‘व्रतस्थ’ समर्थ भक्ताचा जीवनपट उलगडून दाखवणारे पुस्तक

    21-Jan-2023
Total Views |
book  samarthavrati sunil chincholkar


समर्थ रामदास यांनी श्रीराम भक्तीतून शक्तीचे जागरण केले होते. ‘व्रतस्थ’ युवकांचे संघटन उभारले होते. संघटनेच्या आधारे सशक्त समाजाच्या उभारणीतून राष्ट्र बळकट करण्याचे सूत्र मांडले होते. प्रपंच आणि परमार्थ याच्या संतुलनावर नेमकेपणाने त्यांनी भाष्य केले होते. श्रीरामाचे कार्य पुढे नेण्यासाठी एक कार्यपद्धती निर्माण केली होती. त्यातून समर्थांचे अनेक शिष्य तयार झाले होते. समर्थ व्रत पुढे नेण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तीच परंपरा पुढे नेणार्‍यांतील एक अग्रणी नाव सुनील चिंचोलकर. ‘समर्थव्रती’ हे विशेषण सर्वार्थाने सुनील चिंचोलकर यांच्यासाठी योग्य ठरते.




श्वास, ध्यास आणि कृती समर्थमय झालेल्या सुनील चिंचोलकर यांनी संत रामदास यांचे विचार प्रभावीपणे मांडले होते. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हा समर्थांचा गुण विशेष आणि त्याच्यासोबत उत्कटता यातून व्यक्त होणारे सुनील चिंचोलकर हे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व होते. जगरहाटीत मिसळलेले, संसारात रमलेले आणि तरीही संन्यस्तपणे वावरणार्‍या सुनील चिंचोलकर यांनी समर्थ कार्याचा नंदादीप पेटता ठेवला होता.

समर्थभक्तीने भारलेले आणि तरीही अखंड सावध असणार्‍या सुनील चिंचोलकर यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त पुस्तक प्रकाशित करण्याची योजना ‘मोरया प्रकाशना’ने आखली. सुनील चिंचोलकर यांचे उचित स्मरण करण्यासाठी त्यांचे मित्र आणि समविचारी दिलीप महाजन यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. सुनील चिंचोलकर यांची मुलगी डॉ. अपर्णा चिंचोलकर - गोस्वामी हिने यात सहकार्य केले. यातून ‘समर्थव्रती सुनील चिंचोलकर’ हे पुस्तक तयार झाले आहे. या पुस्तकासाठी स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अध्यक्षतेखाली 26 जणांची समिती नेमली होती. सुनील चिंचोलकर यांचे कुटुंबीय यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा यात समावेश होता. यातून ‘समग्र सुनील चिंचोलकर’ मांडण्याची योजना तयार करण्यात आली.

