पत्रकारांना सिडकोची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा! सोडतीतील 'ती' अट शिथिल
05-Sep-2022
Total Views | 73
24
नवी मुंबई : सिडको गृहनिर्माण योजनेत नवी मुंबईतील पत्रकारांना अडचण ठरणारी अट शिथिल करण्यात आली आहे. यापूर्वी पत्रकारांना सिडकोतून घरांसाठी अर्ज करण्यासाठी राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाकडून प्राप्त कराव्या लागत होत्या. ही अट आता शिथिल करण्यात आली असून यानंतर सिडकोमार्फतच शहानिशा करून पत्रकारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. या निर्णयामुळे पत्रकारांना सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील घरे मिळण्याचा मार्ग आता सुकर होणार आहे.
सिडकोमार्फत गृहनिर्माण योजनांद्वारे सर्वच आर्थिक स्तरांतील नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करुन दिली जातात. सिडको गृहनिर्माण योजनांतील सदनिका या विविध प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांनाही राखीव ठेवल्या जातात. यापूर्वी पत्रकारांना, पत्रकार प्रवर्गातील सदनिकेसाठी अर्ज करताना महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाकडून ते पत्रकार प्रवर्गातील असल्याबाबतचे पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करावे लागत होते. या नियमानुसार पात्र होऊ न शकलेल्या पत्रकारांना सोडतीपासून वंचित रहावे लागत होते. तसेच अनेक पत्रकार अर्जदारांना घरांचा ताबा मिळण्यासही विलंब होत होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला या संदर्भात निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट सिडकोने आता शिथिल केली आहे. यापुढे गृहनिर्माण योजनेत सोडतीत यशस्वी ठरणाऱ्या पत्रकार अर्जदारांची पात्रता सिडकोमार्फतच निश्चित केली जाईल. सिडकोने कायम पत्रकारांचा सन्मान केला आहे. पत्रकारितेविषयक उपक्रमांसाठीदेखील सिडकोने नेहमीच सहाय्य केले आहे. यावेळीही राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार पत्रकारांना सिडको गृहनिर्माण योजनेतील घरे अधिक सुलभतेने मिळण्यासाठी पात्रतेबाबतची अट शिथिल केली आहे, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.