होय, आम्ही हिंदूच!

    21-Jan-2023   
Total Views |
चेतना परिषद

रविवार, दि. १५ जानेवारी रोजी ‘जनजाती विकास मंच’ आयोजित पालघर जिल्ह्याची चौथी ‘चेतना परिषद’ डहाणूच्या कडकून येथील पांचाळ हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. मध्य प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव आणि राजा इमलाई जबलपूर राज परिवाराचे लक्ष्मण राज सिंह मरकाम यावेळी उपस्थित होते. या परिषदेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. त्यानिमित्ताने या परिषदेचा इतिवृत्तांत...

एक साधा भोळा माणूस होता. त्याच्या बकरीवर गावातील काही दुष्टांचा डोळा असतो. ती चांडाळचौकडी ठरवते आणि कटकारस्थान रचते. एकेदिवशी तो माणूस बाजारात त्याची बकरी विकण्यासाठी जात असतो, तर चांडाळचौकडीतला एक माणूस म्हणतो, “काय राव, हा कुत्रा घेऊन कुठे निघालात?” बकरीवाल्या माणसाला वाटते, “अरे माझ्याकडे बकरी असताना हा कुत्रा का म्हणतो?” पुढेही या चौकडीतले लोक त्याच्यासमोर त्याच्या बकरीला कुत्राच म्हणतात.ठामपणे सांगतात की, त्याने कुत्रा सोबत घेतला, बकरी नाही. हा माणूस म्हणतो, बाकी इतके जण म्हणतात, म्हणजे ही बकरी नसणारच, कुत्राच असेल. तो असा संभ्रमित अवस्थेतअसतानाच चांडाळचौकडीचा म्होरक्या शेवटची खेळी खेळतो. तो या माणसाला सांगतो, “अरे रे, तू या कुत्र्याला कशाला स्वतः सोबत वागवतोस? तो कुत्रा मला दे आणि हो मोकळा!” हा माणूस विचार करतो, खरेच आहे कुत्र्याला सोबत घेण्यापेक्षा याला देऊन टाकावा. इतक्यात एक सज्जन व्यक्ती येते. तिला चांडाळचौकडीचा डाव कळतो.



 ती त्या माणसाला म्हणते, “अरे, नीट डोळे उघड, हा कुत्रा नाही, ही बकरीच आहे. या सगळ्यांनी त्यांचा फायदा व्हावा आणि तुझे नुकसान व्हावे म्हणून तुला भ्रमित केले आहे. सावध हो, जागृत हो, तुझ्याकडे बकरीच आहे, कुत्रा नाही.” तो सज्जन त्या माणसाला बकरी आणि कुत्रा भेद समजावून सांगतो. तेव्हा कुठे त्याला खात्री पटते की, हो त्याच्याकडे बकरीच आहे, तर बांधवांनो, आपल्या समाजाचेही असेच झाले. त्यांनी आपल्याला आपण कुणी तरी वेगळे आहोत, अतिशय मागास आहोत, समाजप्रवाहात नाही, हे सांगितले आणि आपल्यातले काही जण त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपल्यातल्या स्वगुणाची ओळखच विसरलो. आपल्याकडे गुण आहेत ते ओळखा.तुमच्याकडे कर्तृत्व रचण्याची शक्ती आहे.




 कुणी म्हंटले की नाही नाही, तुम्ही ना रावणाचे वंशज आहात, तर काही लोक लगेच हे खोटे विधान स्वीकारतात. आपण रावणाचे वंशज नाहीत, आपण म्हैशासुराचे वंशज नाहीत, तर आपण प्रभू श्रीरामाच्या वनवासात त्याला साथसोबत करणारे आहोत. आपले नाते प्रभू श्रीरामचंद्रांशी आहे. आपण हिंदू आहोत, नव्हे आपण हिंदूच आहोत, असे मध्य प्रदेश मुख्यंत्री कार्यालयाचे उपसचिव आणि राजा इमलाई जबलपूर राज परिवाराचे लक्ष्मण राज सिंह मरकाम यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा एकच गजर केला. ‘जनजाती विकास मंच’ आयोजित ‘चेतना परिषद’मध्ये ते आपले मनोगत व्यक्त करत होते.या परिषदेच्या सुरुवातीला भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष होते उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजित गोवारी. परिषदेची दोन सत्रात विभागणी होती.




