चीन आणि ‘कोविड’कथा

    11-Jan-2023   
Total Views |
चीन


चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने भयंकर रुप धारण केले आहे. तिथल्या शास्त्रज्ञांच्या मते, याच आठवड्यात हा आकडा नवा विक्रम स्थापित करणार असल्याचे चिन्ह आहे. दरदिवशी ३७ लाख नवे रुग्ण सापडत आहेत, तर धक्कादायक म्हणजे २३ जानेवारी रोजी मृतांचा आकडा हा २५ हजारांपार जाणार आहे. संकटकाळात तिथे भारतीय औषधांची मागणी अचानक वाढली आहे. मात्र, त्यातही चिनी बाजारपेठांत भारतीय औषधांच्या नावाखाली बनावट औषधे विकली जात आहेत. भारतात सध्या नव्या ‘एक्सबीबी १.५’ या नव्या विषाणूचे एकूण आठ रुग्ण आहेत.


 ‘ओमिक्रॉन’चा सर्वाधिक वेगाने पसरणारा कोरोनाचा नवा ‘व्हेरिएंट’ मानला जातो. याच विषाणूमुळे संपूर्ण चीनमध्ये खळबळ माजली आहे. चीनमध्ये ८ जानेवारीला सर्वच सीमा खुल्या करण्यात आल्या होत्या, त्यानंतर ‘इमिग्रेशन सेंटर’च्या बाहेर पासपोर्ट नूतनीकरणासाठी रांगा लागल्या. इतकी वर्षे जेव्हा कोरोना आटोक्यात होता त्यावेळी ‘झिरो कोविड’च्या नावाखाली लोकांना डांबून ठेवण्यात आले. आता कोरोना पुन्हा पसरू लागला, तर ज्या देशांनी चिनी नागरिकांना येण्यापासून रोखले आहे, अशा देशांवर कारवाईची भाषा केली जात आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकूण २०० कोटी लोक येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यात शांघाईतील विमानतळावर एकूण ६५ लाख प्रवासी येणार असल्याची शक्यता आहे.

दोन्ही विमानतळावरून एकूण ६५ हजारांहून अधिक विमाने उड्डाण घेत आहेत. नव्या विषाणूचा ‘व्हेरिएंट’ चीनला डोकेदुखी बनला असून आता अमेरिकेकडेही यासाठी मदत मागितली आहे. पुडौंग या विमानतळावर एकूण प्रवाशांच्या संख्येत ४२ टक्के वाढ झाली आहे. याच विमानतळावर दरदिवशी हजार विमानांची येजा असते. हांगकियाओ विमानतळावर प्रवासी संख्या ४६ टक्क्यांनी वाढणार आहे. ‘झिरो कोविड’ पॉलिसीमुळे नागरिकांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ वाढू शकली नाही. या काळात ती वाढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी प्रभावी लसीकरणही व्हायला हवे. चीनच्या लसीकरणाचा इतिहास पाहाता तिही शक्यता कमीच. दुसरीकडे जपानही कोरोना संकटाने पिचला आहे. याच आठवड्यात एकूण ११ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.

‘जपान टुडे’ या वृत्तपत्रानुसार, ९ जानेवारीला एकाच दिवसात ९५ हजार रुग्ण आढळले आहेत. १५ जानेवारीनंतर ही परिस्थिती आणखी भयाण होणार असल्याची चिंता आहे. अमेरिकेत एकूण ‘एक्सबीबी १.५’ या नव्या ‘व्हेरिएंट’चे रुग्ण वाढू लागलेत, तर जगभरात एकूण ६६ कोटी, ८८ लाख कोरोना रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत एकूण ‘कोविड’ मृत्यू ६७ लाख, १४ हजार, २६६ इतके झाले आहेत. दि. ११ जानेवारी, २०२० रोजी पहिल्या ‘कोविड’ मृत्यूची नोंद झाली होती. ती चीनमध्येच. कोरोनाचे उगमस्थान चीन असल्याचा हा सबळ पुरावा होता.

मात्र, चीन आणि ‘जागतिक आरोग्य संघटनां’नी त्याबद्दल वाच्यताही केलेली नाही. आत्ता चीनमध्ये जे काही सुरू आहे. याची सुरुवात जानेवारी २०२० पासूनच झाली होती. जगभरातील देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले. पण आजही चीन्यांची परिस्थिती हाताबाहेरच आहे. इतके होऊनही चीनची बोटचेपी कायम आहे. १७ देशांनी चीनमधून येणार्‍या नागरिकांविरोधात प्रतिबंध लावला आहे. या देशांत चीनहून प्रवासी आल्यास कोरोना चाचणी व विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे, अशा देशांविरोधात चिनी सरकार आकस बाळगून आहे. चीनमध्ये एकूण लोकसंख्येच्या १८ टक्के जणांना कोरोना संक्रमण आहे. हा आकडा २५ कोटींहूनही वाढण्याची भीती आहे. २०२० नंतर अशी चीनवर आलेली ही पहिलीच वेळ आहे.

ज्या ‘झिरो कोविड पॉलिसी’चा गवगवा चीनने केला तीही सपशेल आपटली. कोरोनाविरोधात लढण्यासाठी चीनने लस उपलब्ध केली तीही फोल ठरली. कोरोना विरोधात औषधनिर्मितीही चीनला करणे शक्य झालेले नाही. आजही तिथे भारतीय औषधांवरच भ्रांत आहे. तिही उपलब्ध होऊ शकली नाहीत, म्हणून त्यातही भेसळीचे प्रकार सुरू झाले आहेत. या सगळ्यात भारतासारख्या विकसनशील देशाने नेतृत्वाच्या आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कानाकोपर्‍यात लस पोहोचवली. तशीच मदत जगभरातील देशांनाही केली. आरोग्य कर्मचार्‍यांचे मनोबल वाढविण्यासाठी देश एकवटला. कोरोनाच्या भळभळत्या जखमा आपण विसरूनही गेलो मात्र, चीनमध्ये तीन वर्षांनंतरही परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’च आहे. हे चिनी नागरिकांचेच दुर्दैव...





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.