आरेतील रॉयल पाल्म्स जमीन खरेदीची चौकशी होणार

    23-Sep-2022
Total Views |
Royal Palms
 
 
मुंबई: आरे दुग्ध वसाहतीमधल्या रॉयल पाल्म्स या उच्चभृ गृहनिर्माण संस्थेला दिलेल्या जागेची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वन संरक्षकांना याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आरेतील रॉयल पाल्म्स इस्टेट ही देखील झाडे तोडून बांधण्यात आली होती, तेव्हा पर्यावरण प्रेमी कुठे होते, असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विचारला होता. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी पर्यावरणप्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहले होते. या पत्राची दाखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आरे मेट्रो-३ कारशेड विरुद्ध सुरू असलेल्या 'सेव्ह आरे' मोहिम चालवणाऱ्या आरे कन्झर्वेशन ग्रुपचे ऑफिस रॉयल पाल्म्स मध्ये असल्याचा आरोप करण्यात आला होता. आलिशान निवासस्थाने, हॉटेल्स आणि गोल्फ कोर्स असलेले संपूर्ण रॉयल पाम्स, आरेमध्ये सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. मात्र, तथाकथी पर्यावरण प्रेमींच्यामते सुमारे 100 हेक्टरच्या खाजगी लक्झरी रिअल इस्टेट प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होत नाही, परंतु 30 हेक्टरवरील राष्ट्रीय महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होते. मार्च १९९५ ते ऑक्टोबर १९९९ या काळात 'शिवसेने'चे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने ही जमीन खासगी रिअल इस्टेट डेव्हलपरला हस्तांतरित केली होती.