नाला बांधला पण नाल्याची सफाई पालिका कधी करणार?

पालिकेवर नागरिकांची नाराजी

    27-Sep-2022
Total Views |

jogeshwari
 
मुंबई : जोगेश्वरी पूर्व येथील प्रभाग क्रमांक ७९ म्हणजेच पंप हाऊस विभागातील नागरिकांना नाल्यातील दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांसह इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालिकेकडून वर्षातून फक्त एकदाच नाला साफ केला जात असल्यामुळे येथील डेंगू, मलेरिया अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे, अशी व्यथा येथील स्थानिकांनी "दै. मुंबई तरुण भारत"सोबत संवाद साधताना मांडली. "स्थानिक प्रशासनाकडे जेव्हा आम्ही लिखित अर्ज नेऊन देतो त्यानंतर फक्त पावसाळ्यापूर्वीन हा नाला साफ करण्यात येतो. त्यानंतर वर्षभर हा नाला साफ करण्यात येत नसल्यामुळे परिसरातील मच्छर व माशांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे येथे मलेरिया, डेंगू, टायफाईड असे अनेक आजार आम्हाला होतात," अशी व्यथा येथील स्थानिकांनी मांडली आहे. त्याचबरोबर नाल्याची दुरुस्ती हि बरोबर केली नसल्याचंही येथील स्थानिकांचं म्हणणं आहे.
 
"पावसाळा केवळ काही दिवस शिल्लक आहेत. मात्र अद्यापही हा नाला साफ करण्यास पालिका कोणतीही तसदी घेत नाही आहे. तसेच परिसरात औषध फवारणी करण्यात यावी. जेणेकरून येथील डासांचे व माशांचे प्रमाण कमी होईल, अशीही मागणी आम्ही अनेकदा स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. मात्र स्थानिक प्रशासन यासंबंधी कोणतीही पावले उचलत नाहीत. तसेच लोकप्रतिनिधींकडूनही यासंबंधी कोणतीही पावले उचलण्यात येत नाहीत," असेही येथील स्थानिकांनी सांगितले आहे. तसेच हा नाला लवकरात लवकर साफ करण्यात यावा व वर्षातून किमान तीन ते चार वेळा तरी हा नाला पालिकेकडून साफ करण्यात यावा अशी मागणीही येथील स्थानिकांनी केली आहे.
नाला सफाईचे काम सातत्याने सुरु
 
नाला सफाईच काम हे सुरु आहे. पंप हाऊस विभागातील नाला हा नव्याने बांधण्यात आला आहे. तसेच तो सातत्याने साफही करण्यात येतो. त्याचबरोबर महिन्यातून दोनदा प्रभागात औषध फवारणीदेखील करण्यात येते.
- सदानंद परब, माजी नगरसेवक शिवसेना
 
 
- शेफाली ढवण