श्रीलंकन अर्थव्यवस्थेस गुंतवणूकीसाठी भारत प्रोत्साहन देणार – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

    20-Jan-2023
Total Views |

एस. जयशंकर


 
नवी दिल्ली: भारत श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेस बळकटी देण्यासाठी ऊर्जा, पर्यटन आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यास सज्ज आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी कोलंबो येथे केले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. दौऱ्यामध्ये त्यांनी श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांच्यासोबत चर्चा केली, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेस संबोधित केले. यावेळी परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, भारत श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत, विशेषत: ऊर्जा, पर्यटन आणि पायाभूत सुविधांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये मोठ्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल. व्यवसाय-अनुकूल वातावरण प्रदान करण्यासाठी आम्ही श्रीलंका सरकारवर भारताचा विश्वास आहे. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य येथील धोरणकर्त्यांनी लक्षात घेतले असल्याची खात्री वाटत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. यावेळी जयशंकर यांनी श्रीलंकेत येणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी रुपे पेमेंट व्यवस्था आणि व्यापारासाठी रुपयास प्राधान्य देण्याविषयीदेखील चर्चा केली.


श्रीलंकेस आर्थिक मदत करण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीस वित्तपुरवठा करणार असल्याचा पुनरुच्चार जयशंकर यांनी केला. ते पुढे म्हणाले, गेल्या वर्षी भारताने श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यासाठी क्रेडिट्स आणि रोलओव्हरच्या रूपात सुमारे ४ अब्ज डॉलर दिले होते. भारताच्या 'शेजारी प्रथम' धोरणास अनुसरून ही मदत करण्यात आली होती. ऊर्जा सुरक्षेला श्रीलंकेतील सर्वात गंभीर आव्हाने असल्याचे सांगून जयशंकर म्हणाले की, त्यावर उपाय शोधण्यासाठी व्यापक धोरणाची गरज आहे. त्यासाठी भारत श्रीलंकेस सर्वतोपरी मदत करणार असून अक्षय ऊर्जेच्या संदर्भात दोन्ही देश तत्त्वतः सहमत झाल्याचेही जयशंकर यांनी यावेळी नमूद केले.