सरदार सरोवर प्रकल्पास विरोध करणारे ‘शहरी नक्षलवादी’ आजही सक्रिय!
जागतिक संघटना व फाऊंडेशन्सच्या हाती शहरी नक्षल्यांच्या नाड्या
24-Sep-2022
Total Views |
नवी दिल्ली: “सरदार सरोवर प्रकल्पाची पायाभरणी देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी केली. मात्र, तो प्रकल्प माझ्या कार्यकाळात पूर्ण झाला. या प्रकल्पात अडथळा आणून भारताचा विकास रोखण्यासाठी शहरी नक्षलवादी दीर्घकाळ सक्रिय होते. हे विकासविरोधी घटक आजही सक्रिय असून त्यांचा बिमोड करणे गरजेचे आहे,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला.
सरदार सरोवर प्रकल्प अर्थात एकता नगर येथे आयोजित पर्यावरणमंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते. “सरदार सरोवर प्रकल्पाची पायाभरणी स्वातंत्र्यानंतर लगेचच झाली होती. त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठा वाटा होता आणि पं. नेहरू यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, हा प्रकल्प माझ्या कार्यकाळात पूर्ण झाला. प्रकल्पास एवढा मोठा विलंब होण्याचे कारण म्हणजे शहरी नक्षलवाद्यांनी हा प्रकल्प पर्यावरणविरोधी असल्याची आवई उठविणे,” असे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
सरदार सरोवर प्रकल्पास विकासविरोधी शहरी नक्षलवाद्यांनी रोखून धरल्याने राष्ट्राची संपत्ती विनाकारण खर्च झाल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “या शहरी नक्षलवाद्यांना अनेक राजकीय पक्ष पाठिंबा देतात. भारताचा विकास होऊ नये, यासाठी अनेक जागतिक संस्था-संघटना आणि फाऊंडेशन सक्रिय आहेत. त्यांच्याकडून असा एखादा मुद्दा उपस्थित केला जातो आणि त्यानंतर भारतातील शहरी नक्षलवादी तो मुद्दा डोक्यावर घेऊन गावगन्ना हिंडतात. देशाची न्यायव्यवस्था आणि जागतिक बँकेसही प्रभावित करण्याची क्षमता या शहरी नक्षलवाद्यांमध्ये आहे. हे शहरी नक्षली आजही सक्रिय असून कारस्थाने करण्यात व्यस्त आहेत. त्यांचा खोटेपणा पकडला गेला, तरीदेखील ते मान्य करण्यास तयार नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे नाव घेऊन देशाचा विकास, ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’, ‘इज ऑफ लिव्हिंग’ रोखण्याचा प्रयत्न करणार्यांचे षड्यंत्र रोखण्याची गरज आहे,” असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
मेधा पाटकर आणि सरदार सरोवर प्रकल्पाचा विरोध
सरदार सरोवर प्रकल्पास विरोध करणार्यांमध्ये कथित सामाजिक कार्यकर्ती मेधा पाटकर हे प्रमुख नाव. ‘नर्मदा बचाव’ आंदोलनाच्या नावे सरदार सरोवर प्रकल्पास विरोध करणे, सरदार सरोवर प्रकल्पाचा लाभ होणार नसल्याचा दावा करणे आणि त्याविरोधात देशभरात आंदोलन करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न पाटकर यांनी दीर्घकाळपासून चालविला होता. मात्र, सरदार सरोवर प्रकल्पामुळे गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अवर्षणग्रस्त भागात पोहोचल्याने पाटकर यांचे आंदोलन खोटेपणावर आधारित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन, कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन, वरवरा रावसारख्या अराजकतावाद्यांचे समर्थन करण्यामध्येही मेधा पाटकर आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.