टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे वाहन-अपघातात निधन

    04-Sep-2022
Total Views |
cyrus
 
 
 
मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी दि. ४ सप्टेंबर मुंबईजवळील पालघर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. कार चालकासह त्याच्यासोबत प्रवास करणारे अन्य दोन जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना गुजरातमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
 
 
कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'सूर्या नदी'च्या पुलावरील चारोटी नाका येथे हा अपघात झाला. मिस्त्री यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कासा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सन  २०१२ मध्ये रतन टाटा यांनी पायउतार झाल्यानंतर 'टाटा सन्स' या व्यावसायिक समूहाच्या नेतृत्वासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. परंतु, २४ ऑक्टोबर २०१६ रोजी, टाटा सन्सच्या बोर्डाने मिस्त्री यांना अध्यक्षपदावरून दूर करण्यासाठी मतदान केले. नटराजन चंद्रशेखरन यांची लवकरच नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. गैरव्यवस्थापन आणि अल्पसंख्याक भागधारकांच्या हक्कांचे दडपशाहीच्या आरोपांनी हा वाद चिघळला. २०२१मध्ये न्यायालयाने टाटाच्या बाजूने दिलेल्या निर्णयामुळे शापूरजी पालोनजी समूह आणि टाटा सन्स यांच्यातील संबंध आणखीन बिघडले. सायरस मिस्त्री यांचे वडील पालोनजी मिस्त्री यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी जून २०२२ मध्ये निधन झाले होते.