मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिकविरोधात मुंबई पोलीसांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मोहित कंबोज यांनी ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली आहे. दुसरी पत्नी हॅमलीन मलिकच्या व्हीसासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. हमलीन सध्या फ्रान्सची नागरिक आहे. कंबोज आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "दुसऱ्यांना 'फर्जीवाडा' म्हणणारे स्वतः किती ''फर्जी'' आहेत हे दिसून येत आहे. फ्रान्समध्ये रहाणाऱ्या पत्नीचा व्हीसा बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केला. म्हणूनच मंत्री मलिक यांचे पुत्र फराज यांच्याविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सुत्रांनी दिल्याचंही ते म्हणाले."
दाऊदशी संबंध असल्याप्रकरणी ईडीचे समन्स
दाऊदशी संलग्न जमिनीच्या व्यवहार केल्याप्रकरणात मंत्री मलिक सध्या तुरुंगात आहेत. फराजलाही यापूर्वी ईडीने याच प्रकरणात समन्स बजावले होते. २००५ मध्ये हसीना पारकर यांच्या गोवावाला कम्पाऊंड प्रॉपर्टी व्यवहाराचे कागदपत्र सादर करावे, असे समन्स फराजला बजावण्यात आले होते. फराजने दाऊदच्या बहिणीला उर्वरित व्यवहाराची रक्कम ही नगद स्वरुपात दिली होती, त्यामुळे ईडीने कारवाई केली होती. मात्र, या समन्सलाही सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीने केला आहे.