संत चोखोबा ते संत तुकोबा : वारी समतेची आणि समरसतेची

    14-Jan-2023   
Total Views |
Saint Chokhoba to Saint Tukoba Wari of equality


‘संत चोखामेळा अध्यासन केंद्र’ व ‘चोखोबा ते तुकोबा - एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समिती’ आयोजित ‘समता वारी’ रविवार, दि. १ जानेवारी रोजी श्री संत चोखामेळा महाराज कर्मभूमी मंगळवेढा येथून निघून गुरुवार, दि. १२ जानेवारी रोजी जगद्गुरू संत तुकोबाराय जन्मभूमी देहुगाव येथे या वारीचा समारोप झाला. या वारीने महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशीव, बीड, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, नाशिक, नगर, पुणे या नऊ जिल्ह्यातून १७०० किलोमीटर प्रवास केला. या ‘समता वारी’च्या अंतरंगातील समरसता अद्वितीय होती. ‘समता वारी’ शब्दात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न ...



चोखोबा ते तुकोबा : समता वारी’ गेले अनेक वर्षे सुरू आहे. ही वारी चोखोबांची कर्मभूमी मंगळवेढापासून ते तुकोबांच्या जन्मभूमी देहूगावापर्यंत प्रवास करते हे माहिती होते. सामाजिक समरसतेसाठी अक्षरशः तन-मन झोकून काम करणारे अनेक कार्यकर्ते या वारीत पंढरीच्या वारीसारखेच निष्ठेने जातात. त्यामुळे या वारीचे कुतूहल होते. तसेच बर्‍याच शंकाही होत्या. वाटायचे की, आजच्या संदर्भात ‘चोखोबा म्हणा तुकोबा म्हणा’ या संतांच्या नावाने ही अशी वारी का बरं काढली असेल? तसेच संत चोखोबा आणि संत तुकोबा हेच प्रयोजन का? असा प्रश्न मनात पडला होता. मात्र, मागे विठूरायाच्या पंढरपूरवारीने या समता वारीबद्दलच्या प्रश्नांना उत्तर मिळाले. आषाढी एकादशीला चंद्रभागेतीरी वैष्णवांचा मेळा भरतो. अगणित दिंड्या पायी चालत चालत पंढरपूरला जातात.

विठूमाऊलीचे दर्शन घेतात हे वाचून किंवा ऐकून माहिती होते. या वारीतील समतेचे, ममतेचे आणि ऐकतेचे वर्णन, सगळे जण जातपात, भेदाभेद विसरून विठूरायाच्या भक्तीत देहभान विसरतात, हे सगळे ऐकूनच होते. मात्र, गेल्या वर्षी या भोळ्या विठूभक्तांच्या मांदियाळीत संविधान वारीही निघाली. अर्थात, संविधानाचे महत्त्व अपरंपार आहे. संविधान म्हणजे देशाचा आत्माच म्हणायला हवा. पण, तरीही प्रश्न होता की, वारी पंरपरेला न जाणे किती वर्षांचा वारसा आहे. संविधान वारीबाबत चर्चा करताना एक जण म्हणाला, ते त्यांच्या संतांनी वारी केली म्हणून वारी काढतात. मग आम्ही आमच्या संविधानासाठी काढली, तर काय झाले? त्याला विचारले, त्यांचे संत म्हणजे ते संत पण त्या त्या जातीचे आहेत का?

तर त्याचे म्हणणे संतांनी आमच्यावर होणार्‍या जातीय अत्याचाराबद्दल काय केले? त्या संतांमध्ये आमच्या समाजाच्या दुःखाचे प्रतिनिधित्व करणारे कुणी तरी होते का? त्याच्या प्रश्नाला सोबतच्या तरुणाईने जोरदार टाळ्या पिटून समर्थन केले. तो जे म्हणाला त्यात तथ्यही नव्हते आणि सत्यही नव्हते. सामाजिक रूढींमुळे विषमतेचे हलाहल आयुष्यभर सोसावे लागलेले संत ज्ञानेश्वर, पशू-पक्षी, वृक्ष, वल्ली यांना ही माणसाप्रमाणे मानून प्रत्येकाशी माणसासारखे वर्तन करा सांगणारे संत तुकाराम, संत एकनाथ ते अगदी संत सावतामाळी आणि जातीय अस्पृश्यतेबाबत चोख सवाल विचारणारे आणि भक्तीत लीन होऊन सामाजिक जागृती करणारे संत चोखामेळा यांच्याबाबत या तरुणांना काही माहितीच नव्हते. संतसाहित्य त्यातही संतांचे अभंग यांच्याशी यांचा दुरूनही संबंध नव्हता. एकंदर संतांच्या शिकवणीबाबत यांना शून्य माहिती होती. त्यामुळेच ते प्रश्न विचारत होते की, संतांनी आमच्यासाठी काय केले?

