PFI छापेमारी: १२ जिल्ह्यांतून २० जण ताब्यात

    23-Sep-2022
Total Views |
 pfi in maharashtra
 
 
मुंबई ः महाराष्ट्रात ‘पीएफआय’शी संबंधित 12 जिल्ह्यांमध्ये छापे मारण्यात आले. महाराष्ट्रात पुणे, नवी मुंबई, भिवंडी, कोल्हापूर, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत ‘एनआयए’ने 20 जणांना ताब्यात घेतले. संभाजीनगरमधून पाच, नांदेडमधून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ‘एनआयए’ने मध्यरात्री 3 वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर-23मधील ‘पीएफआय’च्या कार्यालयावर छापा मारला. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाला गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यात असे आढळून आले होते की, ’पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे काही कार्यकर्ते दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत.
 
 
सदर गोपनीय माहिती पडताळून पाहण्यात आली. हे पाहिल्यानंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादविरोधी पथकाने जळगाव, नांदेड त्याचप्रमाणे पुणे, ठाणे इतरत्र ठिकाणी कारवाया केल्या आहेत. आतापर्यंत 20 जणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे. या ताब्यात घेण्यात आलेल्यांविरोधात भादंविच्या ’कलम 120 बी’, ’121 ए’, ‘153 ए’, ‘109’, ’30 वन बी’ ’युएपीए अ‍ॅक्ट’नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती अधिकार्‍यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
 
नांदेडमध्ये ‘बीजेपी मुर्दाबाद’ आणि ‘एनआयए गो बॅक’च्या घोषणा
 
नांदेडमध्ये दशतवादविरोधी पथकाने बुधवारी रात्री मिराज अन्सारी नामक ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्याला देगलूर नाका परिसरातून ताब्यात घेतलेे. दरम्यान, मिराज अन्सारीसह परभणी येथून आणलेल्या चार जणांना सायंकाळी नांदेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी या पाच जणांना 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
 
न्यायालयाचा आदेश आल्यानंतर न्यायालयाबाहेर काही जणांनी ‘एनआयए गो बॅक’ आणि ’बीजेपी मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी केली. मोहम्मद मेहराजोद्दीन अब्दुल हई अन्सारी, (42) रा. हैदरबाग नांदेड, अब्दुल सलाम अब्दुल कयुम (34) रा. परभणी, मोहम्मद निसार मोहम्मद अब्दुल रशीद (41) रा. परभणी, मोहम्मद जावेद मोहम्मद शब्बीर अन्सारी (35) रा. परभणी, मोहम्मद अब्दुल करीम अब्दुल हलीम (37) रा. परभणी या पाच जणांना न्यायालयात एटीएस पथकाचे पोलीस उपअधीक्षक पानेकर, पोलीस निरीक्षक सुनील नाईक व त्यांच्या सहकार्‍यांनी हजर केले.