शाळा-महाविद्यालयाच्या प्रांगणात पाऊल टाकताच वर मान उचलून पाहण्याची हिंमत न करणारा शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कसा करू शकणार? या व्यवस्थेने त्याला मूकबधिर करून टाकले आहे. कान असून ऐकायचे नाही, डोळे असून पाहावयाचे नाही. संस्थाचालकांचे सर्व प्रकारचे शोषण निमूटपणे सहन करायचे. त्यांच्या गैरवर्तनाविषयी चकार शब्दही बोलायचा नाही. आजच्या शिक्षक दिनी शिक्षणक्षेत्रातील शिक्षकांच्या अवस्थेचा घेतलेला आढावा व त्यांना केलेले आवाहन...
काही प्रखर ध्येयवादी शिक्षकांनी स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी, यासाठी राष्ट्रसेवेची प्रेरणा देणे, त्याकरिता निवासी गुरुकुल सुरू करून, प्रयोगशील शिक्षण देणे हा त्यांच्या कार्याचा महत्त्वपूर्ण भाग होता. आपले इप्सित साधण्यासाठी वारंवार अपेक्षित विचार त्यांच्या मनावर बिंबवून, त्यांच्या हातून राष्ट्रकार्य घडवून आणणे, हे आपले जीवितकार्य आहे, हा विचार घेऊन जगणारे शिक्षक देशाच्या मानवी संपत्तीला आकार आणि दिशा देण्याचे कार्य करीत होते. विद्यार्थी जीवनात चारित्र्य निर्माण करणे हा त्यांच्या कार्याचा प्रारंभ होता, राष्ट्रकार्य हे इप्सित होते. चारित्र्याशिवाय कोणत्याही सकारात्मक कार्याची अपेक्षा करणे, दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता असते. ध्येयवेड्या शिक्षकाची गरज प्रत्येक कालावधीत असते. समाजाला सर्वांगीण शिक्षणाची गरज असते. त्यातच जीवनाची परिपूर्णता असते. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या अंत:प्रेरणांना आवाहन करणे शक्य झाले तरच शिक्षणाची प्रक्रिया सुरू होते. अन्यथा विद्यार्थी प्रमाणपत्र जमा करणारा एक यंत्रमानव बनतो. वर्तमानस्थितीत आपण तोच अनुभव मोठ्या प्रमाणात घेत आहोत.
शिक्षणाने विद्यार्थ्यांत निर्भयता, आत्मविश्वास आणि आत्मप्रतिष्ठा निर्माण केली पाहिजे. सुशिक्षित युवकात भीती हा प्रकार वेळोवेळी जाणवत असेल, कोणतेही काम करताना मी ते करू शकेन का? हा प्रश्न त्याला पडत असेल, त्याबरोबरच हे शिक्षण त्याला प्रमाणपत्र देते, पण त्याच्या जीवनातील प्रश्न सोडवीत नाही, मूलभूत गरजा भागवित नाही, समाजामध्ये सन्मानाने वागण्याची प्रतिष्ठा देत नाही, याचे कारण तेवढे ज्ञान किंवा तेवढी कार्यक्षमता या सदोष व्यवस्थेतून त्याला प्राप्त करता येत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनात अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रतिष्ठाही मिळू शकत नाही. हे शिक्षण त्याला पांगळे ठेवते, याचे कारण या व्यवस्थेत तर आहेच. पण शिक्षणातून शिक्षक चारित्र्य व राष्ट्रभक्ती निर्माण करण्यात कमी पडला आहे. सामाजिक एकता त्यामुळेच निर्माण होऊ शकत नाही. स्त्री-पुरुष भेदभाव, जातीय विषमता जेव्हा प्रभावी ठरते, तेव्हा शिक्षण देताना आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. सामाजिक विषमतेला जातीव्यवस्थेचे विष कारणीभूत आहे. शिक्षण ज्ञानग्रहण करण्याचे माध्यम तर आहेच, त्याबरोबरच ते आत्मविकासाचे साधनही आहे. शिक्षणात बौद्धिक विकासासोबत शारीरिक, मानसिक व भावनिक विकासही झाला पाहिजे.
