तालिबानचे नवे फर्मान...!

    01-Jan-2023   
Total Views |
तालिबान


अमेरिकेच्या पळपुटेपणामुळे तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करत स्वतःचे सरकार स्थापन केले. याआधीही तालिबानी शासनाचे अफगाणिस्तानी नागरिकांनी चटके सहन केले आहे. अमेरिकेने तालिबानचा खात्मा करण्यासाठी आपले सैन्य अफगाणिस्तानमध्ये पाठवले. त्याचा परिणाम म्हणून लोकशाही सरकार तिथे स्थापन होऊन शांतताही नांदली. परंतु, ही शांतता फार काळ टिकू शकली नाही. तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. यावेळी अमेरिकेनेही अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला आणि देशाचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनीही देशातून पळ काढत परदेशात आश्रय घेतला.


दरम्यान, अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून तालिबानने तेथील इस्लामिक कायद्यानुसार शरियतचे कठोर नियम लागू केले. गेल्या आठवड्यात तालिबानने महिलांना उच्च शिक्षण आणि गैर-सरकारी संस्थांमध्ये काम तथा नोकरी करण्यावर सक्त बंदी घातली होती. तेव्हापासून, अफगाणिस्तानमध्ये राहणार्‍या महिलांची स्थिती आणखी बिकट झाली आहे. महिलेच्या नोकरीवर अवलंबून असणार्‍या कुटुंबांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे महिलांची आर्थिक स्थिती ढासळण्याची शक्यता असून पर्यायाने अफगाणिस्तानच्या आर्थिक स्थितीवरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. प्रत्यक्षात अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता. तेव्हापासून, तालिबानने अनेक कठोर कायदे अंमलात आणण्यास सुरूवात केली होती.

यात विशेषतः महिलांना बंधने घालणार्‍या कायद्यांचा सर्वाधिक समावेश होता. तेथील महिलांना उद्यानात, शाळेत जाण्यास, सार्वजनिक ठिकाणी तोंड झाकण्यास आणि पुरुष सोबत्याशिवाय बाहेर जाण्यास बंदी घालणारे फर्मान जारी करण्यात आले. यानंतर आता तालिबानने महिलांच्या उच्च शिक्षणावर आणि नोकरीवरच बंदी घातली आहे. या बंदीबाबत एका १९ वर्षीय अफगाण महिलेने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला शिक्षणासाठी विद्यापीठात जायचे आहे. पण बंदीनंतर ती जाऊ शकत नाही. तालिबान सरकारच्या निर्णयावर दुःख व्यक्त करताना ती म्हणाली, “अल्लाहने कधीही स्त्रीची निर्मितीच केली नसती, तर खूप बरं झालं असतं. जर आपण इतके दुर्दैवी आहोत, तर त्यापेक्षा मरण चांगले. आम्हाला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली जाते. प्राणी तर स्वतःहून कुठेही जाऊ शकतात, परंतु, आम्हा मुलींना घरातून बाहेर पडण्याचा अधिकारही नाही.”

तालिबान सरकारने घेतलेल्या या निर्णयाला अफगाणिस्तानमध्ये सातत्याने विरोध होत आहे. या विरोधातील आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या ‘व्हायरल’ झाले आहेत. तालिबानने मुलींना विद्यापीठातून हाकलून दिले. अफगाणिस्तानातील जनतेने आम्हाला सहकार्य करुन या निर्णयाचा विरोध करावा. एकतर सर्वांना समान हक्क द्या अथवा कुणालाही ते देऊ नका, अशी भूमिका येथील आंदोलनकर्त्या महिलांकडून घेतली जात आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये निदर्शने केल्यानंतर हा विरोध मोडून काढण्यासाठी आंदोलक मुलींना तालिबान सरकारने अटक केली. यातील काहींना नंतर सोडून देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांवर तालिबानी सुरक्षा अधिकार्‍यांनी हल्ला केल्याचेही समोर आले.

अफगाणिस्तानात तालिबानने महिलांवर लादलेल्या बंदीबाबत संयुक्त राष्ट्रानेही आपली चिंता व्यक्त करत आपले अनेक कार्यक्रमही थांबवले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाकडून अफगाणिस्तानला मिळणार्‍या मदत अथवा अर्थसाहाय्यावर बंदी घालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच अफगाणिस्तानातील महिलांच्या हक्कांच्या हननाविरोधात संयुक्त राष्ट्र संघानेही आक्रमक भूमिका घेत तालिबानच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. परंतु, ज्या तालिबानने अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याला आपला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले, त्यावर इतर काही बंधने घालून नेमका काय फरक पडणार, हादेखील प्रश्नच आहे. जगाने कितीही सांगितले तरीही अफगाणिस्तानी जनतेचे दुःख ते स्वतःच जाणून आहे.



अमेरिकेच्या भरवशावर राहून अफगाण सरकारने फार मोठी चूक केली असे म्हणता येईल. परंतु, आता हा लढा तेथील जनतेला लढणेच क्रमप्राप्त आहे. कारण, सध्या तरी कोणत्याही देशाला युद्ध परवडणारे नाही, हे रशिया-युक्रेन युद्धादरम्यान दिसून आले. यावेळी कोणत्याही देशाने युक्रेन अथवा रशियाल थेट मदत करण्यास हात आखडता घेतला. त्यामुळे अफगाणिस्तानील महिलांनी आपली लढाई स्वतः लढत आपला लढा आणखी मजबूत करायला हवा.








आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.