या पार्श्वभूमीवर ‘संत चोखोबा ते संत तुकोबा’ या समतेच्या वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संतांना जातीय चश्म्यातून पाहू नये. हे पापच आहे. मात्र, संत चोखामेळांचे नाव का कुठे पटकन येत नाही? ते ज्या तत्कालीन महार जातीत जन्मले म्हणून? तसेच संत तुकारामांनी तत्कालीन धुरिणी समाजावर प्रहार केला म्हणून त्यांच्या गाथा चंद्रभागेत बुडवल्या. त्यांच्यासोबत अन्याय केला, असेही म्हणणारे ठरावीक लोक आज पैशापासरी आहेत. ते हे बोलत असतात. कारण, त्यांनाही माहिती आहे की, अगदी १२व्या शतकांपासून महाराष्ट्रातल्या संतांनी समाजातील अमंगल विषमतेवर प्रहार करत सामाजिक समरसता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपल्या अभंगातून हिंदू श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्म यांचा गौरव केला होता. ब्राह्मण असो की वैश्य की क्षत्रीय की क्षुद्र, त्या काळातील भेदात जातीपातीत जन्म घेऊनही संतांनी एकदिलाने परमेश्वराची त्या विठूरायाची भक्ती केली होती. जनसामान्यांना ईश्वराशी जोडले होते. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि श्रद्धा मोडू पाहणार्‍या लोकांची पंचायत होते.


Saint Chokhoba to Saint Tukoba Wari of equality


शेकडो वर्षांपूर्वी ब्राह्मण समाजातले संत जे म्हणत होते तेच त्यावेळच्या मागास समाजातील संतही म्हणतात हे अधोरेखित केले, तर मग आताच्या समाजात फूट कशी पाडणार? त्यामुळे हे लोक संतांनाही त्यांच्या विखारी फुटीरतेचे प्रतिनिधी बनवण्याचा डाव रचतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर संतांचे माहात्म्य आणि त्याद्वारे सामाजिक समता समरसतेसाठी ‘चोखोबा ते तुकोबा वारी’ अतिशय महत्त्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, या वारीमध्ये पहिल्या दिवसापासून ते समारोपापर्यंत संत तुकोबांचे दहावे वंशज हभप शिवाजी महाराज मेारे हे उपस्थित होते. नुसते उपस्थित नव्हते, तर १२ दिवस चाललेल्या या वारीत ते ठिकठिकाणी स्थानिक मान्यवरांसोबत समाजाचे प्रबोधनही करत होते. श्री संत एकनाथ महाराज यांचे वंशज श्रीनाथ महाराज गोसावी, त्यांच्यासोबत अखिल भारतीय समरसता गतविधीचे रमेश पांडव तसेच समरसतेचे निलेश गद्रे, सामाजिक कार्यकर्ता वाल्मिक निकाळजे, पुलचंद नागटिळक हेसुद्धा वारीमध्ये सहभागी होते. तसे वारीमध्ये प्रमुख मार्गदर्शक ठरलेले होते -ह.भ.प.शिवाजीराव मोरे महाराज, देहू, प्राचार्या डॉ. उल्काताई चंदनशिवे, बार्शी, वाल्मीकराव निकाळजे, आष्टी, प्रा. डॉ. रमेशराव पांडव, छ. संभाजी नगर.


रविवार, दि. १ जानेवारी रोजी संत चोखामेळा यांची कर्मभूमी मंगळवेढा येथे वारीची सुरुवात झाली. यावेळी लातूरचे खा. सुधाकरराव शृंगारे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लक्ष्मणराव ढोबळे आणि समाधान अवताडे हे उपस्थित होते. मंगळवेढा परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे यावेळी सहभागी झाले. यंदा या वारीमध्ये सहभागी होण्याचा योग आला. भूम येथे वारीच्या माध्यमातून महिला मेळावा आयोजित करण्यात आला. महिला मेळाव्याच्या एक दिवस आधी पंढरपूर येथे वारीमध्ये सहभागी झाले.

