हसीनांच्या स्तुतिसुमनांचा अन्वयार्थ

    04-Sep-2022
Total Views |
hasina
 
 
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. या मुलाखतीत त्यांनी भारत बांगलादेशचा सच्चा मित्र असल्याचे सांगितले. दरम्यान, शेख हसीना सोमवारी भारत दौर्‍यावर येणार असल्याने त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. याचाच आढावा घेणार हा लेख.. 
 
 
भारताला हसीना यांनी ‘टेस्टेट फ्रेंड’ म्हणजेच ‘पारखलेला मित्र’ अशी उपमा दिली. या मुलाखतीत त्यांनी भारताचे विशेष आभार मानले. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान भारताने बांगलादेशी विद्यार्थ्यांना मायदेशी सुरक्षित आणले. परंतु, त्याचबरोबर बांगलादेशसहित अन्य देशांच्या विद्यार्थ्यांनाही मायदेशी आणण्यात पुढाकार घेतला. बांगलादेशच्या विद्यार्थ्यांनी पोलंडमध्ये आश्रय घेतला तेव्हा भारताने त्यांना सुरक्षितरित्या बांगलादेशात पाठवले, त्यासाठी भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी आभार मानत असल्याचे त्या म्हणाल्या. लसीकरण मोहीम राबवताना भारताने शेजारी देशांनाही लसपुरवठा केल्याबद्दल त्यांनी भारताचे कौतुक केले. पुढे त्या म्हणाल्या की, “भारत आणि बांगलादेशमध्ये भले मतभेद असतील. परंतु, ते चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यावर आमचा भर असेल.”
 
 
बांगलादेशकडून भारतावर होणारा स्तुतिसुमनांचा वर्षाव ही काही आताची गोष्ट नाही. या वर्षी एप्रिल महिन्यात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बांगलादेशच्या दौर्‍यावर होते. तेव्हादेखील बांगलादेशने भारताला साहाय्य करण्याची भूमिका घेतली. चीनच्या नाकावर टिच्चून बांगलादेशने भारताला पूर्वोत्तर राज्यांसाठी जसे की, आसाम आणि त्रिपुरासाठी त्यांच्या चितगाव बंदराचा वापर करण्याचा प्रस्ताव दिला होता. दोन्ही देशांतील दळणवळण सुधारण्यासाठी आणि चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी हा प्रस्ताव दिल्याचे शेख हसीना यांनी त्यावेळी सांगितले होते.
 
  
तसेच, “बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व चितगाव बंदराच्या वापराने भारताच्या पूर्वोत्तर क्षेत्राला अधिक फायदा होईल,” असेही त्या म्हणाल्या. विशेष बाब म्हणजे, चीनला हसीना यांनी या बंदराचा वापर करण्यासाठी नकार देत तो प्रस्ताव भारताला दिला होता. याचदरम्यान जयशंकर यांनी त्यांना भारत दौर्‍यावर येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारून आता हसीना या भारताच्या दौर्‍यावर येत असल्याने या दौर्‍याला महत्व प्राप्त झाले आहे.
 
 
मुळात, बांगलादेशला चीनचे चटके बसल्यानेच आता तो भारताला साहाय्यभूत ठरेल, अशी भूमिका घेण्यात धन्यता मानत आहे. सध्याची परिस्थिती पाहता तेच बांगलादेशला फायदेशीर ठरणार आहे. कारण, चीनच्या वळचळणीला जाऊन कसे हाल होतात आणि देश कसा रसातळाला जातो, याची प्रचिती बांगलादेशला उदाहरणासहित आलेली आहे. चीनला पायघड्या घालणार्‍या श्रीलंकेचे हाल सध्या आपण पाहतच आहोत. गुण्यागोविंदाने नांदत असलेला श्रीलंका चीनच्या नादाला लागल्याने अक्षरशः बरबाद होण्याच्या वाटेवर आहे. कर्ज देऊन देऊन चीनने श्रीलंकेला आपल्या तालावर नाचवले आणि श्रीलंका खुशाल तसे करत राहिला. भारताला मारक ठरेल, अशीच भूमिका श्रीलंकेकडून घेतली जात होती.
 
 
परंतु, स्वतःचे वाटोळे करून घेतल्यावर श्रीलंकेला जाग आली खरी पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. श्रीलंकन जनतेने देशातील राष्ट्रपतीला तर पळून जाण्यास भाग पाडले, इतक्या भीषण परिस्थितीत श्रीलंका सापडला. महागाईने जनता होरपळलेली असताना त्यावेळी भारताने श्रीलंकेच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर आपले कुत्सित हित साध्य करण्यासाठी चीनने पाकिस्तानातही हजारो कोटींची गुंतवणूक केली. परंतु, आता तीच गुंतवणूक पाकिस्तानच्या मुळावर उठली आहे. कहर म्हणजे, चीनने आता थेट पाकिस्तानात चिनी सैन्यासाठी चौक्या उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे.
 
 
यामागे चिनी गुंतवणुकीचे संरक्षण करणे हा जरी हेतू असला, तरीही त्याला पाकिस्तानला विरोधही करता येणार नाही. कारण, चीनच्या कर्जाच्या बोज्याखाली पाकिस्तानचा जीव गुदमरत चालला आहे. सध्या पाकिस्तानात महापुराने हजारो लोकांचे बळी गेले आहेत, तर तीन कोटींहून अधिक लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे चीनच्या नादाला लागून श्रीलंका आणि पाकिस्तानची झालेली ही दशा पाहून आता बांगलादेशनेही चीनला दूर ठेवून भारताला साहाय्याची भूमिका घेतली आहे. हसीना यांची स्तुतिसुमने हा त्याचाच एक भाग म्हणावा लागेल.
 
- पवन बोरस्ते