सुनील चिंचोलकर यांच्याशी जोडलेल्या विविध घटना, प्रसंग, आठवणी, त्यांची प्रवचनं आणि लिखाण याचे संकलन करण्यात आले. त्याचे संकलन करून दिलीप महाजन आणि डॉ. अपर्णा चिंचोलकर गोस्वामी यांनी ‘समर्थव्रती सुनील चिंचोलकर’ पुस्तक लिहिले आहे. ‘समर्थव्रती’ हे पुस्तक तीन भागांत आहे. पहिल्या भागात पाच प्रकरणांत सुनील चिंचोलकर यांचे बालपण, शिक्षण, जडणघडण, समर्थ संस्काराचा झालेला स्पर्श, पुण्यात निवास आणि सांसारिक जीवनाची घडी याची माहिती आहे. दुसर्‍या भागात 16 प्रकरणात प्रत्यक्ष समर्थकार्याचा आढावा घेतलेला आहे. तिसर्‍या प्रकरणात आध्यत्मिक आणि अन्य क्षेत्रातील जाणकारांनी सुनील चिंचोलकर यांच्या गुणांवर भाष्य केले आहे. स्वामी गोविंददेव गिरी, चैतन्यमहाराज देगलूरकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, ‘पद्मश्री’ निवेदिता भिडे, मोहनबुवा रामदासी, डॉ. अशोक कामत अशा 15 जणांनी लिहिले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. विवेकानंद केंद्र, रामकृष्ण मठ याच्याशी संबंधित असलेल्या सुनील चिंचोलकर यांचा जन्म 1951 साली झाला होता. 2018 साली त्यांचे निधन झाले. शालेय शिक्षण मनमाड येथे तर महाविद्यालयीन शिक्षण बारामती येथे पूर्ण करून वालचंदनगर येथे शिक्षक म्हणून तीन वर्ष नोकरी केली होती. त्यानंतर 12 वर्ष सज्जनगड येथे व्यवस्थापक म्हणून सुनील चिंचोलकर यांनी काम केले. सज्जनगड आणि ‘रघुवीर समर्थ’ मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली होती. सज्जनगड येथून पुण्यात आल्यावर साधारण पाव शतक त्यांनी आध्यात्मिक विचारांच्या प्रसाराला वाहून घेतले होते. महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर तसेच, विदेशात सुमारे 12 हजार प्रवचने सुनील चिंचोलकर यांनी दिली होती. एकूण 45 मराठी पुस्तक लिहिणार्‍या सुनील चिंचोलकर यांच्या आठ पुस्तकांचा हिंदीत, तीन पुस्तकांचा इंग्रजीत, तीन पुस्तकांचा कानडीत आणि एक पुस्तकाचा जर्मनीत अनुवाद झाला आहे.


11 मानाचे पुरस्कार मिळवणार्‍या सुनील चिंचोलकर यांनी विविध दैनिकात लिखाण केले होते. 1951 ते 2018 असा सुनील चिंचोलकर यांचा जीवनपट ‘समर्थव्रती सुनील चिंचोलकर’ या पुस्तकातून सुलभतेने रेखाटलेला आहे.पुस्तकाचे अचूकतेने संपादन करणार्‍या दिलीप महाजन यांनी मनोगतातून आपल्या कर्तृत्ववान मित्राचे केलेले वर्णन भावस्पर्शी आहे. डॉ. अपर्णा चिंचोलकर गोस्वामी यांनी आपल्या वडिलांविषयी केलेल्या भावना हृदय आहेत. चिंचोलकर-गोस्वामी कुटुंबावर झालेला वज्राघात आणि त्यातून सावरत उभे राहाणे या कसोटीच्या काळातील वडील-मुलीच्या नात्यातील हळवेपण आणि समजूतदारपणाची भावना याचे पुस्तकातील चित्रण परिणामकारक आहे.



डॉ. अपर्णा हिचा नवरा आणि सुनील चिंचोलकर यांचा जावई भास्कर यांचे अपघाती निधन हा कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य ही समर्थ भक्तीची प्रचिती आहे. पुण्यात आलेल्या आसामी मुलाशी शिक्षणाच्यानिमित्त अपर्णा हिचे जुळलेले प्रेम, त्याला सुनील चिंचोलकर यांनी दिलेली साथ, पुणे ते आसाम असा झालेला प्रवास आणि बंगळुरु येथील वास्तव्य, यासह अन्य घटनांतून दिसणारे गृहस्थाश्रमी सुनील चिंचोलकर वाचकांना प्रभावित करतात. 300 पानांपेक्षा अधिक पानांचे हे पुस्तक ‘एक जीवन-एक मिशन’ याची गोष्ट सांगणारे आहे. समर्थ भक्तीच्या मार्गावर चालताना आपल्या दैनंदिन व्यवहारातून, सामाजिक कामातून ‘समर्थव्रती’पर्यंत असे एक वेगळे प्रवासवर्णन असे पुस्तकाचे स्वरूप आहे.


पुस्तकाचे नाव : समर्थव्रती सुनील चिंचोलकर


लेखक : दिलीप महाजन, डॉ. अपर्णा गोस्वामी - चिंचोलकर

 
प्रकाशन : मोरया प्रकाशन, डोंबिवली

 
मूल्य : 250 रुपये

 
पुस्तकासाठी संपर्क : 8850247110



-मकरंद मुळे