पहिल्या सत्राचे अध्यक्ष होते डॉ. प्रशांत कनोजा आणि विशेष अतिथी होते अ‍ॅड. रवींद्र वैजल. पहिल्या सत्राचे उद्घाटन प्रदीप डोल्हारे, साहाय्यक गटविकास अधिकारी, वसई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जव्हार येथील मातोश्री रुग्णालयाच्या बालरोगतज्ज्ञ जयश्री भुसारा भोये यांना आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ‘विकास मंचा’चे सचिव छगन वावरे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी केलेले प्रास्ताविक म्हणजे पुढे होणार्‍या परिषदेतील विषयांची एक झंजावाती सुरुवातचहोती. वनवासी हे हिंदूच आहेत. आपल्या मौखिक पारंपरिक गीतांमध्ये पिढ्यान्पिढ्या राम-लक्ष्मण-सीतेच्या नावाचा जीवनचरित्राचा गौरव केला आहे, हे त्यांनी रसदारपणे मांडले. ते म्हणाले, ”आपली संस्कृती आपली परंपरा सांगते की, आपण हिंदू आहेात. तुम्ही हिंदू नाही, असे सांगून आपल्या जनगणनेमध्ये इतर धर्म लिहा सांगणार्‍यांना आपण सांगू या की, आम्ही हिंंदूच आहोत.”



यानंतर मंचाचे अध्यक्ष नरेश मराड यांनी वनवासी हा हिंदूच आहे, हे सप्रमाण सिद्ध केले. अतिशय ओघवत्या रसाळ भाषेत ते म्हणाले की, ”हिंदू धर्मातील १६ संस्कार आपल्याही जीवनाचा पवित्र भाग आहेत. हिंदू मूर्तिपूजा करतात. आपण ही हिंदूच आहोत म्हणून आपणही मूर्तिपूजा करतो. आपल्या सलद मध्ये (चांदीचे देव ठेवण्याचा छोटा करंडा) आपले देव आहेत. त्या तर मूर्तीच आहेत. आपण एकच नाही, तर कितीतरी देवांची पूजा करतो. आपण जर मुस्लीम किंवा ख्रिश्चन असतो, तर एकाच कुणाची तरी पूजा केली असती. मात्र, आपण हिंदूंप्रमाणे अनेक देवतांना मानतो आणि मूर्तीपूजकही आहोत. याचाच अर्थ आम्ही कुणी वेगळे नाहीत, आम्ही हिंदूच आहेात. शंकर-पार्वती, राम-सीता हे तर हिंदू धर्मातील दैवत. त्यांना आपल्या गीतांमधून पिढ्यान्पिढ्या पूजतो. मग आपण हिंदू कसे नाहीत?”


पहिल्या सत्रानंतर चहापान झाले आणि मग दुसरे सत्र सुरू झाले. या सत्राचे अध्यक्ष होते अध्यक्ष डॉ. संजय लोहार, तर विशेष अतिथी होते उपक्रमशील शेतकरी सुनील कामडी. यावेळी कृतिशील मार्गदर्शन केले ते संतोष जनाठे यांनी. भोळ्याभाबड्या समाजबांधवांना फसवून, चिथवून त्यांचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र रचले जाते. त्यावेळी ‘जनजाती विकास मंच’ पूर्ण ताकदीनीशी ते षड्यंत्र कसे हाणून पाडते, याबाबत त्यांनी सत्य घटना सांगितल्या. ही ‘जनजाती चेतना परिषद’ कशासाठी, असे विचारले असता भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याचे जिल्हा संघटन सरचिटणीस आणि वनवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे आणि ‘चेतना परिषदे’च्या मान्यवरांनी सविस्तर उत्तरच दिले. त्याचा सारांश असा की, या जनजाती चेतना परिषदेचे आयोजन का करायचे, तर गौरवशाली इतिहासातून प्रेरणा जागवण्यासाठी, आपल्या रूढी- परंपरांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी, स्वतंत्र धर्मकोड प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी, बोगस वनवासींवर चर्चा व समान जागृतीसाठी, पाचवी अनुसूचीतील वास्तव उकलण्यासाठी, ‘पेसा सामूहिक वनहक्क’ संकल्पना समजण्यासाठी, मूलनिवासी वनवासी व युनोतील प्रश्न समजण्यासाठी, शासकीय सुविधा व त्यांची अंमलबजावणी लक्षात घेण्यासाठी, जनजाती समाज विकासापासून मागे का आहे, हे पाहण्यासाठी...