सोमवार, दि. २ जानेवारी रोजी पंढरपूर येथे सकाळी ८ ते ११ शोभायात्रा निघाली. समता सभेचे आयोजनही करण्यात आले होते. सभेला डॉ. रमेश पांडव यांनी संबोधित केले. यावेळी संत तुकारामांचे दहावे वंशज हभप शिवाजी महाराज मोरे आणि संत चोखामेळा यांचे वंशजही येथे भेटले. या वारीबद्दल काय वाटते, असे यांना विचारले, तर या दोघांचेही म्हणणे असे की, “अशी वारी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून निघायला हवी. समाज गतिमानतेने बदलत आहे. चांगले वाईट सगळेच सोबत घेत आहे. अशावेळी संतविचार अवघ्या मानवविश्वाला तारणार आहेत. संत साहित्याचा अभ्यास करणारे सगळेच नसतात किंवा प्रत्येक जण वारकरी-धारकरीही नसतो. मग उरलेल्या बहुसंख्य समाजाला संतांचे कालजयी विचार कसे कळणार?” संतांच्या वारसदारांनी उपस्थित केलेला प्रश्न बहुमोलाचा होता.
 
असो. आतापर्यंत मला वाटत होते की, ही सभा मंगळवेढा ते देहू मार्गातील नऊ जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणी होईल. तिथल्या मान्यवरांसोबत संतांचे विचार मांडले जातील. मात्र, तसे नव्हते. ही सभा मंगळवेढा ते देहू या मार्गातील प्रत्येक थोर संतविभूतींच्या समाधी स्थळ, स्मरणगाथा स्थळावर थांबली होती. वाटेतील प्रत्येक धार्मिक, ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिर आणि समाधीस्थळी थांबली होती. इतकेच काय महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि कर्तृत्वाने अजरामर झालेल्या प्रत्येक स्मृतिस्थळी ही वारी थांबत होती. त्या त्या ठिकाणी सभा होत होत्या. आजही ग्रामीण भागात ठळकपणे अस्तित्वात असलेल्या अठरापगड जातींच्या वस्त्यांमध्ये ही वारी विसावा घेत होती. या वस्त्यांमधील सगळेच बंधूभगिनी संत चोखोबा, संत तुकोबांचे नाव ऐकून या वारीचे स्वागत करायला सज्ज होते. संत तुकारामांचे वंशज या वारीत आहेत, हे ऐकल्याबरोबर प्रत्येक वस्तीत हभप शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यास श्राविकांची झुंबड उडत होती.

 हातात दीपज्योती घेऊन फुलांचे हार घेऊन हे बांधव सुहास्य वदनाने आणि अतीव समाधानाने वारीचे स्वागत करताना पाहून वाटले की, खरेच आजही समाज संतांच्या विचारकार्यांनी बांधलेला आहे. प्रत्येक गावातील सर्वच समाजातील लोक एकोप्याने त्यांच्या त्यांच्या गावातील सभा ऐकण्यासाठी एकत्र येत होती. मग ती सोलापूरची आ. राम सातपुतेंची सभा असो की तुळजापूर येथील माजी खा. अमर साबळे, भूम येथील माझी सभा असो की, जामखेडची सागर शिंदेची सभा असो की, छत्रपती संभाजीनगरची डॉ. प्रसन्न पाटील यांची असो की, येवल्यातली निलेश गद्रेंची सभा असो की, लोणीची डॉ. संजय गायकवाड यांची सभा असो की, शिर्डीतली डॉ. उज्ज्वला हातांगळे यांची सभा असो. या प्रत्येक सभेसाठी उपस्थित असलेल्या श्रोत्यांना वक्ते कोण आहेत, याचे महत्त्व नव्हते, तर ‘संत चोखोबा ते संत तुकोबा’ या समतेच्या वारी अंतर्गत हे वक्ते समतेचा आणि आपल्या समाजभानाचा विषय मांडणार आहेत, हे या श्रोत्यांसाठी महत्त्वाचे होते.

येवला येथे विचार मांडताना निलेश गद्रे म्हणाले की, “येवला ही डॉ. बाबासाहेब पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. येथूनच डॉ. बाबासाहेबांनी समतेचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयता आणि असमानतेविषयी ज्या ज्या गोष्टी आपल्या लक्षात आणून दिल्या. त्या सगळ्या गोष्टी समाजातून उकडून फेकण्याचे काम या ‘समता वारी’च्या माध्यमातून आपल्याला करायचे आहे. आमच्या सर्व युगपुरुषांनी जातीला नाही, तर माणसाला महत्त्व दिले आहे. प्रत्येक धर्मामध्ये, उपासना पद्धतीमध्ये इतरही धर्मामध्ये विषमता आहे. परंतु, हिंदू धर्मामध्ये विषमता बोलून दाखवण्याची, त्यांची चिकित्सा करण्याची परवानगी आहे. परंतु, इतर धर्मामध्ये, उपासना पद्धतीत परवानगी नाही. संत तुकारामांनी पहिली कर्जमाफी दिली. संत रामदास महाराजांनी गोरगरिबांची अस्पृश्य समजणार्‍या १०० कुंटुंबाना एकत्रितपणे स्नेहभोजन दिले आणि त्यांना भोजनाला आल्याबद्दल दक्षिणा दिली होती. आपल्या सर्व संतानी, महापुरुषांनी त्या परिवर्तनाची चळवळ उभी केली. ती चळवळ पुढे घेऊन जाणारी ही आहे.


