चिपळूणचे जखमी खवले मांजर उपचारासाठी रवाना

पुण्यात "रेस्क्यू" संस्थे मार्फत केले जाणार उपचार

    05-Sep-2022
Total Views |
ss
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर बीटमधील जंगलात एक खवले मांजर जखमी अवस्थेत आढळून आले होते. याची माहिती सह्याद्री निसर्गमित्र परिवाराच्या भाऊ काटदरे यांनी वन विभागाला दिली. त्यानुसार या खवले मांजराचा शोध घेऊन, ते विभागीय कार्यालयात आणण्यात आले. हे मांजर अत्यंत जखमी अवस्थेत असल्यामुळे ते पुणे स्थित रेस्क्यू या संस्थेकडे दि. ४ सप्टेंबर रोजी उपचारासाठी पाठवण्यात आले. या खवले मांजरावर उपचार सुरू करण्यात आले असून, ते पूर्ण बरे झाल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
 
या खवले मांजराच्या हऱ्याजवळ, डोळ्याजवळ, हाताखाली आणि पाठीवर खोल जखमा आहेत. या जखमा दुसऱ्या प्राण्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचा संशय आहे. हे खवले मांजर चिपळूण वनविभागानकडून आरईएसक्यू वन्यजीव टीटीसी, पुणे येथे पाठवण्यात आले आहे. हे खवले मांजर आले तेव्हा ते गंभीर अवस्थेत असल्याचे पशुवैद्य आणि पुनर्वसन करणार्‍या डॉ. चेतन वंजारी यांनी सांगितले. डॉ. निकिता मेहता आणि डॉ. कल्याणी ठाकूर, सोनेश इंगोले, श्रीनाथ चव्हाण यांच्या टीमने या खवले मांजराला स्थिर केले, आणि जखमांवर उपचार केले. यानंतर खवले मांजराला खायला दिले. गुरुवारी दि. ४ सप्टेंबर रोजी रात्रभर त्याचे निरीक्षण करण्यात आले. शुक्रवारी या खवले मांजराने थोडी प्रगती दाखविली. परंतु, गंभीर जखमांमुळे संसर्ग होण्याची शक्यता आहे.
 
या मोहिमे दरम्यान नेहा पंचमिया आणि रेस्क्यू टीमचे सहकार्य लाभले. या खवले मांजरावर उपचार सुरू करण्यात आले असून, ते पूर्ण बरे झाल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. असे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी सांगितले. या जखमा बरे होण्यास थोडा वेळ लागेल. असे डॉ. निकिता मेहता, वन्यजीव पशुवैद्यक यांनी सांगितले. चिपळूण वन विभागाच्या तात्काळ प्रतिसादामुळे या जखमी खवले मांजरावर उपचार करण्यास मदत झाली. अशा वेळेला योग्य वेळेवर हस्तक्षेप करणे अत्यंत महत्वाचे असते. खवले मांजर हे प्राणी अत्यंत संवेदनशील असतात असे रेस्क्यूच्या संस्थापिका नेहा पंचमिया यांनी सांगितले.