इराणचा निषेध

    10-Jan-2023   
Total Views |
Mohammad Mehdi Karami and Syed Mohammad Hosseinikarmi sentenced to death for their participation in the anti-hijab movement in Iran


तो केवळ २१ वर्षांचा होता. वयाच्या ११ व्या वर्षांपासून तो कराटे शिकू लागला आणि तो कराटे चॅम्पियन झाला. ऑलिम्पिकमध्ये खेळून देशाचे नाव रोशन करायचे हे त्याचे स्वप्न होते. त्याने आपल्या हातावर ऑलिम्पिक रींग बनवली होती. खेळाडू म्हणून त्याची जिद्द इतकी होती की त्याने देशाच्या नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेमध्येही विजय मिळवला होता. मात्र त्याला आणि त्याच्या सोबत्याला नुकतीच फाशीची सजा सुनावली गेली. २१ वर्षांचा कोवळा तरुण मृत्युमुखी पडला त्याचे नाव मोहम्मद मेहदी करामी आणि त्याचा साथी सैयद मोहम्मद हुसैनीकरामी.


 इराणच्या न्यायपालिका समाचार एजेंसी मिजानने त्यांच्या फाशीबाबत खुलासा केला. या दोघांना फाशी का दिली याबाबत स्पष्टीकरण दिले गेले की हे दोघे इराण सरकारविरोधी प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. तसेच, ३ नोव्हेंबर रोजी कारज येथे देशाच्या बसीज अर्धसैनिक बलाचे सदस्य सैयद रूहोल्लाह अजामियन यांची हत्या झाली त्या हत्येमध्ये हे दोघे दोषी होते. मात्र या दोघांच्या पालकांच्या आणि इराणी सामान्य नागरिकांच्या मते हे दोघे तरुण निष्पाप होते आणि इराणमध्ये जे ‘हिजाब’विरोधी आंदोलन होते त्या आंदोलनामध्ये हे दोघे सहभागी झाले होते. या दोघा सुशिक्षित तरुणाईमुळे प्रसारमाध्यमामध्ये ‘हिजाब’ विरोधी वातावरण तयार झाले होते.

नेमके हेच इराणी प्रशासनाला खटकले. त्याचा राग म्हणून या दोघांवर आरोप ठेवण्यात आले. करामीच्या आई-वडिलांनी तर समाजमाध्यमावर एक व्हिडिओही प्रकाशित केला होता. त्यांनी आपल्या मुलाच्या जीवाची भिक मागितली होती. खरे तर करामीच्या मातापित्यांना काय वाटले असेल हे शब्दातीत आहे. होतकरू त्यातही खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न पाहणारा तरुण मुलगा तो जनव्यापी आंदोलनामध्ये सामील झाला काय आणि त्यामुळे त्याला फाशी होते काय हे सगळे भयंकर आहे. करामीला अटक केल्यानंतर अगदी अवघ्या आठवड्याभरातच म्हणजे ५ डिसेंबरलाच न्यायालयाने फाशीची सजा सुनावली होती.

यावर करामीचे वकील मोहम्मद हुसैन अघासी यांनी नुकतेच ट्विट केले आणि त्यांच्या ट्विटने जगभरात इराणविरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, फाशीपूर्वी करामीने शेवटची इच्छा म्हणून त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा दर्शवली होती. त्याला मृत्यूपूर्वी त्याच्या आईबाबांशी बोलायचे होते. मात्र, करामीची ही शेवटची इच्छाही इराणी सरकारने नाकारली. केवढे हे क्रौर्य तसेच मोहम्म्द यांनी असेही म्हटले की, करामीचा वकील म्हणून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्याची मी वकिली करणार होतो. मात्र, इराण सरकारने मला त्याची वकिलीही करू दिली नाही. यावर करामीने विरोध म्हणून संयुक्त राष्ट्र मानवाधिकारचे उच्चायुक्त आणि युरोपीय संघाकडे आपली बाजू मांडली होती. त्यानंतर सातत्याने या दोन्ही संघटनांनी आंदोलकांना फाशी देऊ नये, यासाठी इराणकडे आग्रही भूमिका मांडली.

मात्र, इराणने या दोन्ही संघटनांच्या मताला बिलकूल गंभीरतेने घेतले नाही. उलट ४१ जणांना पुन्हा फाशीची सजा सुनावली. इराणमध्ये ‘हिजाब’विरोधी आंदोलनाने आता अत्यंत वेदनादायी वळण घेतले आहे. देशातील युवा युवती आणि एकंदर सगळेच ‘हिजाब’ला विरोध करत आंदोलनात सहभागी होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्माच्या नावावर अत्यंत क्रुर दडपशाही या विरोधात हे इराणी नागरिक एकवटले आहेत. काही वर्षापूर्वी अरब स्प्रिंगच्या नावाने एक वादळ उठले होते आणि त्याने अनेक देशाची सत्ता उलथवून टाकली होती. आज इराणमध्ये चाललेले आंदोलन हे अभूतपूर्वच म्हणायला हवे.कारण, महिलांनी काय कपडे घालावे काय करावे यासाठीची धार्मिकतेच्या नावाखालची बंधन इराणमध्ये आहेत. त्या बंधनाना मुलींमहिलांनी प्रतिकार केला, तर असे म्हणू शकतो की त्यांची ती वैयक्तिक अनुभूतीतून आलेला विरोध असेल.

मात्र या आंदोलनात देशातील पुरूषवर्गही सामील आहे आणि हेच इराणच्या सत्ताधार्‍यांना खटकले. इराणी पुरुष इराणी महिलांच्या हक्कासाठी लढता येत. महिलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याचा कपडे परिधान करण्याचा हक्क द्या म्हणत खुशाल फासावरही लटकत आहेत हेच जगाच्या इतिहासात महत्त्वाचे आहे. स्त्री पुरूष भेद लांघत आज इराणी नागरिक केवळ न्याय हक्कासाठी एकत्र आलेत करामीसारखे कोवळे युवक आज फासावर गेलेत. आज सगळे जग या तरुणांच्या मृत्यूने व्यथित झाले आहे. २१ व्या शतकात ‘हिजाब’ची सक्ती नको म्हणणार्‍यांना फाशी देणारा इराण आणि त्यांची दांभिकता क्रुरता या सगळ्यांचा निषेध.





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.