मुंबई : "शिवसेना हा पितृपक्ष आहे, त्यामुळे येणाऱ्या पितृपक्षात बाळासाहेब नक्की खाली येतील आणि आम्हीच जिंकू" असे अजब तर्कट शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी लढवले आहे. शिवसेना हा उद्धव ठाकरेंच्या पित्याचा पक्ष आहे, त्यामुळे शिवसेना हा आमचा पितृपक्ष आहे, त्यामुळे या पितृपक्षात आम्हीच जिंकूच असे दावे किशोरीताईंनी केले आहेत. या सगळ्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या खऱ्या शिवसेनेला शह देण्यासाठी आता हिंदू संस्कृतीचे विडंबन करण्याचा मार्ग आता उद्धव ठाकरे स्वीकारणार का? असा प्रश्न यातून उपस्थित होतोय.
हिंदू धर्मात अशी धारणा आहे की, भाद्रपद कृष्णपक्षात विविध तिथींना पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या शिकवणीचे स्मरण आपण या निमित्ताने करतो. हेच नेमके किशोरीताई विसरल्या. फक्त आणि फक्त सत्तेच्या हव्यासापोटी बाळासाहेबांनी ज्यांच्याशी आयुष्यभर वैर केले अशा काँग्रेस - राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत महाविकास आघाडी या नावाने अभद्र युती जन्माला घातली.२५ वर्षे जुन्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणे ही बाळासाहेबांची शिकवण होती का ? याचा विसर किशोरीताईंनी पडला असावा.
खरी शिवसेना कोणाची एकनाथ शिंदे गटाची की उद्धव ठाकरे गटाची?, शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण नेमके कोणाला मिळणार ? या सर्वच प्रश्नांची सुनावणी २७ सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे. तोपर्यंत निवडणूक आयोगालाही या प्रकरणावर कुठलाही निकाल देता येणार नाहीये. हे सर्व जरी असले तरी दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या सर्वच गोष्टींवर दावे करण्यात येत आहेत. तरी यात हार स्पष्ट दिसत असल्यामुळेच की काय ठाकरेंची शिवसेना हिंदू संस्कृतीचे विडंबन करत आहेत . या सगळ्यात ते नेमके हेच विसरत आहेत की बाळासाहेब असते तर नक्कीच यांची खैर नव्हती.