शिक्षणातून सक्षमीकरणाकडे...

Total Views |
Mansa
 
 
 
‘वृंदावन फाऊंडेशन’, ‘विवेक व्यासपीठ पुणे’ यांचा ‘गुरुजन गौरव पुरस्कर’ यंदा प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेणारा लेख...
 
 
जीवन अध्ययन विस्तार’ हा औपचारिक शिक्षण विभागातील तितकासा परिचित नसणारा एक अभ्यासक्रम. मात्र, राज्याच्या अनेक ध्येय-धोरणांचे मूल्यांकन आणि यशस्वी अंमलबजावणीत या विभागाचे महत्त्वाचे योगदान आहे. मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबईच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागात प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण तब्बल मागील 17 वर्षांपासून कार्यरत आहेत.
 
 
1971 साली ‘एसएनडीटी’मध्ये हा विभाग सुरू झाला. पूर्वी हा विभाग ‘निरंतर आणि पूरक शिक्षण’ म्हणून ओळखला जात होता, आता याचे नामांतर ‘आजीवन अध्ययन विस्तार विभाग’ असे झाले आहे. सरकारच्या ध्येय-धोरणांची अंमलबाजवणी करणे किंवा या धोरणांचे मूल्यांकन करण्याचे काम हा विभाग करतो. सुरुवातीला या विभागात साहाय्यक संचालक म्हणून रूजू झालेले डॉ. चव्हाण आज विभागाचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
 
 
डॉ. प्रभाकर साहेबराव चव्हाण यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील मादनी या छोट्याशा खेड्यात झाला. वडील शेतमजूर असल्याने ग्रामीण भागातील जीवनसंघर्ष त्यांनी अगदी जवळून अनुभवला. तीन मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना वडिलांची होणारी ओढाताण पाहता या परिस्थितीतून कुटुंबाला बाहेर काढण्याची जिद्द डॉ. चव्हाण यांच्यात निर्माण झाली. वडिलांच्या प्रोत्साहनपूर्ण मार्गदर्शनामुळे पुढची वाट पार करणे अधिक सोयीचे झाले.
 
 
डॉ. चव्हाण यांचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण गावीच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, तर सहावी ते दहावीपर्यंतचेशिक्षण गावापासून पाच किलोमीटरवर असणार्‍या श्रीशिवाजी हायस्कूल, डोणगाव येथे झाले. 1990 मध्ये डॉ. चव्हाण यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमी औरंगाबादेत पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ नावाची शैक्षणिक संस्था जी विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी ‘स्कॉलरशिप’ देते, याचं ‘स्कॉलरशिप’च्या माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण करायचे हा ठाम विश्वास घेऊन डॉ. चव्हाण औरंगाबादेत आले.
 
 
औरंगाबादेतील नामांकित अशा देवगिरी महाविद्यालयात प्रवेश मिळविला. पुढे मिलिंद महाविद्यालयातून ‘बीएस्सी’चे शिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ‘भौतिकशास्त्र’ विषयातून ‘एमएस्सी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान डॉ. चव्हाण यांचा नंबर ‘बी.एड्’ला लागला. ‘बी.एड्’ केल्यानंतर मी ‘एम.एड्’ही केले. यादरम्यान डॉ. चव्हाण यांची भेट डॉ. एस.टी.मगरे यांच्याशी झाली. पुढे यांच्याच मार्गदर्शनात डॉ. चव्हाण यांनी ‘पीएच.डी’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. हे सगळं सुरू असताना आर्थिक पाठबळ असावं, या हेतूने डॉ. चव्हाण यांनी अध्यापक महाविद्यालय, गेवराई इथे दोन हजार रुपये मानधनावर नोकरीला सुरुवात केली. पाच वर्षे याठिकाणी अध्यापन केले.
 
 
यादरम्यान डॉ. चव्हाण यांचा विवाह झाला. विवाहानंतर खर्‍या अर्थाने त्यांच्या एका नवीन प्रवासाला सुरुवात झाली. काही दिवसांतच सातव महाविद्यालय, कळमनुरी येथे डॉ. चव्हाण यांना चांगल्या मानधनाची नोकरी मिळाली. डॉ. चव्हाण यांचे अध्यापन कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर दिग्रसमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यापक महाविद्यालय, परभणी या शैक्षणिक संस्थेने त्यांना प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी दिली. याठिकाणी डॉ. चव्हाण यांनी दोन वर्षे प्राचार्य म्हणून काम पहिले.
 
 
2007 ला डॉ. चव्हाण यांची ‘पीएच.डी’ पूर्ण झाली. त्याचवेळी ‘एसएनडीटी’मध्ये निरंतर आणि पूरक शिक्षण या विभागात साहाय्यक संचालक म्हणून ते रूजू झाले. 2007 ते आजतागायत ते या विभागात कार्यरत आहे. या 17 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विभागातील विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक प्रकल्पांमध्ये संशोधनास साहाय्य केले. तसेच,विविध मासिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स, सेमिनारमध्ये त्यांनी आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले आहे. त्यांची तीन पुस्तके प्रकशित झाली आहेत, तर 2008 सालापासून ते ‘एम.ए’ (एनईफडी)या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. 2012 ते 2017च्या साक्षर भारत अभियानाचे मूल्यांकन करण्याचे काम डॉ.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले.
 
 
याचे अहवाल केंद्र सरकारला वेळोवेळी पाठविण्यात आलेले आहेत. नवी मुंबईतील नव्याने होतं असलेल्या विमानतळाच्या कामाचे सर्वेक्षण करण्याचे काम या विभागाकडे होते. या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठीच्या उपाययोजना सुचविण्याचे काम विभागाकडे होते. शेतमजुरांच्या समस्या मांडणारे एक संशोधन पुस्तक स्वरूपात लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांचे अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.