‘गोल्ड बॉण्ड्स’मध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी...

    12-Jan-2023   
Total Views |
golden opportunity to invest in 'Gold Bonds'
 
आपल्या सर्वांसाठीच सोने हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. भारतात तर घरोघरी गुंतवणूक म्हणून किंवा हौसेखातर सोन्याची खरेदी केली जाते. परंपरागत दागिने किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार तर भारतीय महिलांच्या गळ्यातील ताईत. त्यातच गेल्या काही वर्षांत सोने हे हौसेपुरतेच मर्यादित न राहता, गुंतवणुकीचा एक उत्तम पर्यायदेखील ठरला आहे. पण, आपल्याला याच सोन्याच्या ‘गोल्ड बॉण्ड्स’च्या गुंतवणुकीबद्दल फारशी माहिती नसते. अशाच या ‘गोल्ड बॉण्ड्स’च्या व्यवसायात आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍या ‘विघ्नहर्ता गोल्ड लिमिटेड’च्या महेंद्र लुनिया यांच्याशी बातचित करुन ‘गोल्ड बॉण्ड्स’च्या सुवर्णसंधीची माहिती करुन देणारा हा लेख...


आपल्याकडे एकूणच गुंतवणुकीच्या काही नव्या पर्यायांबद्दल गुंतवणूकदारांना फारशी माहिती नसते किंवा केवळ अल्प माहिती असते. ‘गोल्ड बॉण्ड्स’ हा त्यापैकीच एक गुंतवणुकीचा प्रकार. कदाचित नावाने, जाहिरातीमुळे या शब्द ऐकीवात आलाही असेल, पण हा प्रकार नेमका काय, याविषयी बरेच जण अजूनही अनभिज्ञ दिसतात. मुळात ‘डिजिटल गोल्ड’ हा शेअर बाजारातील ‘सेन्सेक्स’ आणि गुंतणुकीप्रमाणेच एक महत्त्वाचा प्रकार. आपण जेव्हा एखादी रक्कम ‘डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवतो, तेव्हा आपल्या गुंतवणुकीएवढे ‘गोल्ड बॉण्ड्स’ आपल्याला प्राप्त होतात. हे ‘बॉण्ड्स’ सरकारी असल्याने पूर्णत: सुरक्षित असतात आणि त्यावर आपल्याला व्याजदेखील मिळते. याउलट आपण सोनाराकडे जाऊन जे सोने विकत घेतो, त्यामध्ये आपण जेवढे पैसे मोजतो, तेवढेच सोने आपल्याला मिळते.

मग त्याच सोन्याचे आपण दागिने बनवतो किंवा ते सोने आपल्या बँकेच्या ‘लॉकर्स’मध्ये तरी सुरक्षित ठेवून देतो. यामध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे, जेव्हा आपण आपले सोने दागिने किंवा ‘लॉकर्स’मध्ये ‘चिप्स’च्या स्वरूपात वगैरे ठेवतो, तेव्हा काही वर्षांनी त्या सोन्याची किंमत साहजिकच वाढलेली असते. पण, त्या सोन्यात काही भर पडते का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. पण, त्याउलट आपण खरेदी केलेल्या ’गोल्ड बॉण्ड्स’वर मात्र सरकारकडून व्याज मिळत असते. उदा. आपण दहा ग्रॅम सोने ४० हजार रुपयांना विकत घेतले, तर दोन वर्षांनी त्याची किंमत कदाचित ५० हजार झालेली असेल. पण, भौतिकदॉष्ट्या सोने मात्र दहा ग्रॅम इतकेच कायम असते. याउलट ‘गोल्ड बॉण्ड्स’मध्ये जर हेच ४० हजार रुपये गुंतवले असते, तर सरकारकडून मिळणारे व्याज पकडून ही रक्कम ६० हजार रुपयांवर गेली असती.

भारतात नोटाबंदीनंतर नागरिकांचा लोकांचा कल हा ‘डिजिटल’ व्यवहारांकडे वाढायला लागला. त्यातच कोरोना महामारीतील मर्यादांमुळे अशा डिजिटल व्यवहारांना अधिकच गतिमानता प्राप्त झाली. या काळात एकमेकांच्या संपर्कातच येणे टाळले गेल्याने नागरिकांचा ‘डिजिटल’ व्यवहारांकडे ओढा अजूनच वाढला. त्यामुळे जशी डिजिटल व्यवहारांना गती मिळाली, तशीच या ‘डिजिटल गोल्ड’ संकल्पनेलाही गती मिळाली.

