नियोजन विरुद्ध विस्कळीतपणा

    19-Jan-2023   
Total Views |
BJP National Executive Session

देशपातळीवर विरोधी पक्ष सध्या तरी आपापल्या ताकदीचा अंदाज घेऊन चाचपणी करत आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये अतिशय नैसर्गिक असलेला बेबनाव हाच अखेर प्रबळ ठरेल आणि विरोधी पक्षांची एकता हे मृगजळच ठरण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे दोन दिवसीय अधिवेशन दिल्लीत सोमवार, दि. १६ जानेवारी आणि मंगळवार, दि. १७ जानेवारी रोजी पार पडले. भाजपची धोरणे ठरविणार्‍या कार्यकारिणीचे अधिवेशन हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरले. या बैठकीस भाजपचे ३५० कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, सभागृह नेते, प्रदेशाध्यक्ष, संघटनमंत्री आदी उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कार्यकारिणीच्या पहिल्या दिवशी दुपारी ४ ते रात्री १०.३० आणि दुसर्‍या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ असे पूर्णवेळ उपस्थित होते. यावरून ही कार्यकारिणी भाजपसाठी अतिशय महत्त्वाची होती, हे स्पष्ट होते. या कार्यकारिणीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांना अध्यक्षपदासाठी जून २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक ही नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. नड्डा यांचा कार्यकाळ तसा यशस्वी ठरला असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणे अपेक्षितच होते. यंदाच्या वर्षी होणार्‍या नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वाबदल करणे योग्य ठरले नसते.


नड्डा यांना मुदतवाढ मिळण्यासोबतच त्यांच्या जबाबदारीमध्येही वाढ झाली आहे. त्यांच्या मुदतवाढीची माहिती केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचप्रमाणे नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत २०१९ पेक्षाही मोठे यश मिळवेल, असे भाकितही शाह यांनी केले आहे. आता २०१९ साली भाजपने आजवरचे सर्वोच्च यश म्हणजे ३०३ जागा शाह यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात प्राप्त केल्या होत्या. त्याहून मोठे यश नड्डा यांना मिळाल्यास ते भाजपचे आजवरचे सर्वांत यशस्वी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात. नड्डा यांनी आपल्या भाषणामध्ये यंदाच्या वर्षी होणार्‍या नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे. यंदाच्या वर्षी मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, कर्नाटक, तेलंगण, त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांच्या निवडणुका म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम समजली जाते. या सर्व राज्यांत मिळून लोकसभेच्या एकूण ११६ जागा आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये सत्ता प्राप्त करून भाजप लोकसभा विजयाचा खुंटा बळकट करण्यासाठी सज्ज असणार आहे, हे नक्की.कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान या दोघांनी घेतला. यावेळी भाजपचे बलस्थान असलेल्या बुथस्तरावरील संघटनेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.



भाजपने आतापर्यंत तब्बल १ लाख, ३० हजार बुथपर्यंत पोहोचून त्यास बळकटी दिली आहे. हे सर्व कमजोर बुथ म्हणून अधोरेखित करण्यात आले होते. या बुथपर्यंत पोहोचून भाजपने पक्षसंघटना निवडणुकीसाठी सदैव सज्ज असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार्‍या राज्यांच्या नेत्यांसोबत स्वतंत्र चर्चा करून तेथील स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने कर्नाटक आणि मध्य प्रदेशचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत केवळ ४०० दिवस बाकी असल्याचे सांगून संघटनेस समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांना सतत कार्यरत ठेवून समाजातून नेमका ‘फिडबॅक’ नेहमी मिळवत राहणे, हे भाजपच्या संघटनेचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जिल्हास्तरावर भाजपच्या प्राथमिक सदस्यांचे संमेलन आयोजित करण्याची सूचना दिली आहे. वरवर पाहता ही बाब सामान्य वाटू शकेल. मात्र, प्राथमिक सदस्यांमध्ये समाजातील विविध थरातील नागरिकांचा समावेश असतो. त्यातील बहुतांशी सदस्य हे सक्रिय राजकारणात नसतात.



