मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरण समितीची बैठक या ३० सप्टेंबरला होणार आहे. जगातील सर्वच प्रमुख देशांच्या केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढीचे धोरण स्वीकारल्यामुळे भारतात आता होणाऱ्या या पतधोरण समितीच्या बैठकीत नक्की काय निर्णय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भारतीय बाजारातही महागाईचा आकडा कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत व्याजदर वाढीचेच धोरण स्वीकारले होते पण आता सलग चौथ्यांदा व्याजदर वाढ होणार का? यावर सर्वच आर्थिक जगताची पुढची धोरणे अवलंबून असणार आहेत.
गेल्याच आठवड्यात अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढ केली आणि जगातील इतर प्रमुख देशांच्या केंद्रीय बँकांनी तिचेच अनुकरण करण्यास सुरुवात केली. यामध्ये ग्रेट ब्रिटन, यूएई, सौदी अरेबिया, नॉर्वे, तैवान या सर्वच देशांच्या केंद्रीय बँकांचा यात समावेश होतो. भारतातही किरकोळ आणि घाऊक बाजारात वाढलेली महागाई हळू हळू आटोक्यात येत असली तरी अजून त्याचा धोका कायम आहे. भारतीय भांडवली बाजारातही सर्व जागतिक घडामोडींचे पडसाद उमटले आहेत, यामुळे सर्वच अर्थतज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे. तरी भारतीय बाजारासाठी काही दिलासादायक गोष्टी नक्कीच आहेत.
भारतासाठी सर्वात तापदायक गोष्ट म्हणजे खनिज तेलाची आयात. खनिज तेलांच्या किंमती हा कायमच चिंतेचा विषय असतो. यावर उपाय म्हणून रशिया कडून होणाऱ्या खनिज तेलाच्या आयातीचे व्यवहार हे रुपयांमध्ये करण्यास मिळालेली मंजुरी, अनिवासी भारतीयांकडून वाढती गुंतवणूक या सर्वच दिलासादायक गोष्टी आहेत. या सर्वांचे पडसाद रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीत पडतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे होणारी ही पतधोरण बैठक अत्यंत महत्वाची ठरणार आहे.