आर्टिस्टिक इंटिरिअर डिझायनर सुरुची श्रीवास्तव

    08-Sep-2022
Total Views | 65




प्रत्येक माणसामध्ये एक कलाकार दडलेला असतो. काहीतरी कल्पक कलाकृती आपल्याकडून घडावी, असे प्रत्येक कलाकारालाही वाटते. पण तशी संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. बरेचचदा अनेकांच्या मनातल्या कलाकृती मनातच राहतात. पण, या कलाकृतींमधून व्यवसायदेखील उभा करता येऊ शकतो. याचेच एक आदर्श उदाहरण म्हणजे स्वतः एक कलाकार असलेल्या आणि आपल्या कलेला व्यावसायिकतेची यशस्वी जोड देणार्‍या ‘वार्स डिझाईन स्टुडिओ’च्या सुरुची श्रीवास्तव...
 
 
कलाकार हा जन्मावा लागतो, तो कधीच शिकवून तयार होत नाही. तशीच कथा सुरुची यांची. लहानपणापासूनच सुरुची यांना चित्रकलेची आवड होती. त्यांनी त्याचे कधीच कुठे शिक्षण घेतले नाही. उपजतच त्यांच्याकडे हे कौशल्य होते. पण, सुरुवातीला यातच पुढे आपले करिअर असावे, असा विचार त्यांनी केला आणि त्यातून पुढे ते नेमके काय असावे, याचा विचार करत असताना, ‘फॅशन डिझायनिंग’, ‘इंटिरिअर डिझायनिंग’ ही क्षेत्रे समोर होती. स्वतःच्या चित्रकारितेला वाव देऊ शकेल असे क्षेत्रच आपले करिअर असावे, असा विचार करून 2011 मध्ये ‘वार्स डिझाईन स्टुडिओ’ची सुरुवात झाली. याआधी सुरुची यांनी याच चित्रकलेसाठी देश-विदेशांत भ्रमंती केली होती. चित्रकलेचे सगळे प्रकार माहित करून घेऊन त्यांनी त्याविषयी आपला अभ्यास आणि व्यासंग वाढविला आणि मगच त्यांची पावले व्यावसायिकतेकडे वळली.
 
 
‘वार्स डिझाईन स्टुडिओ’ची कार्यपद्धती थोडी वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे घर सुंदर दिसावे असे वाटते. आपल्या घरालाही एक ‘क्रिएटिव्ह टच’ असावा, जेणेकरून आपल्या घराची शोभा वाढेल आणि आपलेही घर सुंदर दिसेल, छान दिसेल. पण, बर्‍याचदा ते त्याच्या आर्थिक आवाक्याबाहेर असते, बर्‍याचदा त्या व्यक्तीला त्याला काय हवे आहे आणि खरेच त्याला कशाची गरज आहे, यातील फरक समजत नसतो. या सर्वच गोष्टींमध्ये सुरुची यांचा ‘वार्स डिझाईन स्टुडिओ’ त्या ग्राहकाला मदत करत असतो. ‘इंटिरिअर’ करणे म्हणजे फक्त घराला काहीतरी सजावट करणे, एवढ्यापुरताच तो विषय मर्यादित नसते, तर घर ही एक कलाकृती आहे आणि तिला त्याच पद्धतीने ‘ट्रीट’ करायला हवे, हा विचार ठेवून त्या ग्राहकाच्या घराची कल्पना केली जाते.
 
 
या कल्पनेनंतर त्या ग्राहकाची गरज बघितली जाते. त्या ग्राहकाला नेमके काय हवे आहे, त्याची गरज काय आहे, या सगळ्याचा विचार केला जातो आणि मगच त्याच्या कामाची नीट रूपरेषा आखली जाते. यानंतर त्याच्या एकूण आर्थिक आवाक्यात बसेल अशा पद्धतीने कामास सुरुवात होते. संपूर्णपणे त्या व्यक्तीच्या गरज आणि त्यातून उलगडणारी कलाकृती यांचा मेळ घातला जातो आणि त्या व्यक्तीचे घर अशा पद्धतीने सजवले जाते. यातून त्या ग्राहकाचे समाधान हा सर्वात मोठा भाग असतो आणि तेच ‘वार्स’चे प्रमुख काम आहे.
 

याच बरोबरीने सुरुची यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी या सगळ्या व्यवसायाच्या व्यापातून सांभाळलेली स्वतःची आवड. स्वतः एक उत्तम चित्रकार असल्याने सुरुची यांनी आपल्या ‘इंटिरिअर’च्या व्यवसायाबरोबरच आपल्या चित्रकलेची आवडही जपली आहे. त्या व्यावसायिकरित्या चित्रकारितेचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून स्वतःची आवड जपून त्याला व्यावसायिकतेची जोडही दिली आहे. वेगवेगळ्या प्रदर्शनात भाग घेऊन सुरुची आपली चित्रकला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तसेच, जर कोणाला खासगी चित्रे काढून हवी असतील तर तशा पद्धतीनेही सुरुची चित्रे काढून देतात. अशा प्रकारे दोन्ही व्यवसायांतून सुरुची यांनी आपली आवड, ‘फॅशन’ या सर्व गोष्टींना व्यावसायिकतेची जोड दिली, जे फारच कमी लोकांना जमते जे सुरुची यांनी करून दाखवले आहे. यातून स्वतःची कला जपण्यातूनही अर्थार्जन होऊ शकते आणि आपले करिअर उभे राहू शकते हे सुरुची यांनी दाखवून दिले आहे.
 
