गांधीनगर : देशातील राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या बोगस देणग्यांच्या संदर्भात आयकर विभागाने बुधवारी गुजरात मध्ये छापेमारी सुरु केली आहे. गुजरात मधील तब्बल ४० ठिकाणी ही छापेमारी सध्या सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशांवरून ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे सध्या ८७ असे नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत ज्यांचा कुठेच काही ठावठिकाणा नाही. बेहिशेबी काळे धन गुंतवण्यासाठी या पक्षांचा वापर केला जात असल्याचा निवडणूक आयोगाचा संशय आहे.
देशभरात गुजरात, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यांमधील १००० ठिकाणांवर ही छापेमारी सुरु होणार आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठया प्रमाणावर बेहिशोबी धन गुंतलेले असल्याचा संशय असल्याने हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाच्या मते संपूर्ण देशभरात असे २१०० राजकीय पक्ष आहेत ज्यांची कुठलीच कार्यालये अस्तित्वात नाहीत. या आधी सक्तवसुली संचालनालयाकडूनही अशाच प्रकारची कारवाई झाली होती.
निवडणूक आयोगाकडे असलेल्या या राजकीय पक्षांची कुठलीही कार्यालये नाहीत, त्यांच्याकडून कुठलाही करभरणा होत नाही , त्यांचे इतर कुठलेही पदाधिकारी यांची नावे उपलब्ध नाहीत. त्यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या कुठल्याही नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर अशा राजकीय पक्षांवर कारवाईचा बडगा गर्ल जाणार आहे.