मात्र, ते पक्षाचे पारंपरिक मतदार असतात. पक्षासाठी ते आपापल्या पद्धतीने प्रचारही करत असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, समाजातल्या विविध क्षेत्रांत कार्यरत असल्याने त्यांना समाजातील नेमक्या प्रवाहांची जाणही असते. त्यामुळे पक्षाविषयी नाराजीचे मुद्दे नेमके कोणते, हे त्यांना समजते. अशा प्राथमिक सदस्यांकडून मिळणारा ‘फिडबॅक’ हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. कार्यकारिणीमध्ये भाजपच्या गुजरात विजयावर विशेष चर्चा झाली. गुजरातचे प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांनी गुजरातच्या विजयाची रणनीती यावेळी विशद केली. गुजरातच्या या विजयाचे उदाहरण प्रत्येक राज्यातील भाजप पक्षसंघटनेने घ्यावे, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यकारिणीमध्ये जम्मू-काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना आणि संघटनमंत्री अशोक कौल यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी विशेष चर्चा केली. त्यामुळे भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत असल्याचे या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. त्याची चुणूक कदाचित पुढील महिन्यात होणार्‍या त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिसण्याची शक्यता आहे.



 Opposition party


एकीकडे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये विजयाचा संकल्प घेतला गेला, तर त्याचवेळी विरोधी पक्षांमधील बेबनाव कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. सध्या विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यासाठी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उत्सुक आहेत. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून ते विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी बुधवारी खम्मम जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षांच्या महारॅलीचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, भाजप महासचिव डी. राजा आदी नेत्यांना निमंत्रण दिले. उत्तर प्रदेशात काँग्रेसने निमंत्रण देऊनही ‘भारत जोडो’ यात्रेत न जाणारे अखिलेश यादव राव यांच्या रॅलीत मात्र जातीने हजर होते. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत पुन्हा आघाडी करण्यास अखिलेश यादव तयार नसल्याचे सांगितले जात आहे. राव यांच्या रॅलीमध्ये नितीश कुमार यांना निमंत्रणच देण्यात आले नव्हते. अगदी सहा ते आठ महिन्यांपूर्वीच राव यांनी नितीश कुमार यांना बिहारमध्ये भेट घेऊन विरोधी पक्षांच्या एकतेची घोषणा केली होती. मात्र, सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या राजकारणावर राजदच्या तेजस्वी यादव यांनी वेसण लावली आहे. त्यामुळेच कदाचित राव यांनी नितीश कुमार यांना निमंत्रण देणे टाळले असावे.


दुसरीकडे के. चंद्रशेखर राव यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा ही काँग्रेसला मान्य नाही. कारण, कोणत्याही प्रादेशिक पक्षाच्या नेत्याचे नेतृत्व काँग्रेस स्वीकारणार नाही. आपले राजकीय अस्तित्व मजबूत आहे, असे भासविण्यासाठीच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या यात्रा सुरू आहे. ही यात्रा संपल्यानंतर काँग्रेस सध्या शांत असलेली काँग्रेस प्रादेशिक पक्षांसोबत आक्रमकपणे बोलणी करणार, यात कोणतीही शंका नाही. मात्र, प्रादेशिक पक्ष ‘भारत जोडो’ यात्रेच्या कथित यशास भुलणार नाहीत. कारण, त्यांनाही काँग्रेसच्या ताकदीचा नेमका अंदाज आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांनी या यात्रेविषयी अतिशय सावध भूमिका घेतली आहे. कारण, विरोधी पक्ष सध्या तरी आपापल्या ताकदीचा अंदाज घेऊन चाचपणी करत आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये अतिशय नैसर्गिक असलेला बेबनाव हाच अखेर प्रबळ ठरेल आणि विरोधी पक्षांची एकता हे मृगजळच ठरण्याची सर्वाधिक शक्यता आहे.












आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.