बौद्धिक, मानसिक, भावनिक, शारीरिक विकास ही चार परिमाणे शिक्षणाला असतात. परिपूर्ण व्यक्तित्वासाठी सर्वांगीण विकासाची आवश्यकता आहे. बौद्धिक विकास हे मनुष्य जीवनाच्या व्यक्तिमत्वाचे एक अंग आहे. इतर विकास जर झाला नाही, तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व एकांगी राहील. आजच्या शिक्षणपद्धतीत फक्त बौद्धिक विकासालाच महत्त्व आहे. त्यातही केवळ परीक्षा पद्धतीचा व कागदी घोडे नाचविण्याचा प्रयोग महत्तम प्रमाणात सुरू आहे. यालाच आपण सर्वांगीण विकास म्हणावे काय? शिक्षकांची कार्यक्षमता आणि त्याला प्रामाणिकपणे काम करू देणारी व्यवस्था खूप महत्त्वाचीआहे. ज्या ज्ञान मंदिरात या दोन्ही बाबीची पूर्तता झाली, त्या ठिकाणी विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. पण ग्रामीण भागातील शिक्षणाची अवस्था अत्यंत भीषण आहे. फक्त प्रमाणपत्र वाटपाच्या या उपक्रमात सर्वांगीण शिक्षण हे शब्दच अशक्यप्राय वाटतात. त्या संकल्पनेपर्यंत या व्यवस्थेने पोहोचावे कसे? हा भीषण प्रश्न अत्यंत रौद्र रूप धारण करून उभा आहे. तो प्रश्न कोणत्याही विचारी माणसाचे डोके भणाणून टाकतो.
या व्यवस्थेतील शिक्षणसम्राटांना केवळ पैसे कमावून सदैव शिक्षकाच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवण्यात स्वारस्य वाटते. त्याला गुलाम बनविण्यात धन्यता वाटते. शाळा-महाविद्यालयाच्या प्रांगणात पाऊल टाकताच वर मान उचलून पाहण्याची हिंमत न करणारा शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण कसा करू शकणार? या व्यवस्थेने त्याला मूकबधिर करून टाकले आहे. कान असून ऐकायचे नाही, डोळे असून पाहावयाचे नाही. संस्थाचालकांचे सर्व प्रकारचे शोषण निमूटपणे सहन करायचे. त्यांच्या गैरवर्तनाविषयी चकार शब्दही बोलायचा नाही. जेव्हा शिक्षकाची ही गुलाम अवस्था निर्माण होते, तेव्हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि समाजाची उच्चतम अवस्था याविषयी शिक्षकाने विचार करावा.हे आपण म्हणू शकतो? कधीच नव्हती अशा अवनत अवस्थेकडे या पेशाची वाटचाल सुरू आहे. आजही काही मोजक्या संस्था आहेत, तिथे संस्थाचालकांची निवड उत्तम शिक्षकातून केली जाते. त्या संस्थेतील त्या आदर्श परंपरेला वंदनच केले पाहिजे. तो विचार जोपासण्याची, वृद्धींगत करण्याची गरज आहे.
शिक्षणातील नवनिर्मिती, सृजनशीलता याविषयीचा विचार शिक्षक करू शकतो. तो कोणत्याही भाऊसाहेबाचा किंवा दादासाहेबाचा अधिकार नाही, योग्यता तर मुळीच नाही. अशा अपात्र लोकांच्या समोर शिक्षकाला मान खाली घालावी लागते, त्यांच्या समोर त्याला आपली बोलती बंद ठेवावी लागते. तिथे विद्यार्थीहिताचा कोणताही विचार मांडण्याची त्याला बंदी आहे. कारण, संस्था त्यांनी आणली आहे म्हणे? त्यांचा रक्तदाब वाढत असेल तरी ते शिक्षकांच्या समोर वारंवार सांगणार... आम्ही रक्त आटवले आहे, संस्था काढण्यासाठी आणि चालविण्यासाठी! रक्त आटलेले तर कुठेच दिसत नाही. ते वाढतच चालले आहे. एवढे वाढत चालले आहे की, कधी टचकन फुगा फुटेल याचा नेम नाही.
