कट्टरपंथी धर्मांधांचे लांगूलचालन

    24-Sep-2022   
Total Views |
इब्राहिम रईसी 
 
 
 
 
सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या आंतरराष्ट्रीय निवेदिका क्रिस्टीयन एमनपोर या इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची मुलाखत घेणार होत्या. तीही इराणमध्ये नव्हे, तर अमेरिकेमध्ये. राष्ट्राध्यक्षांची मुलाखत घेण्यासाठी जे सोपस्कार केले जातात. ते सर्व ‘सीएनएन’ने पूर्ण केले होतेच. मुलाखतीच्या दिवशी क्रिस्टीयन या नियोजित वेळी मुलाखतीच्या ठिकाणीही पोहोचल्या. ते ठिकाण अमेरिकेतच होते. पण, ठरलेल्या वेळेनंतर ४५ मिनिटं उलटले तरीसुद्धा इब्राहिम मुलाखतीच्या ठिकाणी आलेच नाहीत. इतकेच नव्हे, तर त्यांनी क्रिस्टीयन यांना मुलाखत देण्यासच नकार दिला.




त्यांनी मुलाखत न देण्याचे कारण सांगितले की, मुलाखत घेण्यासाठी क्रिस्टीयन आल्या खर्या. मात्र, क्रिस्टीयन यांनी ‘हिजाब’ घातला नव्हता. थोडक्यात, इराणी संस्कृतीमध्ये महिलांनी डोके झाकणे आवश्यक आहे. तसे क्रिस्टीयन यांनी केले नाही. त्यामुळे त्यांना मुलाखत नाकारण्यात आली, तर क्रिस्टीयन यांनी इब्राहिम यांच्या वक्तव्याचा जोरदार विरोध केला. त्यांचे म्हणणे की, मुलाखत अमेरिकेत होती, इराणमध्ये नव्हती. त्यामुळे इराणी राष्ट्रपतींचे किंवा इराणचे नियम पाळण्यास त्या बांधिल नाहीत.
 
 
 
काहीही असो, अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांच्या महत्त्वाच्या महिला अधिकार्याकंडून इराणचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत नियम पाळण्याची अपेक्षा ठेवतात, तर मग प्रत्यक्ष इराणमध्ये इराणी महिलांकडून ते किती नियमांची अपेक्षा करत असतील? इराणमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाच नव्हे, तर महिलांच्या मानवी हक्कांची गळचेपी होते, हे अनेक सर्वेक्षणांतमांडले गेले आहे. इराणच का, मध्य पूर्वेतीलअनेक मुस्लीम देशांमध्ये महिलांसाठी कायद्याच्या माध्यमातून अतिशय असंवेदनशील नियमावली बनवली गेली. इराणच्या अमिनीचा मृत्यू तर याचे भयंकर उदाहरणच.
 
 
 
 
‘हिजाब’ नीट घातला नाही म्हणून तिला इराणच्या धर्माचार देखरेख करणार्या पोलिसांनी अटक केली. काही दिवसांतच ती मृत पावली. कैदेत असताना तिला त्या पोलिसांनी भयंकर मारहाण केली. ‘हिजाब’ किंवा हेडस्कार्फ न घालता ती सार्वजनिक ठिकाणी वावरली. इराणच्या कायद्यानुसार, तिने मोठा देशद्रोह केला.
 
 
 
 
त्या देशद्रोहाची किंमत म्हणून केवळ २२ वर्षांच्या अमिनीला जीव गमवावा लागला. अर्थात, या विरोधात इराणच्या महिला आणि पुरूषही रस्त्यावर उतरले. जनआंदोलनं झाली. त्यात काही लोकांचा जीवही गेला. या सगळ्या पाश्वर्र्भूमीनंतर इराणच्या राष्ट्रपती इब्राहिम यांनी प्रसारमाध्यमांतील महिलेनेही जी इराणची नाही, तर अमेरिकेची नागरिक आहे. तिने हेडस्कार्फ घालावा, असे आग्रह करणे म्हणजे अतीच झाले. याचाच अर्थ हेडस्कार्फ परिधान केला नाही म्हणून मृत्यू झालेल्या अमिनीबद्दल इराणच्या राष्ट्राध्यक्षांना शून्य संवेदना असाव्यात, हेच या घटनेतून दिसून येते.
 
 
 
 
अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि प्रत्येक देशाच्या कायद्यांचे स्वातंत्र्य मान्य करणार्या जगभरातली प्रत्येक व्यक्तीने इब्राहिम यांच्या या वागण्याचा निषेध केला. कारण, जागतिक स्तरावर प्रत्येक देशाच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या वागण्याचे काही संकेत असतात. त्यात परस्पर संस्कृतीचा आणि त्या त्या देशातील कायद्यांचा आदर करण्याचाही संकेत आहे. हा संकेत इराणच्या राष्ट्रध्यक्षांनी धुडकावला आहे.
 
 
 
 
अमेरिकेची नागरिक असलेल्या महिलेने अमेरिकेतही इराणचा कायदा पाळायलाच हवा, हा एकप्रकारचा ‘सांस्कृतिक दहशतवाद’ इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या वर्तनातून प्रकट झाला, असेही काही जणांचे म्हणणे आहे, तर काहीजणांचे म्हणणे आहे की, इराणला जागतिक पातळीवर अनेक गैरइस्लामिक देश सहकार्य करत असतात. त्यात पाश्चात्य देशही आहेतच. इतकेच नव्हे, तर भारतही सहकार्य करत असतो.
 
 
 
 
हे सहकार्य पुष्कळदा आर्थिक स्वरूपातले असते, विकासात्मक दृष्टीचे असते. गैरमुस्लीम राष्ट्रांकडून किंवा गैर मुस्लीम व्यक्तींकडून आर्थिक स्वरूपाची मदत घेताना इराणचे राष्ट्राध्यक्ष त्या गैर मुस्लीम राष्ट्रावर किंवा व्यक्तींवर बंधने लादतील का? या राष्ट्रांनी किंवा व्यक्तींंनी इराणमधील कायदेे-नियम पाळावेत, असा आग्रह ते धरतील का? अर्थातच नाही. मग मुलाखत घेणार्या महिलेने हेडस्कार्फ घातला नाही म्हणून मुलाखत नाकारणार्या इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी काय साधले? तर आपण किती कट्टरपंथीय आहोत, हे दाखवण्याचा अट्टाहास करत इब्राहिम यांनी जगभरातल्या धर्मांध कट्टरपंथीयांचे लांगूलचालन केले आहे, हेच खरे!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.