मुंबई : राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड मंतदाररसंघातील पोटनिवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीतील मतदानाची तारीख बदलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात माहिती दिली आहे. २७ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता २६ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.
बारावी आणि इतर परीक्षा असल्यामुळे मतदानासाठी केंद्र उपलब्ध होणे अवघड आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी एक दिवस आधीच मतदान घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे आता कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होईल. या पोटनिवडणुकीचा निकाल ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजीच जाहीर होणार आहे.
राजकीय पक्षांकडून चाचपणी..
कसबा पेठ मतदारसंघातील भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे दिवंगत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पश्चात होणारी निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. मुक्ता टिळक आणि लक्षमन जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. परिणामी या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक होत असून या जागा बिनविरोध आणण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतु, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष पोटनिवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. पूर्वेतिहास पाहता भाजपने अंधेरी पोटनिवडणूक न लढवता ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा करून दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडी राजकीय संस्कृति जपत निवडणुका बिनविरोध करते की आमदारांची संख्या वाढवण्यासाठी नितीमत्तेला तिलांजलि देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.