प्रदूषित हवा आणि आयुर्वेदिक उपचार

Total Views |
Air pollution and Ayurvedic treatment



दिल्ली असेल किंवा मुंबई-पुणे, देशातील काही महानगरांमध्ये थंडीतील धुके आणि प्रदूषणामुळे आरोग्याच्या समस्या बळावल्या आहेत. तेव्हा, अशा समस्यांवर आयुर्वेदात नेमके काय उपचार सांगितले आहेत आणि अशा प्रदूषित वातावरणात वावरताना आपण नेमकी काय काळजी घ्यायला हवी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...


सध्या वर्तमानपत्रांतून बरेचदा वाचनात येते की, ‘एक्यूआय’ (aqi) मुंबई व अन्य मोठ्या शहरांचे बिघडत चालले आहे. ‘एक्यूआय’ म्हणजे ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय) मनुष्य प्राण्याला शुद्ध हवेची आवश्यकता असते. जेवढे हवेतील प्रदूषण ,वातावरणातील प्रदूषण अधिक तेवढ्या विविध श्वसनाच्या तक्रारी वाढतात.

‘एक्यूआय’ जर १०० किंवा १००च्या खाली असेल, तर ती हवा श्वसनासाठी योग्य मानली जाते. सध्या मुंबई व परिसरातील ‘एक्यूआय’ ३००च्या वर आहे. ‘एक्यूआय’च्या लेव्हल्सचे विविध विभाग केले आहेत. ० ते ५० इतके असल्यास ती हवा उत्तम मानली जाते. ५०-१०० या दरम्यान प्रदूषणही सामान्य माणसांसाठी ठीक आहे, पण ज्यांना श्वसन संस्थेचे व हृदयाशी संबंधित जीर्ण तक्रारी, त्रास, व्याधी आहेत, त्यांना या हवेतील प्रदूषणापासून वाचण्यासाठी थोडी खबरदारी घेणे गरजेचे ठरू शकते.

 १०१-१५० पर्यंत देखील जनसामान्यांमध्ये विशेष त्रास उद्भवत नाही. पण, हवेतील प्रदूषणामुळे चटकन आजारी पडणार्‍या व्यक्तीला याचा त्रास होऊ शकतो. अशा व्यक्तींनी खूप काळ बाह्य वातावरणात राहू नये. १५१-२००, २०१-२५०, २२५-३०० व त्यावरील पातळी उत्तरोत्तर प्रदूषणयुक्त हवेचे द्योतक आहेत व त्यामुळे आधी व्याधिग्रस्त, नंतर वृद्ध व बालके आणि बाह्य काम (आऊटडोअर वर्क) करणार्‍या व्यक्तींमध्ये आणि नंतर सर्वांनाच या प्रदूषित हवेच्या संपर्कात कमी-अधिक त्रास (तक्रारी) उद्भवू लागतात.

प्रदूषित हवा, श्वसन वाटेने शरीरात प्रवेशित होते, तसेच त्वचेशी डोळ्यांशी चेहर्‍याशी-कान-तोंड इ.अवयवांशीदेखील प्रत्यक्ष संपर्क होतो. यामुळे डोळे चुरचुरणे, डोळे पाणावणे, खाजणे व वारंवार असे झाल्यास डोळे लाल होणे, चिकट स्राव येणे व इन्फेक्शनही होऊ शकते. तसेच नाक-घसासुद्धा चुरचुरणे, टोचल्यासारखे वाटणे, नाक चोंदणे किंवा वाहणे, नाक बंद असल्यास तोंडाने श्वास घेतला जातो व तोंडाने श्वास घेतल्यानंतर बाहेरची हवा शरीरात तशीच्या तशी प्रवेशित होते. नाकातील छोट्या केसांमुळे हवेतील सूक्ष्म कण तिथेच अडकले जातात. हवा थोडी शुद्ध व थोडी गरम केली जाते व नंतर शरीरात प्रवेशित होते.