 
भारतात तसे ‘इंटिरिअर डिझायनिंग’ या गोष्टींबद्दल गेल्या काही वर्षांतच लोकांचा ओढा वाढायला लागला आहे. याआधी या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले जात नव्हते. याआधी बर्‍याच जणांचे या क्षेत्राच्या गरजेबद्दल या क्षेत्राच्या महत्त्वाबद्दल ज्ञान फारच तोकडे होते. या तोकड्या ज्ञानामुळे या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा आणि पूर्वग्रहदूषित होता. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात सुरुची यांनाही या भावनांचा सामना करावा लागला होता. पण, जेव्हा सुरुची यांनी परदेशांत भ्रमंती केली, अमेरिका, इंग्लंड या देशांमध्ये भ्रमंती केली तेव्हा तिथली संस्कृती बघून, तिथले त्यांचे इंटिरिअर, कलाक्षेत्र या सर्व गोष्टींबद्दलची जागरूकता, त्यांची या गोष्टींबद्दलची आस्था हे सगळे पाहून सुरुची खूप प्रभावित झाल्या होत्या. तशी संस्कृती भारतात का नाही, असा विचार करून त्यांनी भारतात जेव्हा व्यवसायाला सुरुवात केली. तेव्हा, सुरुवातीला जरी लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असला तरी आता गेल्या काही वर्षांत तो बदलतोय. सध्या भारतात या क्षेत्राची वाढ जोमाने सुरू आहे. आज प्रत्येक जण आपले घर सुंदर दिसावे यासाठी प्रयत्नशील असतो. याचमुळे भारतात या क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत आणि या क्षेत्राची भविष्यातील वाढ खूप मोठी असेल, असेही सुरुची यांनी सांगितले.


नवीन येणार्‍या ‘स्टार्टअप्स’नी कायम आपल्या स्वतःच्या फॅशनवर विश्वास ठेवावा. जेणेकरून आपण जे काम करतोय त्यात आपल्याला आनंद, आपली वैचारिक प्रगती या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. अशाच कामांमुळे आपली प्रगती होणार आहे. त्यामुळे असेच काम नव्या व्यावसायिकांनी शोधले पाहिजे. यातून पुढे जाऊन आपल्या ग्राहकांशी आपला उत्तम संवाद असणे गरजेचे आहे. या संवादातूनच आपली आणि आपल्या ग्राहकांची नाळ जोडली जाते आणि तीच आपल्या व्यवसायवाढीसाठी उपयुक्त असते. त्यामुळे नव्या व्यावसायिकांनी या गोष्टींचा जरूर विचार करावा. आपल्या फॅशनलाच व्यवसाय बनवला की आपल्या कामात नैसर्गिक आपलेपण येतो.
 

सर्वांत महत्त्वाचे सुरुची सांगतात की, कलाकाराला व्यवसाय करता येत नाही असे म्हटले जाते. पण, हे खूपच चुकीचे आहे जर कलाकारानेही आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या अर्थार्जनासाठी उत्तम योजना जर केली, तर कलाकारही उत्तम व्यावसायिक होऊ शकतो फक्त कलेशी प्रामाणिक असले पाहिजे. जे नवीन उद्योजक या ‘इंटिरिअर डिझाईन’च्या क्षेत्रात येऊ इच्छित असतील त्यांच्यासाठी खूप वाव आहे. पण यात एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपल्या ग्राहकाच्या एकूण बजेटमध्येच आपल्याला काम करायचे आहे आणि तसे जर केले तरच आपले काम उत्तम होणार आहे. स्वतःच्या उपजत कलागुणांना ओळखून त्यातून स्वतःच्या व्यवसायाची यशस्वी हाताळणी करणार्‍या सुरुची श्रीवास्तव यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे.
 
 
आपल्याकडे कलाकार म्हणून काम करत असताना, अर्थार्जनाचे स्रोत बरेचदा कमीच असतात. संपूर्णपणे कलेवरच अवलंबून घर चालवणे हे बर्‍याचदा कठीणच असते. त्यामुळे कलाकाराला अर्थार्जनासाठी त्याची कला सोडून इतर कुठलातरी व्यवसाय निवडावा लागतो. त्यामुळे त्याचे त्याच्या कलेकडे दुर्लक्षच होते. हे खूप नुकसानकारक आहे. कलाकारांना त्यांच्या कलेच्या जोपासनेबरोबरच आर्थिक मिळकतीचा स्रोत तयार करता यायला हवा, जेणेकरून त्यांना त्यांची कलाच त्यांच्या आयुष्याचे जीवीतधेय्य मनात येईल.



- हर्षद वैद्य 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121