बर्फावर योगासने करणारी श्रेया

    01-Jan-2023   
Total Views |
Shreya Shinde


लहानपणापासूनच योगासनांकडे कल असलेल्या श्रेया शिंदेने अनेक योगासन स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षीसे जिंकली, विक्रम केले, जाणून घेऊया तिच्याबद्दल...


डोंबिवलीकर असलेल्या श्रेया शिंदे हिने बर्फाच्या लाद्यांवर एक तासामध्ये १०० पेक्षा अधिक आसने करून विश्वविक्रम केला आहे. एवढेच नव्हे, तर असे तीन विक्रम तिच्या नावावर आहेत. हा प्रवास श्रेयाने कसा केला, हे जाणून घेऊया.श्रेया शिंदेचा जन्म हा डोंबिवलीत झाला. श्रेया सध्या डोंबिवलीतील पांडुरंगवाडी परिसरात आई-वडील आणि मोठी बहीण श्रुती यांच्यासोबत राहते. श्रेया ही मस्तीखोर असली, तरी ती खूप समंजस आहे. श्रेया नेहमी योग्य निर्णय घेते आणि आपल्या निर्णयावर ती ठाम असते. श्रेया अभ्यासातदेखील हुशार आहे. श्रेया १४ वर्षांची असून ‘मॉडेल इंग्लिश स्कूल’मध्ये इयत्ता नववीत शिकत आहे. तिचे वडील महादेव हे एका खासगी कंपनीत ‘मेकॅनिकल ड्राफ्टमॅन’ म्हणून नोकरी करतात. तिची आई वंदना या योग प्रशिक्षिकाआहेत.

 
श्रेयाने तिच्या आईकडूनच योगाचे धडे गिरविले आहेत. श्रेयाला योगामध्ये आवड असल्याचे वयाच्या सातव्या वर्षापासून तिच्या आईच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनीही श्रेयाला योग शिकविण्याचे ठरविले. पण श्रेयाने वयाच्या दहाव्या वर्षापासून योगासने करण्यास सुरूवात केली. वयाच्या दहाव्या वर्षापासून श्रेया न चुकता दररोज योगासने करीत आहे. ‘कोविड’ काळात शाळा ऑनलाईन होत्या. त्यामुळे या काळाला तिने सुवर्णसंधी समजत योगाचा जास्तीत जास्त सराव करण्यास सुरुवात केली. श्रेया लहान असताना तिने ‘सुहासिनी योग सेंटर’चे योगप्रशिक्षक प्रवीण बांदकर यांच्याकडे बर्फावर योग करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यावेळी श्रेया केवळ दोन ते तीन मिनिटांचा परफार्मन्स करीत होती.

बर्फ थंड असल्याने हातापायाला बधीरपणा येत होता. त्यामुळे बर्फावर ‘प्रॅक्टिस’ करणे कठीण जात होते. बर्फावर योगासने करताना सतत घसरायलादेखील होत होते. त्यामुळे बर्फावर योगासने करणे एक मोठे आव्हान होते. योग करताना लक्षपूर्वक आणि तोल सांभाळत हळूवारपणे सराव करावा लागत होता. सराव करण्यापूर्वी ‘वॉर्म अप’ करून शरीरात उष्णता निर्माण करावी लागत होती. मुख्य म्हणजे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सराव करावा लागत होता. त्यासाठी श्रेयाची आई तिचा आत्मविश्वास वाढवत असे आणि तिच्याकडून सरावदेखील करून घेत असे. त्यामुळेच श्रेयाने ‘कलाम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘वण्डर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ यासह ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’वर मोहोर उमटविली आहे.
श्रेया १३ वर्षांची असताना हरियाणा येथे झालेल्या सातव्या ‘स्टुंडट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स’ची विजेती ठरली होती.

१४ वर्षांची असताना बुद्ध प्रतिष्ठान, नवी मुंबई येथे झालेल्या ‘नवराष्ट्र’ १५ व्या राष्ट्रीय स्तरीय योगासन चॅम्पियनशिप २०२२मध्ये श्रेयाने सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच तिला चॅम्पियनशिप अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. श्रेयाला योगासनांशिवाय अभिनयाची आवड होती. खेळांमध्येही तिला विशेष आवड आहे. ती शाळेत सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. श्रेयाला ‘सायकॉलाजिकल थॉट्स’ वाचायला आवडतात. श्रेया सहा वर्षांपासून शास्त्रीय संगीत शिकत आहे. सध्या ती प्रथम कथ्थक नृत्यामध्ये विशारद करत आहे. व्यायाम हा स्पर्धेसाठी नसावा, असे श्रेया सांगते. श्रेयाला योगस्पर्धा मान्य नसल्या तरी योगाबद्दल जनजागृती व्हावी, योगाचा प्रसार आणि प्रचार व्हावा म्हणून आणि शालेय शिक्षण घेतानाच लहानपणापासून सर्वांना ‘फिटनेस’ची आवड निर्माण व्हावी म्हणून ती अशा स्पर्धामध्ये भाग घेऊन तिच्या वयाच्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करते.

 श्रेया आरोग्याची काळजी घेण्यावर अधिक भर देते. तिला घरचे पौष्टिक, रूचकर आणि आईने बनविलेले जेवण जेवण्यास जास्त आवडते. ‘कोविड’ काळापूर्वी लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये आणि अनाथ आश्रमांमध्ये जाऊन श्रेयाने योगा कॅम्पमध्ये योगासनांचे ‘डेमो’ दिलेले आहेत. श्रेयाचा मोठी झाल्यावर मनुष्य जीवन सार्थकी लागण्यासाठी आणि सर्वांच्या उपयोगी पडण्यासाठी उत्तम समाजसेवक होण्याचा मानस आहे. सर्व मुलांनी खेळ खेळावेत आणि खेळांमध्ये भारताचे नाव सर्व मुलांनी खेळ खेळावेत आणि खेळामध्ये भारताचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचण्यासाठी उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत, अशी श्रेयाची इच्छा आहे.


नेहरू योग केंद्र, ठाणे, ‘मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अ‍ॅण्ड स्पोर्ट्स’कडून घेतलेल्या योग स्पर्धेत पण श्रेयाने पारितोषिक पटकाविले आहे. सोलापूर, लातूर जिल्ह्यात घेतल्या गेलेल्या श्रुती शिंदे यांच्या योग कॅम्पसमध्ये श्रेयाने योगासनांचे प्रात्यक्षिके केलेली आहेत. याशिवाय दहा अनाथ आश्रम आणि जवळजवळ २० पेक्षा जास्त शाळांमध्ये जाऊन तिने ‘डेमो’ दिले आहेत. श्रेयाच्या पुढील कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.






आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.