मुंबई : याकूब मेमनची कबर भाजप सरकारच्याच काळात तयार झाली असल्याचा दावा करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेकडून सारवासारवीचा प्रयत्न केला आहे. २०१५ मध्ये फडणवीस सरकारच्या काळातच याकूबला फाशीची शिक्षा दिली गेली होती. त्यावेळी त्याचे शव त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द का केली गेली ? त्याचेही कसाबसारखे समुद्रात दफन का केले नाही? असे उलट सवाल त्यांनी केले. हे सगळे आरोप करत असताना ते हे विसरले की प्रश्न किंवा वादंग हे याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून उठला आहे, त्याची कबर का केली गेली या वरून नाही.
२०१५ मध्ये देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वाखाली भाजप - शिवसेना युतीचे सरकार होते. ज्यावेळी याकूबचे शव हे कुटुंबियांकडे सुपूर्द केले गेले तेव्हा शिवसेनेने त्यावर काहीच आक्षेप घेतला नव्हता. हे सगळे आदित्य सोयीस्कर विसरले आहेत. आज शिवसेना दावा करत असली की ते कबरस्तान खासगी असून त्याच्याशी महापालिकेचा काहीच संबंध नाही पण जेव्हा हे सुशोभीकरण सुरु होते तेव्हा महापालिकेने काहीच कारवाई कशी केली नाही. ते विसरले होते का? तिकडे कोणाची कबर आहे ते?
खासदार अरविंद सावंत यांनीही या प्रकरणाशी शिवसेनेचा संबंध नाही असे ठासून सांगितले आहे. त्यांनीही आदित्य जे म्हणले त्याचीच री ओढली आहे तरीही जो मूळ मुद्दा आहे तो उरतोच की हे सगळे होत असताना शिवसेना हे उघड्या डोळ्यांनी बघत का राहिली? या प्रश्नाचे उत्तर शिवसेना काय देणार? शिवसेनेचा खोटा हिंदुत्ववादी चेहरा आता उघड झाला आहे त्यामुळे शिवसेनेने कितीही मलमपट्टी केली तरी त्याची भेसूरता लपणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावेच.