शताब्दीच्या उंबरठ्यावरील ‘नमस्कार’चा प्रवास...

    28-Sep-2022   
Total Views |

नमस्कार मंडळ
 
 
सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. सूर्यनमस्कारात वापरल्या जाणार्‍या बर्‍याचशा आसनांचा ऐतिहासिक ग्रंथांत उल्लेख आढळतो. देशी व्यायामांचा प्रकार स्थानिक पातळीवर रूजावा आणि भावी पिढी सुदृढ व्हावी, याकरिता ‘नमस्कार मंडळ’ काम करीत आहे. शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या संस्थेच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया....
 
 
नमस्कार मंडळा’ची स्थापना 1924 साली विजयादशमीच्या दिवशी झाली. कल्याणच्या लालचौकी या परिसरात संस्थेची स्थापना करण्यात आली. दिवंगत मोरेश्वर भावे, गंगाधर घारपुरे, भगवान चोळकर, चिंतामण भिडे, रामचंद्र भिडे या पाच शिक्षकांनी या मंडळांची स्थापना केली. मुळात सूर्यनमस्काराच्या प्रचारासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली. बलवान नागरिकांची पिढी राष्ट्रसेवेसाठी तयार करणे व भारतीय व्यायामप्रकारांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्यासाठी व्यायामशाळेची स्थापना करण्यात आली. भारतीय क्रीडाप्रकाराला लोकप्रिय करणे हादेखील त्यामागे हेतू होता.
 
 
देशी व्यायामाचा प्रकार रुजविण्याचे काम नमस्कार मंडळ करीत आहे. संस्थेच्या सध्या सर्व आधुनिक व अद्ययावत साधनांनी युक्त अशा दोन व्यायामशाळा कार्यरत आहेत. ‘ट्रेडमार्क’ ही उपलब्ध आहे. एका केंद्रापासून सुरू झालेल्या संस्थेचा हा प्रवास आता 44 केंद्रापर्यंत येऊन पोहोचला आहे. संस्थेमार्फत दरवर्षी साधारणत: 50पेक्षा जास्त मुले सूर्यनमस्काराचे धडे गिरवत असतात. 1924पासून ते 1954पर्यंत सूर्यनमस्काराचे धडे मोफत दिले गेले. सूर्यनमस्काराचे धडे मोफत मिळावे, या उद्देशाने हे कार्य सुरू झाले होते.
 
 
त्यानंतर माफक शुल्क आकारले जात असले, तरी ते केवळ नाममात्र होते. सूर्यनमस्काराविषयी बोलताना प्रकाश गद्रे म्हणाले, “सूर्यनमस्कार हा असा व्यायाम प्रकार आहे की, त्यात दहा योग प्रकार समाविष्ट आहे. दहा योग प्रकार करण्यापेक्षा त्यातील काही योग प्रकार केल्यासही पुरेसे आहे. त्यामुळे शाळकरी वयापासून मुलांमध्ये संस्कार रुजविण्याचे काम ‘नमस्कार’ मंडळाकडून निरपेक्ष वृत्तीने सुरू आहे,” असे सांगितले. तसेच, “सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो.
 
 
सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार ही सूर्य उपासनाच आहे. सूर्यनमस्कारामुळे सर्वागसुंदर व्यायाम तर होताच, पण सोबतच आत्मिक, मानसिक व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायाम बहुगुणी आहे. हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैवपंथीय समाजात शंकराचे, तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग समजले जाते. वेदांमध्ये आणि पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे, हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे, असे मानले जाते,” असेही ते म्हणाले.
 
 
‘नमस्कार’ मंडळांच्या कार्यकारिणीत दहा सदस्य आहेत. अध्यक्ष डॉ. दीपक तेलवणे आणि सदस्य मंडळांकडून मंडळाचे कामकाज पाहिले जाते. कल्याणमधील ‘छत्रपती शिवाजी शिक्षणसंस्थे’च्या सर्व शाळांतील शालेय विद्यार्थी ‘नमस्कार’ मंडळाशी जोडले गेले आहेत. “मंडळाने सूर्यनमस्काराचे एक केंद्र सुरू केले होते. त्याचा आता वटवृक्ष बहरत चालला आहे. ठाणे, रायगड आणि अन्य ठिकाणी मिळून सूर्यनमस्कार मंडळांची आता 44 केंद्रे सुरू झालेली आहेत,” असे ही गद्रे यांनी सांगितले.
‘नमस्कार मंडळा’कडून श्रावणात लक्ष सूर्यनमस्कार अनुष्ठानाचा कार्यक्रम घेतला जातो. हा कार्यक्रम एक महिनाभर चालविला जातो.
 
