सत्ता चुंबक नसल्याने आघाडीचे तीनतेरा...

    17-Jan-2023   
Total Views |
Mahavikas Aghadi



केवळ सत्ता हाच या तीन पक्षाचा एकत्र येण्याचा धागा होता. या तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली पण त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले. महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम या मविआ आघाडीने अडीच वर्षात केले. या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यातील उद्योग बाहेर गेलेच पण राज्याची बदनामी होईल अशा अनेक घटना घडल्या. एका अर्थाने मविआ आघाडी हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण होते. सत्तेचे चुंबक जाताच ही या आघाडीतील भेगा आता स्पष्ट दिसू लागल्या आहेत. सत्तेची गाजराची पुंगी निकामी झाल्यानेच महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली.


२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पगंतीला बसून उद्धवरावांनी अनैसर्गिक राजकीय आघाडी जन्माला घातली. केवळ मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी बरोबरची युती तोडून उद्धवरावांनी महविकास आघाडीचा पाळणा हलवला. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती हिंदुत्वाच्या प्रखर विचारधारेवर झाली होती. या विचारधारेशी दगाबाजी करत उद्धवराव सत्तेच्या वळचणीला जाऊन बसले. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धवरावांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल हिंदुत्ववादी विचारांशी वारंवार बेईमानी करावी लागली. शर्जील उस्मानीसारख्या हिंदूंविरोधात गरळ ओकणाऱ्याला अटक करण्याची धमक उद्धवरावांना दाखवता आली नाही. उद्धवरावांनी दगाबाजीचं आपलं पाप झाकण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द पाळला नाही, अशी लोणकढी ठोकून दिली.


काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अचानक सत्ता मिळाल्यामुळे त्यांनी उद्धवरावांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात धन्यता मानली. केवळ सत्ता हाच या तीन पक्षाचा एकत्र येण्याचा धागा होता. या तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली पण त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागले. महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम या मविआ आघाडीने अडीच वर्षात केले. या अडीच वर्षाच्या कार्यकाळात राज्यातील उद्योग बाहेर गेलेच पण राज्याची बदनामी होईल अशा अनेक घटना घडल्या. एका अर्थाने मविआ आघाडी हे महाराष्ट्राला लागलेले ग्रहण होते. सत्तेचे चुंबक जाताच ही या आघाडीतील भेगाआता स्पष्ट दिसू लागल्या आहेत. सत्तेची गाजराची पुंगी निकामी झाल्यानेच महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली.

सत्तेतील अडीच वर्षे या तिघांनी गुण्यागोविंदाने काढली. सत्ता हाच या तिघांना बांधून ठेवणारा ‘फेव्हीकॉल’ होता. सत्तारूपी चुंबक हातातून गेल्यानंतर या संधीसाधू आघाडीतील बेबनाव समोर येऊ लागला आहे. विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणुकीत उद्धवरावांची सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिघांचीही तोंडे तीन दिशेला असल्याचे दिसून आले. देशाची आणि महाराष्ट्राची सत्ता अनेक वर्षे उपभोगलेल्या काँग्रेसला एका ठिकाणी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारच मिळाले नाहीत. तर दुस-या ठिकाणी उमेदवारी दिलेल्या उमेदवाराने अर्ज भरायलाच नकार दिला ही काँग्रेसची आजची अवस्था आहे.


उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक सेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दखलही घेतली जात नसल्याचे चित्र वारंवार दिसते आहे. त्यामुळे सत्तेत असताना दाखवली गेलेली एकी संपुष्टात आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवारच नाही तर अमरावती पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने लढण्याआधीच माघार घेतली. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवरावांची सेना या तिन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले आहे. केवळ भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी हिंदुत्वाच्या तत्वाशी बेईमानी करणार्‍या उद्धवरावांना आता राजकारणातील व्यवहारी कटूतेचे डोस मुकाटपणे गिळावे लागत आहेत. सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धवरावांची सेना आणि काँग्रेसचे पंख छाटण्याचा उद्योग सातत्याने केला. उद्धवरावांच्या जनतेतून निवडून आलेल्या आमदारांना विकास निधी देण्यात आडकाठी आणली गेली. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धवरावांनी हा अपमान निमुटपणे गिळला. या तिन्ही पक्षांनी अनेकदा सोयीनुसार माघार घेत सत्ता टिकवण्याला प्राधान्य दिले.

