ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांचा हिंदूद्वेष

    15-Jan-2023   
Total Views |
 hindu-temple-attacked-vandalised-by-khalistan-supporters-in-australia


खलिस्तानवाद्यांचा भारतविरोध ही काही आजची गोष्ट नाही. पाकिस्तान सातत्याने खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन देऊन ती आणखी भडकवण्याचा प्रयत्न करत आला आहे. ही चळवळ कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणावर फोफावली असून भारतविरोधी अनेक गोष्टी या खलिस्तानवाद्यांकडून केल्या जातात. मात्र, आता हे लोण कॅनडानंतर ऑस्ट्रेलियातदेखील पोहोचले आहे. खलिस्तानी समर्थकांनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका हिंदू मंदिराला लक्ष्य करत मंदिराची तोडफोड केल्याने हिंदू समाजाकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.


तोडफोडीबरोबरच मंदिराच्या भिंतींवर खलिस्तानवाद्यांनी भारतविरोधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाही लिहिल्या आहे. इतकंच नाही, तर खलिस्तानींनी मंदिराच्या तोडफोडीचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर ‘व्हायरल’ केला आहे. मंदिराच्या तोडफोडीच्या दुसर्‍या दिवशी मंदिराच्या भिंतींवर आक्षेपार्ह घोषणा लिहिल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर हिंदू समाजाने येथील स्थानिक पोलिसांना माहिती देऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. बुधवार, दि. ११ जानेवारी रोजी सायंकाळी मेलबर्नच्या उत्तर उपनगर मिल पार्कमधील ‘बीएपीएस’ स्वामिनारायण मंदिराच्या भिंतींवर काही लोकांनी ’हिंदुस्तान मुर्दाबाद’, ’मोदी हिटलर है’ आणि ’भिंद्रनवाले झिंदाबाद’ असे चित्र रंगवत घोषणा लिहिल्या. यामुळे येथील हिंदू नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून खलिस्तानवाद्यांचा हिंदू आणि भारतद्वेष पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकरणी स्वामिनारायण मंदिरामार्फत स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले की, आम्हाला या तोडफोड आणि द्वेषाच्या कृत्यांमुळे दुःख झाले आहे.

‘बीएपीएस’ नेहमीच सर्व धर्म आणि लोकांशी शांततापूर्ण सहअस्तित्व आणि संवादासाठी वचनबद्ध आहे. आम्ही अधिकार्‍यांना कळवले आहे आणि त्यांना पूर्ण सहकार्य करत असून आम्ही शांतता आणि सौहार्दासाठी प्रार्थना करतो. ’हिंदू कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया’चे व्हिक्टोरियाचे राज्यअध्यक्ष मकरंद भागवत यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत धार्मिकस्थळांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा द्वेष आणि तोडफोड स्वीकार्य नसल्याचे सांगितले. त्याचबरोबरीने मंदिराची विटंबना आणि तोडफोड हे व्हिक्टोरियाच्या वांशिक आणि धार्मिक सहिष्णुता कायद्याचे मोठे उल्लंघन असून व्हिक्टोरिया पोलीस आणि प्रीमियर डॅन अँड्—युज यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही भागवत यांनी केली आहे.

मेलबर्नसह ऑस्ट्रेलियातील समस्त हिंदू समुदायाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मेलबर्नमधील केरळ हिंदू सोसायटीने एक निवेदन प्रसिद्ध करत या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. याचबरोबरच ऑस्ट्रेलियातील विश्व हिंदू परिषदेनेही हल्ल्याचा निषेध करत हा हल्ला अचानक झालेला नसून एक नियोजनबद्ध व रणनीतीदृष्ट्या केलेला हल्ला असल्याचे सांगितले. जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा खलिस्तानी दहशतवादी होता, जो २० हजारांहून अधिक हिंदू आणि शिखांच्या हत्येसाठी जबाबदार होता. परंतु, त्याचा फुटीरतावादी खलिस्तानी संत म्हणून गौरव करत असतात. यापूर्वी कॅनडात शीख तुष्टीकरणांतर्गत भारताचे तुकडे करण्यासाठी खलिस्तानवाद्यांकडून अनेकदा प्रयत्न करण्यात आले आहे.

भारतातील पंजाब राज्याला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळावी यासाठी कॅनडात खुलेआम जनमत संग्रहदेखील घेण्यात आला होता. या घातक मोहिमेला त्याठिकाणी ‘खलिस्तान रेफरेंडम’ असे नाव देण्यात आले. खलिस्तानचा अर्थ ‘द लॅण्ड ऑफ खालसा’ असा होतो. म्हणजेच खालसा लोकांसाठी एक वेगळा देश आणि ‘रेफरेंडम’चा अर्थ जनमत संग्रह. एकूणच खलिस्तानी संघटना पंजाबला तोडून ‘खलिस्तान’ नावाच्या स्वतंत्र देशाची मागणी करत आहे. भारताचे तुकडे करून त्यांना पंजाब भारतापासून तोडायचे आहे आणि त्यालाच ‘खलिस्तान’ असे नाव द्यायचे आहे. यासाठीच हे खलिस्तानवादी नेहमीच हिंदू आणि भारतविरोधी राग आळवत असतात.

दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनातही काही खलिस्तानवाद्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. २००७ साली स्थापन झालेल्या या संघटनेवर भारतात पूर्णतः बंदी आहे. ही संघटना ‘एनआयए’च्यादेखील रडारवर आहे. या संघटनेचा नेता गुरपतवंतसिंग पन्नू जो पाकिस्तानकडून पैसे घेऊन जगभरात भारतविरोधी मोहीम चालवत असतो, त्याच्यावर भारतात देशद्रोहाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. खलिस्तानवाद्यांकडून सातत्याने भारत आणि हिंदूविरोधी कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे वेगळ्या खलिस्तानचे स्वप्न पाहणारी ही किड वेळीच ठेचणे आवश्यक आहे.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.