नवी दिल्ली : “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला अटक करण्याची ‘सुपारी’ मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती. मला हरतर्हेने अडकविण्याचा आदेश ‘वरून’ देण्यात आला होता,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.२४ रोजी दिल्ली येथे केले. त्यामुळे असा आदेश ‘वरून’ म्हणजे ‘मातोश्री’तून आला की ‘सिल्व्हर ओक’वरून, याचे गूढ वाढले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी दिल्ली दौर्यावर होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील साखर आणि सहकार क्षेत्रास बळकटी देण्यासाठी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली.
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळात त्यांना अटक करण्यात येणार असल्याबद्दल सांगितले. ते म्हणाले, “मविआ सरकारचा मला अटक करण्याचा डाव होता. माझ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून मला अडकविण्याची सुपारी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती. मात्र, अनेक प्रयत्न करूनही मला अडकविणे त्यांना शक्य झाले नाही. मला अटक करण्याचा आदेश तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा नव्हता. मात्र, तसा आदेश ‘वरून’ देण्यात आला होता,” असे फडणवीस म्हणाले.
राज्यपालांनी फडणवीस-शिंदे यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले नसल्याचे माहिती अधिकारांतर्गत पुढे आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे. त्याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या उत्तरामध्ये असे सांगण्यात आलेले नाही. त्या उत्तरात सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्याने सरकार स्थापनेसंबंधीची सर्व कागदपत्रे ही राज्यपालांच्या ताब्यात आहेत. ती कागदपत्रे राज्यपाल कार्यालयात नाहीत असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या उत्तराचा अर्थ आम्हाला निमंत्रणच नव्हते,” असा होत नाही. राज्यपालांनी लेखी निमंत्रण दिल्यानंतरच आमचे सरकार स्थापन झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
सहकार क्षेत्राच्या बळकटीविषयी सविस्तर चर्चा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत राज्यातील साखर आणि सहकार क्षेत्राविषयी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, “साखर कारखाने कर्जाची पुनर्रचना, आयकर धोरण आणि इथेनॉल अनुदान याविषयी केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून येत्या आठवडाभरात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन शाह यांनी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.”
निवडणूक आयोग आम्हाला न्याय देईल : एकनाथ शिंद शिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी केंद्रीय निवडणूक आयोगात सोमवार, दि. ३० जानेवारी रोजी निर्णय येण्याची शक्यता आहे. त्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी पूर्ण झाली असून आता अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. लोकशाहीमध्ये संख्याबळास महत्त्व असते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य स्थापन झाले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये नक्कीच कायदा आणि मेरिटनुसार निर्णय होईल,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.