राजेश खन्ना राहतो यांच्या घरी...

    03-Jan-2023   
Total Views |
विलास राजा घाटे

प्रतिभावान अभिनेता राजेश खन्ना यांचा जीवनपट विविध स्वरूपात जपून घरातच ‘खन्नाज खजाना’ जपणारे कलंदर असामी विलास राजा घाटे यांच्याविषयी...


प्रसिद्धीपराङ्मुख छंदिष्ट अवलिया विलास घाटे मूळचे मुंबईकर असून गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यात वास्तव्यास आहेत. त्यांचे प्राथमिक आणि उच्चशिक्षण मुंबईत झाले. कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांच्या आई-वडिलांचा मुंबईत फोटो स्टुडिओ होता, तर वडिलांचे वडील मूर्ती घडवत आणि त्यांचे वडील चित्रकार, तर आईकडेही कलेची दृष्टी होती. जे. जे. कला महाविद्यालयातून ‘कमर्शिअल आर्टिस्ट’ची पदवी मिळवल्यानंतर विलास यांनी सुरुवातीला बड्या इंग्रजी दैनिकात जाहिरात विभागात काम केले. त्यानंतर एका जाहिरात एजन्सीत ’आर्ट डिरेक्टर’ आणि फोटोग्राफी विभागात ते रुजू झाले.

फोटोग्राफीच्या माध्यमातून आजवर त्यांनी फॅशन, ग्लॅमर, अ‍ॅडव्हर्टायझिंग, क्रिएटिव्ह, स्टील, इंडस्ट्रियल क्षेत्रात आपल्या या कलेची पताका फडकत ठेवली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या हजारो चाहत्यांमध्ये त्यांच्या आईचाही समावेश होता. वयाच्या दहाव्या वर्षी वाढदिवसाला वडिलांनी राजेश खन्नांचा फोटो भेट दिला होता. त्याचवर्षी ’बहारो के सपने’ हा चित्रपट पाहिल्यानंतर विलास राजेश खन्नाच्या प्रेमातच पडले. वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी ‘नटराज’ स्टुडिओत ’अमरप्रेम’ सिनेमाचे चित्रीकरण पाहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर विलास यांनी राजेश खन्ना यांच्याशी संबंधित गोष्टींचा संग्रह करण्यास सुरुवात केली.
 
लहानपणी विलास यांना दुर्मीळ ‘स्टॅम्प’ गोळा करणे, शिवकालीन नाण्यांचा संग्रह करण्याबरोबरच राजेश खन्नांच्या विविध फोटो, कलाकृती व त्यासंबंधित कात्रणे गोळा करण्याचा छंद जडला. मजल-दरमजल करता करता राजेश खन्ना यांचे एक-दोन नव्हे, तर पाच हजारांहून अधिकचे ‘कलेक्शन’ त्यांनी गोळा केले. आज ठाण्यातील लुईसवाडी येथील त्यांचे घर एक छोटेखानी म्युझियमच बनले आहे. या म्युझियममध्ये केवळ आणि केवळ राजेश खन्ना-हिंदी सिनेसृष्टीचा पहिला सुपरस्टार! ते चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी म्हणजे १९६५ पासून २०१२ मध्ये ते जगाचा निरोप घेईपर्यंतच्या काळातील सर्व घटना आणि घटनाक्रम विलास घाटे यांना मुखोद्गत आहे. घाटे यांच्या घरात अनेक गोष्टी आहेत, ज्या खचितच राजेश खन्ना यांच्या घरातही सापडल्या नसत्या. आता तर राजेश खन्नांचे ’आशीर्वाद’ हे घरही उरले नसल्याची खंत ते व्यक्त करतात.

राजेश खन्ना यांनी स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी असलेले रंगीत पोस्टकार्ड वाढदिवसाची भेट म्हणून त्यांना दिले होते. १०० रुपयांच्या नोटेवर राजेश खन्ना यांची स्वाक्षरी आहे. पुढे शक्ती सामंता यांचा कॅमेरामन रॉबिन कार आणि राजेश खन्ना यांचे निकटवर्तीय भूपेश रसीन यांच्याशी योगायोगाने झालेल्या ओळखीमुळे घाटे यांची राजेश खन्ना यांच्याशी गट्टी जमली. राजेश खन्ना यांच्याशी लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर डिंपल हिने एका पोस्टरवर ‘डिंपल खन्ना’ अशी केलेली दुर्मीळ स्वाक्षरी घाटे यांच्या संग्रही आहे. विलास घाटे यांच्या संग्रहाबद्दल इंग्रजी वृत्तपत्रातील बातमी वाचून राजेश खन्ना यांनी ’वफा’ चित्रपटाच्या ’ऑडिओ रिलीज’ पार्टीचे निमंत्रण दिले. त्यावेळी “आशीर्वाद बंगल्यात म्युझियम उभारायचे आहे आणि त्यात तुम्हालाही सहभागी करून घेईन,” असे राजेश खन्ना यांनी सांगितल्याची आठवण ते जागवतात. यामुळे २०१८ साली त्यांना ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले असून पडद्यावरील तसेच पडद्यामागील राजेश खन्ना यांच्यावरील साहित्याचा संग्रह गेली ५४ वर्षे करीत असल्याने आता ते ‘गिनीज बुक’मध्ये नोंद होण्यासाठी धडपडत आहेत.

’मी पाहिलेला राजेश खन्ना’ हे एकपात्री ‘टॉक शो’ ही घाटे यांनी केले असून पुन्हा हा उपक्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. याशिवाय ’खन्नाज खजाना’ या शीर्षकाने युट्यूबवर ते राजेश खन्ना उलगडतात. राजेश खन्नांबद्दल लोकांचे अनेक गैरसमज आहेत. ते आढ्यताखोर, अहंमन्य, अहंकारी, स्तुतिप्रिय होते, असे अनेक आरोप त्यांच्यावर होत. पण, प्रत्यक्षात तसे नसल्याचे घाटे ठामपणे नमूद करतात. खन्ना कुटुंबीयांनी हा संग्रह तुमच्याकडे मागितला तर तुम्ही तो द्याल का ? असे विचारताच घाटे उद्विग्नपणे म्हणाले, ‘’ते मागणारच नाहीत. त्यांना राजेश खन्ना यांच्याविषयी प्रेम आणि आस्था असती तर काकाजींच्या स्मृती त्यांनीच जतन केल्या असत्या.”

घाटेंकडे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांतील जवळपास पाच हजार लेख आणि मुलाखतींची कात्रणे तसेच राजेश खन्ना यांची स्वाक्षरीही आहे. त्यांच्या १६५ पैकी १३० चित्रपटांच्या सीडी किंवा डीव्हीडी, त्यांच्या चित्रपटांतील गाण्यांच्या असंख्य रेकॉर्ड व कॅसेट आहेत. ’आनंद’ मधील संवाद असलेली एलपी रेकॉर्ड आहे. या संग्रहासाठी घाटेंनी हजारो रुपये आणि शेकडो तास खर्च केले आहेत. यासाठी त्यांची पत्नी व कुटुंबातील सदस्यांनीही मोलाची साथ दिल्याचे ते सांगतात. हा दुर्मीळ संग्रह त्यांच्या घरी येऊन कुणीही कधीही पाहू शकतो. शाळेतील विद्यार्थ्यांना राजेश खन्ना काय होते, हे सांगण्याची इच्छा ते व्यक्त करतात. अशा या मुलखावेगळ्या चाहत्याला पुढील वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.