एवढेच नाही तर सोने या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक केल्याने ’म्युच्युअल फंड’ आणि ‘शेअर्स’ यांसारख्या उच्च जोखमीच्या गुंतवणुकीतील तोटादेखील कमी होण्यास मदत होते. ऑनलाईन सोने खरेदी आणि गुंतवणुकीचा हा एक सुरक्षित, सोयीस्कर आणि किफायतशीर मार्ग आहे, ज्यासाठी कोणत्याही अतिरिक्त ‘स्टोअरेज’ आणि वाहतूक खर्चाची देखील अजिबात आवश्यकता नाही. यामध्ये अजून असे बरेच पर्याय आहेत, जे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अजूनही पुरेसे माहिती नाही. त्यातच ‘हॉलमार्किंग’मुळे तर हे सगळे व्यवहार अधिकच सोपे आणि सुरक्षित झाले आहेत. सध्या २४ कॅरेट सोनं केवळ गुंतवणुकीसाठी आपण खरेदी केले, तरी त्याचा ‘जीएसटी’ आपल्याला मोजावा लागतो. पण हेच सोने विकायचे झाल्यास ‘जीएसटी’ची रक्कम आपल्याला मिळत नाहीच. शिवाय, त्या किमतीच्या तीन टक्केदेखील सोनार ‘मेकिंग चार्जेस’च्या नावाखाली कमी करून देतो. यामध्ये आपली गुंतवणूक फार कमी होऊन जाते.

 यासाठी सरकारने ’र्डेींशीशळसप ॠेश्रव इेपव’ ही योजना आणली. आता ही योजना म्हणजे नेमके काय? तर, ज्या ठिकाणी तुम्ही एक ग्रॅम सोनं एक युनिटच्या माध्यमातून खरेदी करू शकता, सरकार तेचं सोनं तुम्हाला ‘डिजिटली’ उपलब्ध करुन देतं. तुमच्या ‘डीमॅट’ खात्यामध्ये तो ‘गोल्ड बॅलेन्स’ झळकतो. ज्यावेळी आपण प्रत्यक्ष सोन खरेदी करतो, तेव्हा ते घरीच किंवा बँकेच्या ‘लॉकर’मध्ये ठेवले जाते. प्रत्यक्ष सोन्याला, दागिन्यांना सांभाळण्यासाठी पैसे मोजावे लागतात, त्याऐवजी 'Sovereign Gold Bond' मध्ये तेवढीच रक्कम गुंतवून ’जीएसटी’विना ‘डीमॅट’ खात्यामध्ये जे सोनं आहे, त्याची किंमत तर वाढेलच, शिवाय त्यावर व्याजही मिळेल.'Sovereign Gold Bond' मध्ये सरकार दरवर्षी २.५० टक्के व्याज दिले जाते. तसेच या सोन्याच्या शुद्धतेची खात्रीदेखील सरकार देते.


आर्थिक घडामोडींवर नजर टाकली असता, देशात व्याजदर सातत्याने वाढत असतात. यामागचे कारण काय? तर, आपण आपल्या देशातून पैशाचे चलनवलन कमी करतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, सव्वाशेकोटी लोकसंख्येच्या या देशात जर प्रत्येक घरात पाच माणसं असतील, असे गृहीत धरले तरी २५ कोटी घरं आपल्या देशात आहेत. प्रत्येक घरात १०० ग्रॅम जरी सोनं आहे, असे मानले तरी २०० लाख कोटींपेक्षा सोनं हे असेच ‘लॉकर’मध्ये पडून आहे. हेच सोनं जर आपल्या देशाच्या चलनवलनात आलं, तर व्याज दर हे ‘निगेटिव्ह’ होऊ शकतात. वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हेचं सोनं जर अशाप्रकारे व्यवहारात आलं, तर एका रुपयासाठी तब्बल ३२ डॉलर आपल्याला मिळू शकतात. असे झाल्यास आपल्या देशाची अर्थव्यवस्थासुद्धा अधिक मजबूत बनेल. जास्त व्याजदरावर मिळणारे पैसे कमी व्याजदरावर मिळतील आणि आपल्या भविष्याचेही सोने होईल. त्यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहता, तर हल्ली सर्व काही ‘डिजिटल’ पद्धतीने सुरु आहे. आताची सर्व कामं ही ‘पेपरलेस’ होताना दिसतात. आपले ’डीमॅट’ खातेदेखील असेच ‘पेपरलेस’ पद्धतीने कार्यान्वित असते. त्यामुळे आता भारताच्या प्रत्येक नागरिकालासुद्धा ‘फिजिकल गोल्ड’वरून ‘डिजिटल गोल्ड’वर झेप घ्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आतापासूनच कंपनी ‘रजिस्ट्रेशन’ करून ‘डिजिटल गोल्ड’ प्लॅटफॉर्मवर उतरलंच पाहिजे, असे म्हणायला हरकत नाही!







आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.