मुंबई (समृद्धी ढमाले) : मुंबईतून प्रथमच 'सी हेअर'च्या 'रॅग्ड सी हेअर' या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. सागरी संशोधकांना मरीन ड्राईव्हच्या समुद्र किनाऱ्यावर ही प्रजात आढळून आली. 'सी हेअर' हा समुद्र गोगलगायीचा एक प्रकार असून त्याला समुद्री ससा देखील म्हटले जाते.
खडकाळ समुद्र किनाऱ्यावरील छोट्या डबक्यांमध्ये सागरी सूक्ष्म जीवांची विविधता आढळते. मुंबईतही वांद्रे, गीता नगर, मरिन ड्राईव्ह, खार दांडा, जुहू या ठिकाणी खडकाळ किनार आहेत. ओहीटीदरम्यान खडकाळ किनाऱ्यावरील छोटी डबकी प्रकाशझोतात येतात. मरिन ड्राईव्ह येथील खडकाळ किनाऱ्यावरील अशाच एका छोट्या डबक्यामधून 'सी हेअर'च्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे. या प्रजातीचे नाव 'रॅग्ड सी हेअर' असे असून मरिन ड्राईव्ह येथील चार लादी नामक खडकाळ किनाऱ्यावर ती आढळून आली. 'कोस्टल काॅन्झर्वेशन फाऊंडेशन'चे प्रदीप पाताडे हे रविवारी चार लादी परिसरात निरीक्षणाकरिता गेले होते. त्यावेळी त्यांना ही प्रजात त्याठिकाणी आढळून आली. मुंबईतून प्रथमच 'रॅग्ड सी हेअर'ची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दै. "मुंबई तरुण भारत"शी बोलताना दिली. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत सागरी जैवविविधतेसंदर्भात जनजागृती झाली आहे. या जनजागृतीमध्ये 'मरीन लाईफ आॅफ मुंबई' या मोहिमेचा खारीचा वाटा आहे. या मोहिमेमुळे मुंबईतून आजवर कधीही न नोंदवलेल्या प्रजातींची नोंद होत आहे.
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत ‘सी हेअर्स’ तीन प्रजातींचा अधिवास आढळून येतो. यामध्ये ‘रॅग्ड सी हेअर’चा देखील समावेश आहे. 'सी हेअर'चा समावेश सागरी जीवांमधील 'मोलुस्का' संघातील 'गॅस्ट्रोपाॅड' वर्गात होतो. आपण यांना सर्वसामान्यपणे शंख-शिंपले म्हणून ओळखतो. 'मोलुस्का' संघातील प्राण्यांचे वर्गीकरण शंख शिंपल्याच्या प्रकारानुसार केले जाते. कॅल्शियम कार्बोनेटच्या आवरणामुळे या प्राण्यांना संरक्षण मिळते. मात्र, 'सी हेअर'च्या प्रजातींमध्ये कॅल्शियम कवच खूपच छोटे किंवा शरीराच्या आत असते. 'सी हेअर'च्या गोलाकार आणि डोक्यावर असलेल्या गोलाकार अवयवांमुळे ते सशासारखे दिसतात. आणि म्हणूनच त्यांना ‘सी हेअर’ असे बोलले जाते. ‘सी हेअर्स’ स्वतःला शत्रूपासून संरक्षणासाठी समुद्रातील लांब प्रवाळांना लपेटून घेतात.
“हंगामानुसार 'रॅग्ड सी हेअर' ही कोकण किनारपट्टीवर सामान्यपणे दिसणारी 'सी हेअर' आहे. विशेषत: कोकणात 'रॅग्ड सी हेअर' या हजारांपेक्षा अधिक संख्येने एकत्रित आलेल्या दिसू शकतात." - डाॅ.दिपक आपटे, ज्येष्ठ सागरी संशोधक