ही गोचीड श्वास संपल्यावरही म्हणतील, आम्ही रक्त आटवले आहे! तेव्हा मेल्यावरही यांच्याविषयी कणभरही दुःख वाटू नये, हे प्रखर वास्तव आहे. पण तेव्हा जर आमचे शिक्षक स्मशानभूमीत त्यांच्या एकेक आठवणी काढून गळे काढत असतील, तर या लाचार वृत्तीला नेमके काय म्हणावे? यांच्या स्वाभिमानशून्यतेची व्याप्ती जर एवढी वाढली असेल, तर अशा महाभागांना पंचारती घेऊन तिथेच ओवाळले पाहिजे. आमची अस्मिता गहाण आहे, याला आमची लाचार वृत्तीच जबाबदार आहे? हा प्रश्न आपल्या मनाला विचारून हे शिक्षकबांधवा त्याचे उत्तरही तुलाच शोधायचे आहे. जर हे आत्मपरीक्षण करण्यास तू कमी पडलास किंवा तू स्वतः कसूर केलास, तर मात्र तुझ्याबरोबरच या भावी पिढ्यांच्या अधःपतनाला तू तेवढाच जबाबदार असशील. हे मान्य करण्यासाठी तुझ्या मनाचा मोठेपणा असू दे. तेव्हा संस्थाचालकांच्या नावाने खडे फोडून आपली चामडी वाचवू नकोस.
सत्य बोलण्याच्या व वागण्याच्या दुष्परिणामांची चिंता करून वारंवार आपल्या भ्याड वर्तनाचे समर्थन करू नकोस. सत्य बोलण्यासाठी आणि वागण्यासाठी हलाहल पचविणारे प्रसंगी प्राणार्पण करणारे शिक्षकही या विश्वात अनेक होऊन गेलेत, हे विसरू नको. अरे, एवढाही स्वतःला जपू नकोस की, या भावी पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुझी मूकबधिर अवस्था एक दिवस या शिक्षण क्षेत्रातील सर्व सुंदर विश्व पार धुळीस मिळवेल! योग्य वेळी तुझ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग करच. सॉक्रेटिससारखे तुला वर्तमान युगात विषप्राशन करावे लागणार नाही. तेवढी लोकशाही जीवंत आहे अजून.
तुझ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर एवढा प्रचंड प्रहार कुणी ही करणार नाही. बांधवा, तुझ्या आत्मविश्वासामुळे एक प्रचंड शक्तिशाली संघटन उभे राहू शकेल. ज्या संघटनामुळे शिक्षणक्षेत्रात अकारण घुसलेल्या या रक्तपिपासू वृत्तीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. हे बघ बांधवा, या समस्त उगवत्या पिढीचा उद्धारकर्ता तूच आहेस. या देशाचा मानव प्रजातीचा तूच आधारस्तंभ आहेस.तुला कुणी सांगण्याची आवश्यकता नाही, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!’ याचे कारण समस्त उगवत्या पिढीच्या पाठीशी तूच उभा आहेस, तूच देणार आहेस, त्यांना जगण्याचे बळ, त्यांच्या भरकटलेल्या, दिशाहीन आणि मृतप्राय अवस्थेला नवसंजीवनी. खूपच अपेक्षा करतो का रे, हा तुमचा एक निवृत्त बांधव? पण बघच, सृजनशील साहसांना सीमा नसतात रे...
-प्रा. वसंत गिरी