जलनायक : हेमंत जगताप

    29-Sep-2022   
Total Views |

हेमंत जगताप
 
 
 
शासकीय सेवेचे जोखड पेलून जलव्यवस्थापनाने ग्रामीण अर्थकारणाला झळाळी देणारे ‘जलनायक’ हेमंत जगताप या निवृत्त अभियंत्याविषयी...
 
 
सरकारी अधिकार्‍यांविषयी अनेक मतमतांतरे असली, तरी शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अभियंता हेमंत सदाशिव जगताप हे मात्र अपवाद आहेत. हेमंत जगताप ठाणे पूर्वेकडील रहिवासी असून ते मूळचे धुळे जिल्ह्याचे. त्यांचे शालेय तसेच डिप्लोमापर्यंतचे शिक्षण धुळ्यात झाले. ‘स्कॉलर’ असलेले जगताप ‘डिप्लोमा’ परीक्षेत राज्यात ‘मेरिट’मध्ये आले. ‘व्हीजेटीआय’ या नामांकित संस्थेत अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ धुळ्यात बांधकाम व्यवसायात काम करीत असताना ते धुळे जिल्हा परिषदेत साहाय्यक अभियंता म्हणून रूजू झाले. पुढे वर्ग एक अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यानंतर ते धुळे सोडून ठाण्यात आले.
 
 
ठाणे जिल्हा परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असताना 2005 साली एका वृत्तपत्रातील पाण्याचे दुर्भीक्ष दर्शवणार्‍या फोटोने त्यांचे लक्ष वेधले. जगताप यांनी या फोटोकडे दुर्लक्ष केले नाही. पिण्याच्या पाण्यासाठीची वणवण बालपणी त्यांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळे त्यांचा जीव कासाविस झाला. वनवासींची पाण्यासाठीची ससेहोलपट थांबावी, पर्यायाने आरोग्य, शिक्षण, हंगामी स्थलांतर या मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी ठोस योजना अमलात आणण्यासाठी त्यांच्या मनात पाणी केंद्रस्थानी असलेल्या योजनेचे बीजारोपण झाले. त्यानुसार ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात बंधारे उभारून पाणीव्यवस्थापन कार्यक्रम अमलात आणण्याचे त्यांनी ठरवले.
 
 
जगताप ‘सिव्हील इंजिनिअर’ असल्याने प्रकल्पाचा तांत्रिक तपशीलासह आराखडा तयार करणे, नियोजनबद्ध कार्यक्रम आखणे आणि त्यानुसार अंमलबजावणी करणे, यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी सर्वप्रथम ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजनेसाठी तपशीलवार ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार केला. 2005 मध्ये वाडा तालुक्यात नेहरोली गावात पहिला दगडी बंधारा बँकेतून कर्ज काढून, तसेच पदरमोड आणि मित्रमंडळींकडून निधी जमवून श्रमदानातून बांधला. तेव्हा, अशा प्रकल्पांसाठी निधी उभारायची समस्या उभी ठाकली. त्यासाठी त्यांनी विविध कंपन्यांशी संपर्क साधत ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी’ (सीएसआर) अंतर्गत कंपन्यांकडून आणि ‘बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिज’ या संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या साहाय्याने हे शिवधनुष्यही पेलले. पुढे ‘रोटरी क्लब’ तसेच सहकारी, मित्र परिवार आणि दात्यांच्या मदतीने गेल्या 17 वर्षांत ठाणे व पालघर जिल्ह्यात तब्बल 488 बंधारे उभारले आहेत.
 
 
‘रोटरी’चे पाठबळ लाभल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून तसेच ‘रोटरी इंटरनॅशनल’शी संलग्न असलेल्या जपान, अमेरिका, कॅनडा येथील संस्थांकडूनदेखील बंधारे बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याचे ते सांगतात. या बंधार्‍यामुळे ग्रामीण भाग आता ‘सुजलाम् सुफलाम्’ झाला आहे.हजारो एकर जमीन दुबार पीक घेण्यायोग्य बनली असून पिण्याच्या पाण्याचा, तसेच गुराढोरांच्या चारापाण्याचाही प्रश्न सुटला आहे. याशिवाय भूगर्भातदेखील पाण्याची पातळी वाढली आहे. एरव्ही, भातपिके घेतल्यानंतर वीटभट्यांवर तसेच मुंबई-ठाण्यात धाव घेणार्‍यांना आता गावातच रोजगार मिळाला आहे. पाणी उपलब्ध झाल्यामुळे नानाविध कृषी उत्पादनांकडे वाढलेला कल शेतकर्‍यांना आर्थिक स्वयंपूर्ततेच्या दिशेने घेऊन जात असल्याचे जगताप अभिमानाने सांगतात.
 
 
ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी पाणी महत्त्वपूर्ण असल्याने सिमेंट-काँक्रीटचे बंधारे कमी खर्चात कसे बांधता येतील आणि त्याचा जास्तीत जास्त लोकसंख्येला लाभ कसा मिळवून देता येईल, या माध्यमातून केवळ पाणी उपलब्ध करण्याऐवजी, वनवासींचे स्थलांतर रोखणे, आरोग्य व शिक्षण याविषयी जागरूकता निर्माण करणे, असा सर्वांगीण विकासाचा व्यापक उद्देश यामागे असल्याचे ते सांगतात. जलसंवर्धनाच्या मोहिमेत केलेल्या कामामुळे त्यांना मानसन्मान, प्रतिष्ठा मिळाली. अशा जलनायकांचे आभार लाभार्थी मानत असतातच, तथापि समाजदेखील दखल घेत असतो. पुण्यातील ‘कृतज्ञता ट्रस्ट’तर्फे त्यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ व 25 हजारांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. ’सुशील माधव न्यास’ या संस्थेतर्फे त्यांच्या ग्रामीण भागातील कार्याबद्दल ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या हस्ते ’भक्ती सेवा’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विविध माध्यमे, संस्थांनीही त्यांचा यथोचित गौरव केला.
 
 
हेमंत जगताप आठवड्यातील शनिवार, रविवार या कामासाठी राखीव ठेवतात. पत्नी प्रा. योजना जगताप यांचीही साथ त्यांना लाभते. निधीचे नियोजन, साईट्स निश्चित करणे, प्रकल्पाला भेटी देणे, स्वयंसेवी संस्थांशी संपर्क करणे या स्वरूपाची जबाबदारी त्या पार पाडतात. गेल्या काही वर्षांत चांगली टीम तयार झाली आहे. शिवाय कार्यकर्त्यांची फळीदेखील मजबूत आहे. त्यामुळे ठाणे-पालघर बाहेर अशी जलमोहीम राबवण्याचा त्यांचा मानस आहे. अशा या ग्रामीण महाराष्ट्र तृषार्त करावयास निघालेल्या जलनायकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.