 
सूर्यनमस्कार घालण्याची सवय मुलांना लागावी, हा या अनुष्ठान कार्यक्रमामागचा उद्देश आहे. यंदाच्या श्रावणात मुलांनी 27 लाख, 90 हजार सूर्यनमस्कार घातले आहेत. मंडळांकडून दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये जोर बैठका, गोळाफेक, सूर्यनमस्कार, सांघिक सूर्यनमस्कार, धावणे इत्यादी स्पर्धांचा समावेश असतो. याशिवाय 100 आवृत्ती सूर्यनमस्कार एकाच वेळी घालण्याची स्पर्धा घेतली जाते. शरीरसौष्ठव, ‘वेटलिफ्टिंग’ व ‘पॉवरलिफ्टिंग’ स्पर्धा आयोजित केली जाते. तसेच मल्लखांब व दोरीचा मल्लखांब या स्पर्धेचे प्रशिक्षण संस्थेतर्फे दिला जातो. मंडळांच्या व्यायामपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्पर्धा जिंकून मंडळाचे नाव उज्ज्वल केले आहे.
 
 
त्यामध्ये अशोक दीक्षित, संदीप कुलकर्णी, गोस्वामी कारभारी, पल्लवी गुढे, दीपाली कुलकर्णी या व्यायामपटूंचा समावेश आहे. ‘नमस्कार’ मंडळाला अनेक व्यायामपटूंनी पारितोषिके जिंकून देऊन नावारूपाला आणले आहे. मात्र, त्या सर्वांची नावे देणे जागेअभावी शक्य नाही. दोरीचा मल्लखांब यामध्येही मंडळांच्या क्रीडापटूंनी अनेक पारितोषिके मिळविली आहे. तसेच त्यांच्या प्रात्याक्षिकांसाठी मल्लखांबपटूंचे परदेश दौरेही करण्यात आले आहेत. जागतिक सूर्यनमस्कार दिन दरवर्षी संस्थेतर्फे साजरा केला जातो. त्यामध्ये विविध शाळांतील विद्यार्थ्यांना घेऊन सामूहिक सूर्यनमस्कार घालण्याचा भव्य कार्यक्रम केला जातो.
 
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मंडळाच्या ‘इंदिराबाई फणसे सभागृहा’त दि. 1 फेबुवारी ते दि. 7 फेब्रुवारी या कालावधीत 75 आवृत्या सूर्यनमस्कार घालण्यात आले. दि. 7 फेब्रुवारीला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा जाहीर झाल्याने त्या दिवशी होणारा सामूहिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम दि. 8 फेब्रुवारीला घेण्यात आला होता.
‘नमस्कार मंडळ’ आता शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे. मंडळाचा मानबिंदू ठरलेला ‘लक्ष सूर्यनमस्कार अनुष्ठान’ या उपक्रमाची सुरुवात होऊनही आता 90 वर्षे झालेली आहेत. हा उपक्रम 1931 साली श्रावणमासात सुरू झालेला आहे.
 
 
 
मंडळाच्या कार्यालयात जाऊन दरवर्षी श्रावणमासात सूर्यनमस्कार घातले जातात. मंडळाचा विस्तारही आता वाढला आहे. त्यामुळे मंडळाच्या 44 केंद्रांत पाच हजारांपेक्षा जास्त आबालवृद्ध, महिला या 30 लाखापर्यंत दरवर्षी सूर्यनमस्कार घालतात. मंडळाने 2016 मध्ये स्वत:ची वास्तू उभारली. तसेच मैदानही मंडळास उपलब्ध झालेले आहे. कोरोना महामारीच्या काळात सरकारी निर्बंधामुळे ’नमस्कार मंडळा’चे कल्याण येथील एकच केंद्र चालवण्यास परवानगी मिळाली होती. परंतु, संस्थेचे नेहमीचे दुसरे केंद्र वैद्य जीम यांनी संपर्क साधून नमस्कार अनुष्ठानात सहभागी होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोरोना काळात या दोन केंद्रांवर सूर्यनमस्कार अनुष्ठान सुरू होते.
 
 
या उपक्रमाच्या समारोपाचा कार्यक्रम अतुल भावे यांच्या उपस्थितीत मंडळाच्या ‘इंदिराबाई फणसे सभागृहा’त झाला. यावेळी त्यांनी सूर्यनमस्कारांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अत्यंत चांगल्या रीतीने समजावून सांगितले. तसेच हे अनुष्ठान नियमित पार पडत असल्याने त्याबाबत कौतुकही केले. याशिवाय हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहावा, अशा त्यांनी शुभेच्छाही दिल्या. अतुल भावे यांच्या हस्ते नमस्कारपटू राजन बहुतुले व प्रसाद माईणकर, तसेच वैद्य जीममधील नुसार शेख, कुमार पटवर्धन यांना बक्षिसे देण्यात आली. ‘नमस्कार’ मंडळांचे कामकाज सध्या अध्यक्ष डॉ. दीपक तेलवणे, चिटणीस निलेश ढवळे, प्रकाश गद्रे हे पाहत आहे. नागरिक आणि रा. स्व. संघाच्या सहयोगाने मंडळाचा प्रवास उत्तरोतर सुरू आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.