अदृश्य परकीय आक्रमणे

    01-Jan-2023   
Total Views |
LantanaFlowerLeaves

नुकतेच वन्यजीव संरक्षण सुधारणा विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेने मंजूर केले. या विधेयकाद्वारे वन्यजीव संरक्षण कायदा , १९७२ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘आक्रमक परदेशी प्रजातीं’ना समजून त्यांचे योग्य नियोजन करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. पण या आक्रमक प्रजाती म्हणजे नक्की काय, जाणून घेऊया...


महाराष्ट्र हे भारतातील प्रमुख कृषी राज्यांपैकी एक आहे. राज्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. परंतु, तणांची असामान्य वाढ ही शेतकर्‍यांसाठी मोठी समस्या बनत आहे. केवळ शेतीच नाही, तर चराऊ गवताळ प्रदेशदेखील लँटाना कॅमारा, प्रॉसोपिस ज्युलिफ्लोरासारख्या आक्रमक परदेशी प्रजातींनी वेढलेले आहेत.या आक्रमक परदेशी प्रजाती केवळ या प्रदेशातील जैविक विविधतेलाच धोका निर्माण करतातच, त्यासोबत अन्नसुरक्षा, मानवी आरोग्य आणि आर्थिक विकासावरही परिणाम करतात.
१८०७ साली इंग्रजांनी शोभेचे झाड म्हणून आणलेल्या ’लँटाना कमारा’ या वनस्पतीने भारतातील जवळपास ४० टक्के व्याघ्र अधिवास व्यापला आहे. ही भारतातील सर्वात आक्रमक वनस्पतींपैकी एक म्हणून ओळखली जाते. गुलाबी, पिवळा, नारिंगी या रंगांनी नटलेले लँटाना फूल हे पश्चिम घाटात जवळजवळ सर्वत्र आहे. या आक्रमक परदेशी वनस्पती स्थानिक वनस्पतींशी स्पर्धा करू लागतात. स्थानिक बियाणे आणि रोपांवर प्रभाव पाडतात आणि मातीचीदेखील धूप होते. त्यांचा वनस्पती, प्राणी, पक्षी आणि अगदी मानवावरही घातक परिणाम होतो.
 
’आक्रमक परदेशी प्रजाती’ म्हणजे काय?


आपले मूळ स्थान सोडून इतर देशांतून आलेल्या ज्या सजीवांमुळे जैविक विविधतेला धोका निर्माण होतो त्यांना ’आक्रमक परदेशी प्रजाती’ असे म्हणतात.आक्रमक परदेशी प्रजातीची तीन वैशिष्ट्ये आहेत:
  • ती प्रजाती सजीवांमधील वनस्पती, प्राणी, बुरशी किंवा सूक्ष्मजीव अशा कोणत्याही गटांत असू शकते.


  • विविध प्रकारच्या पर्यावरणीय परिस्थितींमध्ये टिकून नवीन परिस्थितींशी जुळवून घेण्याची क्षमता.


  • या प्रजातींच्या अस्तित्त्वाने मूळ स्थानिक प्रजातींना धोका निर्माण होतो.



LantanaFlowerLeaves

सामान्यतः आढळणार्‍या आक्रमक परदेशी प्रजाती


  • आफ्रिकन गोगलगाय (अचाटीना फुलिका) सर्वप्रथम अंदमान आणि निकोबार बेटांवर आढळलेला हा जीव आज देशभर पसरलाय. नुसताच पसरला नाही, तर इतर मूळ प्रजातींच्या अस्तित्वाला धोका निर्माण करत आहे.


  • पपई मेली बग (पॅराकोकस मार्जिनॅटस) हा किडा मूळ मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील आहे. हा किडा आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये पपईच्या पिकांचा मोठ्या नाश होण्यास कारणीभूत मानला जातो.


  • कॉटन मेली बग (फेनाकोकस सोलेनोप्सिस हा किडा मूळ उत्तर अमेरिकेतील आहे, याचा दक्खन पठारावरील कापूस पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे.


  • अ‍ॅमेझॉन सेल्फिन कॅटफिश ही प्रजाती कोलकात्याच्या आर्द्र प्रदेशातील माशांची संख्या नष्ट करण्यास जबाबदार आहे.