ही वारी वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळीही गेली होती आणि कोरेगाव-भीमा येथेही गेली होती. काळाराम मंदिर, नाशिक येथे ही वारी विसावली. तेथे मंदिर परिसरात सभा आयोजित करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काळाराम मंदिराचे आंदोलन नेहमीच अधोरेखित करण्यात येते. या आयामातून या वारीचे काळाराम मंदिरातील सभा मोलाची होती. या सभेमध्ये बोलताना त्यावेळी वाल्मिक निकाळजे बोलताना म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांना पाच वर्ष काळाराम मंदिराबाहेर आंदोलन करून प्रवेश मिळाला नाही. काळाराम मंदिराच्या वेळेच्या व्यवस्थापकाने मंदिर प्रवेश नाकारला. पण, सध्याच्या व्यवस्थापकांनी आमच्या पूर्वजांनी चूक केली. ती चूक दुरूस्त करत सर्व जाती-धर्मांतल्या लोकांना बोलवून त्यांच्या हातून श्रीरामाची आरती करून घेतली आणि सोबत सहभोजनही केले. ही एक सामाजिक समतेसाठी चांगली सुरुवात आहे. कोणतीही जात संपूर्णपणे वाईट नसते. त्या जातीतील काही मोजके लोक वाईट असतात. पण, अशा काही वाईट लोकांमुळे चांगल्या लोकांवर अन्याय होतो. त्यामुळे मोजक्या लोकांच्या चुकांना संपूर्ण समाजाची चूक समजू नये.

दोन्ही बाजूने दोन दोन पाऊले पुढे आले पाहिजे. दोन्हीमध्ये झालेला संघर्ष यातून समाजाला काहीही मिळालेले नाही. तो आता थांबला पाहिजे आणि समन्वय झाला पाहिजे. या देशाला बंधुभावातूनच समृद्धीकडे नेता येईल. हाच समतेचा संदेश समाजाला देण्यासाठी ही ‘समता वारी’ निघालेली आहे.” तर अशा प्रकारे ही वारी महाराष्ट्राच्या संतमहात्म्यांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीतून मार्गक्रमण करत होती. वारीमध्ये पंढरपूर येथे वाल्मिकी समाजानेही एक सभा आयोजित केली होती. या वाल्मिकी समाजाने वारीला त्यांच्या वस्तीमध्ये आमंत्रित केले. त्यांचे काही प्रश्न, समस्या होत्या. त्या त्यांनी मांडल्या. महाराष्ट्रात १८व्या शतकात ‘प्लेग’ आला असता, इंग्रजांनी त्यांना इथे आणून वसवले. कारण काय तर, त्यांनी मैला उचलावा म्हणून. त्यावेळेपासून ते इथेच आहेत. मात्र, त्यांना हक्काची कायदेशीर घरं नाहीत. वारीच्या काळात चंद्रभागेतीरी अगदी २०१३ सालीही ते हाताने मैला उचलायचे.


मात्र, आजही त्यांना हक्काचे घर नाही. असे प्रश्न त्यांनी मांडले. यावर हभप शिवाजी महाराज मोरे आणि डॉ. रमेश पांडव यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून सामाजिक समरसता म्हणून त्यांचा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करायलाच हवा, असे मत मांडले, तर हभप शिवाजी महाराज म्हणाले की, ”पंतप्रधान मोदींनी वाल्मिकी समाजाच्या कन्येचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतला आहे. समाजाचा प्रश्न त्यांच्यासमोर गेला, तर तो सुटेल. तसेच, रा. स्व. संघाने आणि ‘सेवा सहयोग’ या संस्थेने निर्मळवारीचे प्रयोजन करून स्थानिक वाल्मिकी समाजाला बंधुतेने सहकार्य केले,” असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतरही वारी अनेक वस्त्यांवर थांबली. तिथे संवाद प्रस्थापित केला. महाराष्ट्राच्या मातीत संतविभूतींचे विचार कसे रूजले आहेत, हे समजण्यासाठी आणि महाराष्ट्राचा आत्मा उमजून घेण्यासाठी ही वारी माझ्या आयुष्यातील समरसतेची क्रांती वारी होती हे नक्की!










 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.