कैवल्यदाता श्रीराम!

    05-Jan-2023   
Total Views |

श्रीराम


रामावर, परमात्म्यावर विश्वास असणार्‍याच्या मनात खात्री असते की, राम माझा पाठीराखा आहे. तो शांत मनाने सकारात्मकतेने संकटाला सामोरे जातो व योग्य उपाययोजना करून त्यातून बाहेर पडतो. रामाच्या विश्वासाच्या आधारावर तो निर्भय जीवन जगतो. त्याला माहीत असते की, राम कैवल्यदाता आहे. मग सध्या संकटांची चिंता कशाला?



पल्यासारख्या सामान्य माणसांसाठी यापूर्वीच्या दहा श्लोकांतून स्वामींनी नामस्मरणाचे, रामनामाचे महत्त्व, त्याची सुलभता सर्व विशद करुन सांगितली. तसेच ‘विश्वास नामी धरावा’ असेही सांगून पाहिले, तथापि त्यावर आपला विश्वास बसेल आणि ते आपण आचरणात आणू, याबद्दल स्वामींना खात्री नाही. सामान्य माणसाच्या मनाची त्यांना कल्पना आहे. तसं पाहिलं तर व्यवहारातही बरीचशी कामे विश्वासावर होतात. प्रपंचात विवेकाने विश्वास ठेवून कामे करावी लागतात. तथापि कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून चालत नाही, हेही तितकेच खरे आहे. परमार्थात विश्वासाला, श्रद्धेला महत्त्व आहे. त्यामुळे तेथे अंधश्रद्धेलाही संधी मिळत असते, यासाठी स्वामी विवेकाला सर्व ठिकाणी प्राधान्य द्यायला सांगतात. परमार्थात काय किंवा प्रपंचात काय, विश्वास ठेवण्यासाठी दोन अटींची पूर्तता करावी लागते. एक म्हणजे, सांगणारी व्यक्ती विश्वास ठेवण्यायोग्य हवी आणि दुसरी म्हणजे जे सांगितले, त्याची प्रचिती आली पाहिजे. आता नामस्मरणाचे व रामनामाचे महत्त्व स्पष्ट करुन सांगणारे स्वत: समर्थ रामदास्वामी आहेत. त्यांच्या बाबतीत विश्वासार्हतेचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे सांगणार्‍याच्या विश्वासाची पहिली अट निकालात निघते. राहता राहिला प्रश्न प्रचितीचा, तर त्यात आपण कमी पडतो. कारण, आपले मन सदैव कामनेला चिकटलेले असते. मनात अनेक प्रकारच्या कामना, इच्छा, आशा-आकांक्षा घर करुन बसलेल्या असतात. त्यांना सोडून देता येत नाही आणि कामना इच्छा दूर सारल्याशिवाय भगवंताची खर्‍या अर्थाने भक्ती करता येत नाही, अशा विचित्र स्थितीत आपण अडकलेले असतो. यातून मार्ग कसा काढायचा, हे स्वामी पुढील श्लोकांत सांगत आहेत-

करी काम नि:काम या राघवाचें।
करी रुप स्वरुप सर्वां जीवाचें।
करी छेद निर्द्वंद्व हे गुण गातां।
हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होतां॥77॥


 
स्वामी सांगतात की, जेथे आपले मन कामना, इच्छेत गुंतलेले आहे, तेथे आपण रामाला पाहायचा अभ्यास करावा. जी कामना आहे, तेथे राघव असल्याने ती इच्छा मनाला चिकटत नाही. त्या ठिकाणी पवित्र अशा राघवाचे गुण आल्याने आपण निष्काम होतो. वासना किंवा इच्छेला भगवंतात विलीन केल्याने आपले काम हे निष्काम होऊ लागते. भगवंत पूर्ण काम असल्याने त्याच्या ठिकाणी काही मिळवावे, अशी इच्छा असत नाही. आपण अपूर्ण असल्याने आपली हाव कधी तृप्त होत नाही. मला सर्व मिळाले, यापेक्षा आणखी काही नको अशी अवस्था, आपण अपूर्ण असल्याने प्राप्त करता येत नाही. यासाठी आपण कामना राघवाकडे वळवली, तर तो पूर्णकाम असल्याने त्याची थोडीतरी निष्काम वृत्ती आपल्याला अनुभवता येईल, असे स्वामी या श्लोकात सांगत आहेत.
 
