टोमणे मारण्याचा हक्क !

आइए, आपका इंतजार हैं !

    04-Sep-2022   
Total Views |

rahulya
 
 
 
 
 
 एका बाजूला आदित्य ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, आपापल्या पक्षातील राजकीय वारसा चालवण्याच्या बाबतीत आपरिपक्वता दिसून येते, त्यावरच हा लेख..  
 
 
'आय लव्ह पेंग्विन!’ मला आवडतात म्हणून तर राणीच्या बागेत माझे ‘स्विटहार्ट’ पेंग्विन आणले होते. काय त्यांचे ते बर्फात राहणे, काय ते त्यांचे डुबूक डुबूक चालणे, उभे राहणे. किती छान! परदेशात असल्यासारखे वाटते. ‘वाईल्ड लाईफ’मध्ये किंवा ‘नेचर शो’मध्ये एकसाथ उभे राहणारे आणि एकसाथ चालणारे पेंग्विन सगळ्यांनी पाहिले असतीलच. पण तरीही जेव्हा मी पेंग्विन मुंबईत आणण्याचा हट्ट धरला, तेव्हापासूनच लोकांना पेंग्विन कळू लागले.  अजून जरा कळ काढली असती, म्हणजे आपली ते सत्ता राहिली असती, तर ‘नाईट लाईफ’सुद्धा लोकांना कळली असती. पण काय करणार? शिंदे काकांनी टाटा-टाटा-बाय-बाय केला. तसे झाले नसते तर सत्ता हातात असती. मी मग भराभर निर्णय घेऊ शकत होतो. पेंग्विन हा महाराष्ट्राचा प्रमुख प्राणी आहे, असा ठरावही मला करायला आवडला असता आणि मी तो केला असता.
 
 
कुणीही या गोष्टीला विरोध केला नसता. कारण, राज आणि बाल असे दोन्ही हट्ट म्हणून आमच्यासोबतच्या सगळ्या नेत्यांनी मला समर्थन दिले असते. इतकेच काय? असा ठराव केला म्हणून खैरे अंकलनी पाया पडून माझा आशीर्वादघेतला असता. बाकीच्या सगळ्या अंकल नेत्यांनी ‘महाराष्ट्राचा प्रमुख प्राणी पेंग्विनच का?’ यावर महाराष्ट्राचे प्रबोधन केले असते. पप्पा, तुम्ही पण ‘किंबहुना पेंग्विनच का?’ यावर फेसबुक ‘लाईव्ह’ केले असते. आपल्या संपादक काकांनी तुमची मुलाखत घेतली असती. तुमच्यामुळे महाराष्ट्राला पेंग्विन माहिती झाला. तुम्हीच खरे ‘पेंग्विनोलॉजिस्ट’ अशीही पदवी त्यांनी दिली असती.
 
 
छे, संपले सारे. पण लोक पेंग्विनला विसरणार नाहीत. माझे ‘पेंग्विन’ प्रेम पाहून राणेकाकांची मुलेसुद्धा सारखी पेंग्विन-पेंग्विन करतात. काल ते कमळवाले आशिष अंकल म्हणाले की, ‘उरल्यासुरल्या पक्षाला आम्ही ‘पेंग्विनसेना’ म्हणायचे का?’ बघा मी पेरलेले पेंग्विनप्रेम कसे विरोधी पक्षांपर्यंत पोहोचले. काय म्हणता, प्रेम नाही तो टोमणा आहे? आम्ही ‘कमळाबाई’ म्हणतो म्हणून ते ‘पेंग्विनसेना’ म्हणणार आहेत? आणि त्यांच्याकडे आणखीन अस्सल मुंबईकरांचे शब्दही आहेत, असेही ते म्हणाले? नाही...नाही... खबरदार हे असले खपवून घेतले जाणार नाही म्हणावं. ते कसे काय टोमणे मारणार? आणि टोमणे मारण्याचे ‘कॉन्ट्रॅक्ट’ दुसरे कोण कसे घेणार? टोमणे मारण्याचा हक्क आमचाच बरं का?

आइए, आपका इंतजार हैं !
जगभरात काहीही वाईट घडले, तर राहुल गांधी लगेच म्हणतात की, तसे भारतात घडेल. कोरोना काळात इटलीहून आल्यावर ते म्हणाले की, “भारतात तर कोरोनाची त्सुनामी येईल.” पण देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदीनामक मजबूत पंतप्रधान करत असल्याने तसे काही झाले नाही. श्रीलंकेमध्ये आर्थिक संकट कोसळले. लोक राष्ट्रपती भवनात घुसले. अराजक माजले. यावर राहुल गांधी म्हणाले की, “भारतही आर्थिकदृष्ट्या रसातळाला जाणार.” पण तसे घडले नाही. ...तर असे हे राहुल गांधी. ते म्हणत आहेत की, “देशाचे भविष्य भीतीच्या सावटाखाली आहे.” सूज्ञ वाचकांस सांगायला हवेच का? की, जसे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना, संजय राऊत यांना वाटायचे की, ते म्हणजे महाराष्ट्र आहेत.
 
 
तसेच राहुल गांधी यांना त्यांचे भविष्य म्हणजे, भारताचे भविष्य वाटते. सगळ्या जगाला माहिती आहे की, काँग्रेस पक्षाचे 12 वाजले असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षातच सत्तापिपासू झालेल्या काँग्रेसचे, खरे रूप देशातल्या जनतेला कळायला 60 वर्षे जावी लागली. आज लोकांचे डोळे उघडले आहेत. ‘राजा का बेटा ही राजा नहीं बनेगा। तो जो हकदार हैं वो राजा बनेगा’ हे सत्य भारतीय जनतेने स्वीकारले. नेमके याचमुळे राहुल गांधी आणि देशातल्या विविध राज्यांतल्या अमुक एक घरचा मुलगा किंवा नातू म्हणून जनतेवर लादल्या गेलेल्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
 
 
या भीतीमुळे राहुल गांधी उद्विग्नच झाले. त्यामुळेच ते म्हणतात की, देशाचे भवितव्य अंधारात आहे. भाजप आणि रा. स्व. संघ देशाचे विभाजन करत आहेत, असेसुद्धा ते म्हणत आहेत. ‘चोराच्या मनात चांदणे’ ही म्हण जुनीच. त्यामुळे राहुल गांधी यांना भाजप, रा. स्व. संघ देशाचे विभाजन करत आहेत, असे दिसत नाही ना! आता तर काय ते म्हणत आहेत, “मी ‘ईडी’ला घाबरत नाही, मला कितीही वेळा चौकशीला बोलवा.” यावर काय म्हणावे, ‘खाई त्याला खवखवे’? बाकी नवाब मलिक आणि संजय राऊत दोघेही कर्माचे भाऊ. भाऊही असेच म्हणायचे आणि आता राहुलही असेच म्हणतात. राहुल यांच्या ध्यानीमनी ‘ईडी’ का आहे? काय समजायचे? असो, पण ते ‘आर्थर रोड’ तुरुंगातून ‘आइए आप का इंतजार हैं’ असे कोण म्हणते आहे? आणि ते तिकडे ‘आर्थर रोड की तिहार’ अशी पैज कुणी लावली आहे? खरेच दांभिक नेत्यांचे भवितव्य अंधारात आहे.
 
9594969638
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.