या अनुषंगाने परिषदेचे प्रमुख वक्ते लक्ष्मण मरकम यांच्या अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यानातून खूप काही गोष्टी नव्याने समजल्या. जसे की, १९९१ ते २०११च्या काळात आपण हिंदू नसून इतर धर्मीय आहोत,असे नोंद जनगणना नोंदणीत मांडणार्‍यांचे प्रमाण कसे आणि का वाढले ते. १९९१ ते २०११ या काळात झारखंडमध्ये सरणा सारीधर्म म्हणून नोंद करणार्‍यांचे प्रमाण १९३.५ टक्के, छत्तीसगढ सरणा-गोंड नोंद करण्याचे प्रमाण १६५ टक्के, पश्चिम बंगालमध्ये सरणा-सारी नोंद करणार्‍यांचे प्रमाण १०८ टक्के, ओडिशामध्ये सरणा-सारी धर्म नोंदण्याचे प्रमाण २०.३ टक्के, मणिपूरमध्ये सनामाही लिहिण्याचे १५६१.९ टक्के, महाराष्ट्रमध्ये गोंड गोंडी धर्म लिहिणार्‍यांचे प्रमाण ७९.४ टक्के, पंजाबमध्ये रावीदासी लिहिण्याचे प्रमाण ११३२.६ टक्क्यांनी वाढले, तर मेघालयमध्ये गारो खांसी, परहार, जंयतीया लिहिण्याचे प्रमाण -१३.५ टक्क्यांने घटले.



 आसाममध्ये सनामाही डोनिपोले लिहिण्याचे प्रमाण-८०.४ टक्क्याने घटले. बाकीच्या राज्यात वनवासींनी अन्य धर्मीय म्हणून आपली नोंद करण्याचे प्रमाण वाढले, तर मेघालय, आसाममध्ये ते कमी का? कारण, तिथे वेगाने वनवासींचे ख्रिस्तीकरण होत आहे. आकडेवारी पाहिली, तर समजेल की, अरुणाचल प्रदेश ४० टक्के, आसाम ३० टक्के, मणिपूर ८० टक्के, नागालँड ९२ टक्के, मिझोराम ९६ टक्के, त्रिपुरा ३० टक्के, मेघालय ७० टक्के. या राज्यांत वनवासी मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन झाले. इथे कुणीही ‘ओआरपी’च्या सात नंबरच्या रकान्यात वेगळा धर्म लिहा, अशी चळवळ करत नाही. याचाच अर्थ ख्रिस्ती न झालेल्या आमच्या भोळ्याभाबड्या वनवासी समाजाने स्वतःलाहिंदू म्हणू नये म्हणून त्यांना चिथवले जाते, बळी पाडले जाते, हे सप्रमाण सिद्ध होते. पुढे मरकम यांनी रावणाला पूर्वज मानणार्‍या ढोंगी लोकांचेही बुरखे पाडले. ते म्हणाले, ”रावण हा वनवासींचा पूर्वज कसा असू शकेल? कारण, रावणाने अनेक ग्रंथ लिहिले. त्यात तो स्वत:लावनवासी म्हणवून घेत नाही. तसेच, त्याचे पूर्वज फलुस्ती हे काही वनवासी नव्हते. मग हे काही खोटारडे लोक आपल्या लोकांना रावण आपला वशंज आहे, हे का सांगतात? आणि आपलेही लोक हे खरे कसे मानतात?




