टिकसारख्या जटील पदार्थांच्या कामात लक्ष घालून त्यातून तंत्रज्ञानाच्या मदतीने काम केले पाहिजे. तंत्रज्ञान हेच या व्यवसायाला किंवा अशा प्रकारच्या सामाजिक उद्योगांना प्रतिष्ठा मिळवून देणार आहे किंवा त्यातून समाजाच्या भल्याचे काहीतरी उत्पादन तयार करण्यासाठी मदत करणार आहे. यामुळे तंत्रज्ञानाचा वापर खूपच महत्त्वाचा आहे आणि भविष्यातही तो महत्त्वाचाच राहील, असे जितेंद्र आणि अनिश सांगतात.
भविष्यात आपल्याकडे तयार होणारे सर्वच प्लास्टिक हे ‘रिसायकल’ झालेलेच असेल. या ‘रिसायकल’ झालेल्या प्लास्टिकमधूनच आताची प्लास्टिकची गरज भागवली जाणार आहे. तसेच भविष्यात असे अनेक उद्योग उभे राहतील की ते अशा प्रकारच्या प्रक्रिया करत असतील आणि आणि त्यातून अनेक नवनवीन उत्पादनेही निर्माण केली जातील, जेणेकरून भविष्यात आपण अशी अनेक उत्पादने वापरत असू, जी या फुकट, टाकून दिलेल्या प्लास्टिकमधूनच तयार केलेली असतील. त्यामुळे या उद्योगाचे भविष्य खूप मोठे आहे. ’अशाया’चे भविष्यातील ध्येयही हेच आहे की, अशी अनेक उत्पादने बाजारात आणणे, पण त्याचबरोबर एक समाजकार्याचा उद्देशही आहे तो म्हणजे, या कचरावेचकांना प्रतिष्ठा मिळवून देणे.
आपल्या व्यवसायातून फक्त नफा मिळविणे, उद्योग उभा करणे एवढे एकमेव उद्दिष्ट न ठेवता, त्यातून सामाजिक कार्य करून समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग शोधणार्‍या ‘अशाया’च्या जितेंद्र आणि अनिश यांच्या या हरितकार्याला शुभेच्छा...

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.