भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत

    05-Jan-2023   
Total Views |
नरेंद्र मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारतीय अर्थव्यवस्था सर्वप्रकारच्या आव्हानांतही वेगाने पुढे जात आहे. २०२२मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने अन्य विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत उत्तम कामगिरी केली, तर नव्या २०२३ या वर्षातही भारताची स्थिती उत्तम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जागतिक नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जीवा यांच्या मते, नव्या वर्षातही जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा मिळू शकणार नाही. अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये मंदीचे संकेत मिळत आहेत. या देशांच्या आर्थिक गतिविधी कमकुवत असल्याचे दिसते, तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा वाटा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. जागतिक नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा वाटा २०२२च्या तुलनेत २०२३ मध्ये वाढून ३.६ टक्के होण्याची अपेक्षा आहे.


२००० साली भारताचा वाटा १.४ टक्के होता. याच कालावधीत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेचा वाटा सन २०००च्या तुलनेत घटेल. सन २००० मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिकेचा वाटा ३०.१ टक्के होता. यंदाच्या वर्षी त्यात घट होऊन २४.७ टक्क्यांवर येऊ शकतो. ‘आयएमएफ’नुसार २०२३ मध्ये सर्वप्रकारची आव्हाने असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेत वाढीचे संकेत मिळत आहेत. आर्थिक मंदीच्या संख्येत सप्टेंबर २०२२च्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ६.३ टक्क्यांच्या दराने वाढली. म्हणजेच, दुसर्‍या तिमाहीत ‘जीडीपी’ वाढीचा दर ६.३ टक्के राहिला. ही आकडेवारी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या अनुमानानुसार राहिली.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे जून-२०२२च्या तिमाहीमध्ये ‘जीडीपी’ची आकडेवारी १३.५ टक्के होती, तर गेल्या आर्थिक वर्षात सप्टेंबरच्या तिमाहीत ‘जीडीपी’ वाढ ८.४ टक्के होती. याआधी ‘आयएमएफ’ने भारतासाठी आपला वार्षिक अहवाल जारी करत म्हटले होते की, भारतीय अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात बर्‍याच वेगाने पुढे जात आहे. या अहवालात म्हटले की, वास्तविक ‘जीडीपी’ २०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये क्रमशः ६.८ टक्के आणि ६.१ टक्क्यांच्या दराने वाढण्याचा अंदाज आहे. हा अंदाज आधीच्या तुलनेत बर्‍याच प्रमाणात उत्तम आहे. भारताविषयी जोखमीबाबत म्हटले की, जोखीम बहुतांशपणे बाह्य घटकांमुळे येत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी २०२२ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था १०० ट्रिलियन डॉलर्सपलीकडे १०१.६ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली होती.

यंदा भारताचा ‘जीडीपी’ तीन हजार ४६८.६ अब्ज डॉलर्स होता. उल्लेखनीय म्हणजे, भारताने २ नोव्हेंबर रोजी ब्रिटनला पछाडत जगातील शीर्ष पाच अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले होते. आता भारतापुढे केवळ चार देश असून ते आहेत, अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी. भारताच्या आघाडीने ब्रिटन मात्र सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी करत आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा दिसून येत आहे. व्यापारातील वाढीमुळे प्रत्येक क्षेत्रातील गतिविधीमध्ये वेग आला आहे. मागणी वाढल्याने निर्मिती क्षेत्रातील गतिविधींमध्ये वेग आला आहे. कारखान्यांच्या नव्या मागण्या आणि उत्पादनातील वेगामुळे निर्मिती क्षेत्रातील गतिविधींमध्ये सुधारणा झाली आहे. ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स’ डिसेंबर २०२२ मध्ये वाढून ५७.८ झाला, जो नोव्हेंबर २०२२ मध्ये ५५.७ होता. नोव्हेंबर २०२१ नंतर उत्पादनात सर्वाधिक उसळी डिसेंबर २०२२ मध्ये राहिली. गेल्या दोन वर्षांत व्यापारी गतिविधींमध्ये आलेल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक वेगामुळे असे झाले. ‘पीएमआय’ ५० पेक्षा अधिक असणे उत्पादनात विस्ताराचे सूचक आहे.


दरम्यान, वस्तू आणि सेवा कर म्हणजे ‘जीएसटी’ संकलन डिसेंबरमध्ये सलग दहाव्या महिन्यात १.४ लाख कोटींपेक्षा अधिक झाले. डिसेंबरमध्ये ‘जीएसटी’ संकलनाचा आकडा १.४९ लाख कोटी होता. २०२१ सालच्या ‘जीएसटी’ संकलनापेक्षा २०२२च्या डिसेंबरमधील जीएसटी संकलन १५ टक्के अधिक आहे. २०२२ या वर्षातील हे तिसरे सर्वाधिक संकलन आहे. एप्रिल २०२२ मध्ये विक्रमी १.६८ लाख कोटी तर ऑक्टोबर २०२२मध्ये दुसर्‍यांदा सर्वाधिक १.५२ लाख कोटी ‘जीएसटी’ संकलन झाले होते. त्यामुळे एकूणच हे भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत असल्याचेच शुभवर्तमान म्हणावे लागेल.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.