LantanaFlowerLeaves


होतेय खर्चात वाढ



अनेक दशकांपूर्वी, ’वॉटर हायसिंथ’ म्हणजे जलपर्णी ही वनस्पती तिच्या मूळ परिसंस्थेतून अ‍ॅमेझोनिया, ब्राझीलमध्ये पसरली. त्यानंतर भारतातदेखील पोहोचली. पुण्याच्या कात्रज तलावापासून उदयपूरच्या पिचोला तलावपर्यंत आणि बंगळुरूमधील उलसुरू तलावापासून मुंबईतील पवई तलावापर्यंत. या वनस्पतीने महापालिका आणि प्रशासनाला हैराण करून सोडले आहे. जलपर्णी काढून टाकण्याचे उपाय मुख्यतः रासायनिक उपचार करणे किंवा मशीनच्या साहाय्याने काढून टाकणे हे आहेत. परंतु, हे उपाय अत्यंत कुचकामी आणि खर्चिक सिद्ध झाले आहेत.
केंद्र सरकारची भूमिका



आक्रमक परदेशी प्रजातींच्या डेटाबेसची माहिती केंद्र सरकार नियमितपणे अद्ययावत करते. भारतीय प्राणीविज्ञान सर्वेक्षण (नडख) कडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रजातींच्या समुदायातील एकूण १५४ प्रजाती ज्यात जमिनीवरील आणि गोड्या पाण्यातील ५६ प्रजाती आणि सागरी परिसंस्थेच्या ९८ प्रजाती विदेशी/आक्रमक प्रजाती म्हणून नोंद करण्यात आली आहे. आक्रमक प्रजातींचे प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या कृती आराखड्यात
  • विमानतळ आणि बंदरावर विलगीकरण सुविधेला बळकटी.


  • नीरीम (बॅलास्ट) जलाच्या विल्हेवाटीसाठी आयएमओ (आंतरराष्ट्रीय सागरी संघटना) नियमांचे काटेकोर पालन.


  • विदेशी प्रजातींवरील प्रभावाचे मूल्यांकन यांचा समावेश आहे.


तसेच यामध्ये व्यावसायिक उपक्रमासाठी विदेशी प्रजातींचे नियमन, वाढीचा दर, पुनरुत्पादन यश, विखुरण्याची क्षमता आणि बदलत्या हवामानादरम्यान विदेशी प्रजातींची सहनशीलता, विदेशी/आक्रमक प्रजातींवरील स्थिती सर्वेक्षणाचे मूल्यांकन अंतर्भूत आहे. आक्रमक परदेशी प्रजातींच्या संवर्धनासाठी कुठलाही परवाना जारी केला जात नाही.


LantanaFlowerLeaves
 

 घटते देशी मासे



आफ्रिकेतून आलेल्या ’तिलापिया’ माशाने केरळमधील जवळपास सर्व जलस्रोतांचा ताबा घेतला आहे. भारताच्या राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने नाईल तिलापिया, आफ्रिकन कॅटफिश आणि कॉमन कार्प या तीन प्रजातींमुळे देशाच्या गोड्या पाण्यातील जैवविविधतेला मोठा धोका असल्याचे नमूद केले आहे. ’तिलापिया’ मासा इतर स्थानिक माशांच्या संसाधनांवर डल्ला मारून त्यांचे अस्तित्व धोक्यात आणतो. हे मासे जरी प्रामुख्याने शाकाहारी असले तरी ते इतर प्रजातींच्या अंडी आणि लहान माशांची शिकार करतात. या माशाला पक्षी, ओटर, मगरी, साप खातात. या माशामुळे अनेक परिसंस्थांवर परिणाम होतो आणि गोड्या पाण्यातले देशी मासेदेखील कमी होतात. गोड्या पाण्यातील सर्व स्थानिक मासे कायमचे नष्ट करण्याची क्षमता असलेला शोभिवंत माशांमधला ’सकर फिश’ आता काही ठिकाणी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये आढळू लागला आहे.





आक्रमक वनस्पतींची अमर्याद आणि अनियंत्रित वाढ स्थानिक पिकांवर आणि स्थानिक स्थलीय आणि जलीय जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम करत आहे. अशा परकीय आक्रमक वनस्पतींपासून देशी पिके तसेच जैवविविधता वाचवणे ही काळाची गरज आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.