 तोंडाने श्वसन सुुरू असल्यास हे घडत नाही, ‘एअर फिल्टरेशन’ होत नाही. वारंवार शिंका, घसा दुखणे, आवाज बसणे, सुका खोकला असे थोडे-थोडे होऊ लागते व नंतर त्या लक्षणांची तीव्रता वाढते आणि कालावधीसुद्धा वाढतो. वारंवार खोकल्यामुळे पोट-पाठ-बरगड्या दुखू लागतात. वृद्धांमध्ये लघवीवरचे नियंत्रण खोकताना कमी होते व थोडी प्रवृत्ती होऊ लागते. जर अंतवस्त्र ओली राहिली, तर पुढे जाऊन ‘युटीआय’ (Urinary tract infections) होण्याची शक्यता खूप वाढते.

ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांचा हा त्रास बळावतो, तसेच अन्य विविध श्वसन संस्थेशी निगडित तक्रारी व हृदयाच्या संबंधित तक्रारी (Cardiovascular diseases) वाढू शकतात. इन्फेक्शनमुळे ताप, अंगदुखी, तोंडाची चव जाणे, भूक मंदावणे व मलप्रवृत्तीचे संबंधित विविध तक्रारी उत्पन्न होतात. या विविध तक्रारी केवळ दूषित वातावरणामुळे विशेषत: दूषित हवेेमुळे वाढतात. हवेतील प्रदूषण विविध कारणांनी वाढलेले आहे, ते कमी करणे सामान्य माणसाच्या एकट्याचे काम नाही. त्यासाठी विविध संस्था व तज्ज्ञ मंडळी कार्यरत आहेत. पण, प्रकृती स्वास्थ्य जपण्यासाठी आणि राखण्यासाठी प्रत्येकांनी काही उपाय अवश्य करावेत. त्याबद्दल थोडे जाणून घेऊया.

प्रदूषण करणारे घटक हे सूक्ष्म स्वरूपात हवेत असतात. काही घटक द्रव/तरल (liquid state) तर काही घटक वायवीय (gaseous state)मध्ये असतात. शरीरातील रोमरंध्रांवर व व श्वसनावाटे शरीरांतर्गत यांचा प्रवेश होतो. जेवढे तापमान कमी होण्यासाठी तेवढी हवा थिजते, धुकं निर्माण होतं व हवेतील (Suspended Particles) अधिक खालच्या पातळीला स्थिरावतात. जसजसे ऊन, सूर्याची प्रखरता वाढते, तसे हे पार्टिकल्स वरच्या पातळीशी जाऊ लागतात.

म्हणजेच, जेव्हा ‘एक्यूआय’ची पातळी खूप वाढली असेल व तीव्र थंडी असेल, तेव्हा मनुष्यप्राण्याला अधिक रोगराई होण्याची शक्यता असते. हे होऊ नये किंवा प्रखरता थोडी कमी राखण्यासाठी काही वैयक्तिक उपाययोजना करणे गरजेचे आहेत.थंडीतून जाताना जे बाहेरचे कपडे असतील, ते घरात सर्वत्र ठेवू नये. घराबाहेर किंवा घरात प्रवेश केल्या-केल्या तिथेच ठेवण्याची सोय करावी. घराबाहेर पडताना (विशेषत धूळं किंवा दव अति असते वेळी) संपूर्ण शरीरभर कपडे घालावेत, जेणेकरून त्वचेचा संपर्क थेट/प्रत्यक्ष होणार नाही वा कमी होईल.तसेच कानावर मफलर वा स्कार्फ, कानटोपी घालावी. नाकावर रूपाल किंवा मास्क घालावा. डोळ्यावर चश्मा घालावा. या रितीने प्रत्यक्ष संपर्क कमी ठेवणे शक्य आहे.