उद्धवरावांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीशी केलेली दगाबाजी पसंत नसलेल्या आमदारांनी भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. ५ वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडे राहणार या भ्रमात असलेल्या उद्धवरावांना हा धक्का सहन झाला नाही. सत्तेच्या उन्मादात उद्धवरावांनी सूड भावनेचे राजकारण सुरू केले होते. सत्तेची छत्रचामरं गळून पडल्यानंतर उद्धवराव पुरते असहाय्य झाले आहेत. वंदनीय बाळासाहेबांच्या पुण्याईमुळे त्यांना लढाऊ आणि आक्रमक संघटना आयती हातात मिळाली. वंदनीय बाळासाहेबांनी हयात भर काँग्रेस आणि अन्य हिंदुत्वविरोधी शक्तींशी संघर्ष केला. स्थानीय लोकाधिकार समितीसारख्या संघटनातून मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. उद्धवरावांना असा संघर्ष कधी करावा लागला नाही. संघटना बांधणीचे आणि कार्यकर्ते सांभाळण्याचे तंत्र त्यांनी कधी आत्मसात केले नाही. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला उद्धवराव कधीच आपलेसे वाटले नाहीत.

मुख्यमंत्रीपद असताना सत्तेच्या गुर्मीत वावरणारे उद्धवराव वस्तुस्थितीचे चटके बसू लागल्याने केविलवाणे भासू लागले आहेत. भारतीय जनता पार्टीचा हुकूमी मतदारवर्ग उद्धवरावांशी कायमच एकनिष्ठ होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धवरावांची फिकीर करण्याची गरजही भासत नाही. ‘आठशे खिडक्या नऊशे दार’ अशी अवस्था या आघाडीची झाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी उद्धवरावांना मधाचे बोट लावले आहे. त्यामुळे उद्धवरावांनी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धवरावांना अनेकांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. त्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी मागे फरफटत जाण्याबरोबरच प्रकाश आंबेडकरांसारख्या नेतेमंडळीचे पर्यायही त्यांना शोधावे लागणार आहेत.

उद्धवरावांची शिल्लक सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या ताकदीची कसोटी आगामी महापालिका निवडणुकीत लागणार आहे. उद्धवरावांना मुंबई महापालिकेतील आपली सत्ता कोणत्याही परिस्थिती टिकवायची आहे. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या अटी स्वीकारून त्यांना या पक्षांशी युती, आघाडी करावी लागणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकला होता तसा उद्धवरावांचा जीव मुंबई पालिकेत अडकला आहे. मुंबई पालिकेची सत्ता हातातून गेल्यास आपली अनेक कृष्णकृत्ये उजेडात येण्याच्या भीतीने अनेक नेत्यांना अस्वस्थ केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतनदार आणि सरंजामदारांना आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याची भीती नाही. त्यामुळे उद्धवारांशी आघाडी करण्याची अपरिहार्यता आलेली नाही. त्यामुळे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धवरावांना साथीला घेतील, याची शाश्‍वती नाही. सत्ता गेल्यानंतर सहा महिन्यातच महाविकास आघाडीत झालेला बेबनाव उद्धवरावांना अस्वस्थ करणारा ठरला आहे. बेबनावाची ही दरी आणखी वाढल्यावर उद्धवरावांना आपण भाजपाची साथ सोडून केलेली घोडचूक लक्षात येईल. अर्थात तोपर्यत वेळ निघून गेली असेल.




(लेखक हे भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते आहेत )





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

केशव उपाध्ये

केशव उपाध्ये हे भाजप महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते आहेत.