ईडी कोठडीतला राऊतांचा 'लूक' व्हायरल!

    06-Sep-2022
Total Views |
रूट
 
 
 
मुंबई : मुंबईतील गोरेगाव स्थित पत्राचाळीच्या पुनर्विकासातील कथित अनियमिततेशी संबंधित ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली. उपनगरातील गोरेगावमधील पत्राचाळीच्या पुनर्विकासात कथित आर्थिक अनियमितता केल्याप्रकरणी राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने दि. १ ऑगस्ट रोजी ‘मनी लॉण्ड्रिंग’ प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) अटक केली होती. त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी विशेष पीएमएलए न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली.
 
 
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून काही पत्राचाळ प्रकरणात सहभागी काही म्हाडा अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पीएमएलए कायद्यानुसार हे जबाबच पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याने संजय राऊतांच्या विरोधात ईडीकडे आता भरपूर पुरावे आहेत. या सर्व गोष्टींमुळे संजय राऊतांचा पाय अजूनच खोलात गेला आहे. याच पुराव्यांच्या आधारावर संजय राऊतांना अटक करण्यात आली आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रक्रल्पात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा संजय राऊतांवर आरोप आहे. संजय राऊत आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत यांची कंपनी असलेल्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या सर्वांचाच या घोटाळ्यात सहभाग आहे. प्रवीण राऊत यांना ईडीकडून याआधीच अटक करण्यात आली, आणि आता न्यायालयाने राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.