अध्यात्मातील शास्त्र विवेचनात अथवा तत्त्वज्ञानात परब्रह्म हे कल्पनेच्या तर्काच्या पलीकडे आहे, असे सांगितले जाते. अनेक घटनांचे ज्ञान आपण तर्काने आणि कल्पनेच्या साहाय्याने मिळवत असतो. आपल्या मनाला तशी सवय झालेली असते. अशा मनाला त्या पलीकडील विचार करायला सांगणे, हे कठीण असते. या जाणिवेने आपण अध्यात्म किंवा तत्त्वज्ञानातील प्रब्रह्माचा नाद सोडून देतो. परंतु, ते जाणणे हे अध्यात्मातील अंतिम साध्य आहे. त्यासाठी आपल्या कामना, इच्छा, आकांक्षा, वृत्ती सोडून देता येत नाहीत. त्या सोडून दिल्या, तर ‘आधी प्रपंच करावा नेटका’ या समर्थउक्तीस बाधा येते. तेव्हा आपल्या अंत:करणातील वृत्ती आहेत तशा मान्य करण्यावाचून गत्यंतर नसते. या वृत्ती आपल्याला ऐहिक विषयांकडे घेऊन जात असतात. तेथे आपली फसगत होते, विषयोपभोगातून मिळणारा आनंद फसवा असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. तो आनंद आहे, असे समजून त्याच्या जवळ जावे, तर त्यातील दु:खाचे पदर अनुभवास येतात. ऐहिकाचा विचार करता दु:ख सुखाचा सदरा घालून भेटत असते, याची जाणीव ठेवली जात नाही. अशा परिस्थितीत मनातील वृत्ती सोडून न देता त्यांना ऐहिकाकडून भगवंताकडे वळवले की, काम भागते. इच्छा-आकांक्षेत भगवंताला जोडले की, सगळीकडे भगवंताची, रामाची रुपे दिसू लागतात. आपण भगवंतासाठी काम करीत असतो. असे मानले की, ते निष्काम होऊन जाते.

अशा रितीने आपला जेथे जेथे संपर्क येतो तेथे राघवाचे स्वरुप पाहायला मिळते. मग त्या ठिकाणी विचारांचे द्वंद्व उरत नाही. अर्थात, त्यासाठी हरिकीर्तनात भगवंताचे गुण गात त्या वृत्तींवर विश्वास ठेवावा लागतो. भगवंताच्या गुणवर्णनात मन रमू लागले की, माणसाला भोवतालच्या परिस्थितीचे, देहाचे गांभीर्य राहत नाही. त्याचा विसर पडून मन रामनामाचे गुण गाण्यात, गुण आठवण्यात रमून जाते. त्यामुळे आपले मान-अपमान, निंदा-स्तुती, द्वेष-प्रेम, आपला-परका इत्यादी द्वंद्वे उरत नाहीत. त्यांचा त्रास मनाला होत नाही. मन कार्यक्षम व प्रसन्न राहते.

असं असूनही काही लोकांचा रामावर विश्वास नाही, त्याला काय म्हणावे... अशा माणसाला समर्थांनी पामर म्हणजे क्षुद्र म्हणून संबोधले आहे. ते पुढील श्लोक पाहा-
अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।
तया पामरा बाधिजे सर्व कांही॥
महाराज तो स्वामी कैवल्य दाता।
वृथा वाहणें देहे संसार चिंता॥

 
काही लोकांचा रामावर, देवावर विश्वास नसतो. ते देवाला मानत नाहीत आणि देवावर विश्वास ठेवणार्‍यांची टिंगलटवाळी करीत असतात. अशा पाखंडी माणसांबद्दल समर्थ म्हणतात की, असल्या पामराला, क्षुद्राला संकट आले की, सर्व गोष्टींची बाधा होते. कारण, त्याचा कशावरही विश्वास नसतो. रामावर, परमात्म्यावर विश्वास असणार्‍याच्या मनात खात्री असते की, राम माझा पाठीराखा आहे. तो शांत मनाने सकारात्मकतेने संकटाला सामोरे जातो व योग्य उपाययोजना करून त्यातून बाहेर पडतो. रामाच्या विश्वासाच्या आधारावर तो निर्भय जीवन जगतो. त्याला माहीत असते की, राम कैवल्यदाता आहे. मग सध्या संकटांची चिंता कशाला? कैवल्यदाता राम नक्कीच त्यातून मार्ग कसा काढावा, याचे मार्गदर्शन करतो. या उलट ज्याचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास नसतो, अशा माणसांवर संकट आहे, तर त्याचा आत्मविश्वास डळमळीत होतो. तो गोंधळून जातो. मन अशांत झाल्याने विचारांची योग्य दिशा त्याला सापडत नाही. यासाठी स्वामी सांगतात की, हा राम मोक्षदाता असल्याने आपण संसाराची व्यर्थ चिंता करण्याचे कारण काय? सर्व रामभक्तांचा दिलेला हा आश्वासक संदेश आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..