रावण आणि महिशासूर हे दानव आहेत, राक्षस आहेत. ते आमच्या सालस, सभ्य आणि संस्कृतीप्रिय वनवासी बांधवांचे पूर्वज असतील का? तर शक्यच नाही.आपण स्वतः गोंड समाजातील असून, आपलावनवासी समाज हा संपन्न होता. मात्र, परकीय आक्रमणांमुळे समाजावर आघात होत गेले. इंग्रजांनी वनसंपत्ती लुटण्यासाठी आपल्या समाजाला प्रवाहाबाहेर फेकण्याचे क्रूर कृत्य केले, असेही लक्ष्मण मरकम यांनी सांगितले. ख्रिश्चन झालेले वनवासी खर्‍या वनवासी बांधवांचा हक्क लुटतात, हेसुद्धा त्यांनी सिद्ध केले. तसेच, अशा धर्मांतरित झालेल्या वनवासींना आरक्षणाचा हक्क मिळू नये, यासाठी ‘डिलिस्टिंग’ची चळवळ सुरू आहे. जर ही चळवळ यशस्वी झाली, तर ख्रिश्चन झालेल्या वनवासींना आरक्षणामधून हटवले जाईल. ते तसे होऊ नये म्हणून मग ते लोक खर्‍या वनवासींना ‘तुम्ही हिंदू नाहीत’ हेसुद्धा त्यांनी सहज भाषेत मांडले.



असो. ही ‘जनजाती चेतना परिषद’ आयोजित करणार्‍या सगळ्या सदस्यांचे अभिनंदनही करायला हवे. कारण, डाव्या कंपूने, त्यातही कम्युनिस्टांनी वनवासी बांधवांचे काढलेले मोर्चे आणि सभा मी पाहिल्या आहेत. त्यांच्या आंदोलनामध्ये, सभेमध्ये ज्यांना पाहून दया येईल, व्यवस्थेबद्दल चीड येईल, अशा वृद्ध, विकलांग किंवा बापुडवाण्या लोकांना धरून बांधून एकत्रित केले की, काय अशी शंका यावी, असे दृश्य असते. नव्हे,या आंदोलनाला गेल्यानंतर बिगर वनवासी समाजाच्या माणसाला वाटावे की वनवासी म्हणजे गरीबच, दुःखीच, कुपोषित किंवा समस्यांनीग्रस्तच. मात्र, या परिषदेमध्ये वनवासी समाजातील उच्चशिक्षित आणि कर्तृत्ववान असे शेकडो बंधू- भगिनी एकत्रित आल्या होत्या. स्वतःला ‘महापुरोगामी’ समजणार्‍या काही संस्थाही वनवासी बांधवांसाठी अशा परिषदा घेतात बरं का?




पण, तिथे उपस्थित राहणार्‍या वनवासीबांधवांसाठी इतक्या चांगल्या प्रकारचे नियोजन होताना पाहिलेले नाही. सुसज्ज सभागृह, सुंदर आकर्षक बैठक योजना, वीज मध्येच गेली, तर कार्यक्रमाला अडथळा येऊ नये, म्हणून शक्तीशाली जनरेटरची व्यवस्था, चहा-नाश्ता आणि सुग्रास पंचपक्वांनाच्या जेवणाची व्यवस्था. परिषदेचा दिवस सणाचा आहे आणि परिषदेमध्ये सहभागी झालेले आपले स्नेही पाहुणेरावळे आहेत, असाच एकंदर थाट! छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, प. बंगाल आणि महाराष्ट्रातल्याही काही दुर्गम भागातील वनवासी समाजातील काही व्यक्तींना ‘आम्ही हिंदू नाहीच’ असे अतिशय रागाने म्हणताना मी पाहिले होते. ते असे का करत असतील? त्यांना सत्य कसे सांगायचे की, बाबांनो आपण सारे हिंदूच आहोत, हा प्रश्न पडला होता. या ‘चेतना परिषदे’ने याबाबतची जागृती झाली, हे नक्की!







आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.