श्वासोच्छवास करतेवेळी नाकानेच होईल, याची खबरदारी घ्यावी. नाकातील आतील बाजू स्वच्छ ठेवावी. थंडीमध्ये ती कोरडी पडते. हे वळण्यासाठी नाकाच्या आत गाईचे तूप लावावे किंवा खोबरेल तेल लावावे. या स्निग्धांशामुळे नाक कोरडे पडत नाही, बाह्य हवेचा त्रास कमी होतो व हवेतील प्रदूषित घटक नाकातील केसांमध्ये अधिक प्रभावीपणे अडकून राहतात.शरीरामध्ये हात-पाय-तोंड मर्यादित राखता येतो. तसेच बाहेरून आल्यावर हात-पाय-तोंड धुतल्यावर गरम पाण्याने गुळण्या कराव्यात. या गरम पाण्यात (सोसेल इतकेच गरम घ्यावे) थोडं मीठ व हळद घालावी. यामुळे गळ्यातील चिकट कडक झालेल्या कफ सुटण्यास मदत होते. हळदीने घशातील (इन्फेक्शन असल्यास) संसर्ग व अन्य तक्रारी (दुखणे, गिळताना त्रास होणे इ) कमी करण्यास, आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

दिवसभर गरम पाणी प्यावे. दिवसातून एकदा (सकाळी केल्यास अधिक चांगले) कवल व गण्डूष करावे (म्हणजे तोंडात गरम पाणी धरावे व गुळण्या कराव्यात) यासाठी गरम पाण्यात थोडं तेल/तूप किंवा मीठ घालावे. याने मुखाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तसेच त्वचेलाही रोज तेल लावणे महत्त्वाचे आहे. आपली त्वचा हे आपले बाह्य कवच आहे, जे बाह्य प्रदूषणापासून कीटकांपासून व अन्य घातक घटकांपासून रक्षण करते. त्याचबरोबर संवेदना ही जाणवून देते. हे कार्य उत्तम चालण्यासाठी वाताला नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे असते. अभ्यंग (म्हणजेच अंगाला तेल लावणे) याने वात नियंत्रित ठेवणे शक्य होते. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते, सुरकुतते, फाटते या सगळ्या तक्रारींवर अभ्यंग हा रामबाण उपाय ठरतो.

अति कडाक्याची थंडी असल्यास मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल लावावे. जर त्वचा संवेदनशील असल्यास खोबरेल तेल लावावे.वरील उपाय प्रतिबंधात्मक म्हणून उपयुक्त ठरतात. पण, जर काही त्रास वारंवार उद्भवत असतील, तर त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. आयुर्वेदशास्त्र हे एकमेव असे शास्त्र आहे, ज्यात व्याधि होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय सांगितले आहेत. व्याधी झाल्याच तर त्या बर्‍या करायचेही उपाय सांगितले आहेत आणि पुन्हा उद्भवू नयेत म्हणूनही उपाययोजना सांगितल्या आहेत. म्हणजे एकदा दुखणे सुरु झाले की, आयुष्यभर औषधोपचार करत राहणे, हे आयुर्वेदाच्या सिद्धांतात बसत नाही. पण, तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालील औषधोपचार ते सांगतील, त्या पद्धतीने करणे महत्त्वाचे आहे.


वैद्य कीर्ती देव

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व
पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वैद्य कीर्ती देव

लेखिका बी.ए.एम.एस (मुंबई), बी.ए. (योगशास्त्र) असून आयुर्वेदिक चिकित्सा आणि पंचकर्म क्षेत्रात मुंबई व ठाणे येथे २० वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ वैद्यकीय अनुभव आहे. त्वचाविकार आणि आयुर्वेदिक चिकित्सा, आयुर्वेद आणि सौंदर्यशास्त्र तसेच अरोमा थेरेपीचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. आयुर्वेद सिद्धांत, चिकित्सा, औषधे आदी विषयांमध्ये विपुल लेखन करीत असून आयुर्वेद व्यासपीठाद्वारे वैद्यकीय चर्चासत्रे व परिसंवादातही सक्रीय सहभाग.