आपण सर्वचजण सौरऊर्जा या क्षेत्राशी परिचित आहोत. आपल्यापैकी बर्याच जणांना या क्षेत्राची नुसतीच माहिती नाही, तर या ऊर्जेचा वापरही आपण दैनंदिन जीवनात करत असतो. सध्याच्या प्रदूषणकारी ऊर्जास्रोतांना पर्याय म्हणून सौरऊर्जेकडे एक सक्षम पर्याय म्हणून पाहिले जाते. पण, या ऊर्जास्रोतांचा विचार करताना, त्यांच्या विद्युत उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या मुद्द्याकडे मात्र बरेचदा दुर्लक्ष झालेले दिसते. तसेच याबद्दलची फारशी माहितीसुद्धा वापरकर्त्यांना नसते. पण, या क्षेत्रात उद्योग सुरू केला पाहिजे आणि या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण ‘सर्व्हिसेस’ निर्माण केल्या पाहिजेत, हाच विचार केला ‘सस्टेनिफाय एनर्जी’च्या माध्यमातून विक्रांत बनकर यांनी. त्यांच्या या व्यवसायाचा आणि उद्योजकीय वाटचालीचा घेतलेला हा सविस्तर आढावा...
ऊर्जासाक्षरता’ हा भारतीयांच्या बाबतीतला एक खूप गंभीर विषय. बरेचदा लोकांना माहीतच नसते की, आपल्याकडे जे ‘सोलर युनिट’ आहे, ते खरेच व्यवस्थित काम करते की नाही? आणि करत असेल तर कसे? त्याकडे कशा पद्धतीने बघितले पाहिजे? या सर्वच गोष्टींबद्दल आपल्याकडे साक्षरता कमीच आहे. यांसारख्या महत्त्वाच्या बाबीकडे त्यामुळे बरेचदा दुर्लक्ष होताना दिसते. त्यातून अशी उपकरणे वापरणार्यांचेच नुकसान होते आणि त्यांनी केलेली गुंतवणूकसुद्धा वाया जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे याच विषयावर काम करायचे आणि हाच आपला व्यवसाय असला पाहिजे, असा काहीतरी वेगळाच, कोणाच्याच ध्यानीमनी नसलेला व्यवसायाचा मार्ग विक्रांत यांनी पत्करला.
आपल्याकडे पदवी संपादित केल्यानंतर आयुष्यात पुढे नेमके काय करायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यातून बर्याच जणांना त्यांच्या योग्यतेचे उत्तर मिळत नाही. पण, विक्रांत यांच्या बाबतीत असे घडले नाही. सुदैवाने त्यांना त्यांच्या मार्गदर्शकांकडून, शिक्षकांकडूनच या क्षेत्रात व्यवसाय सुरु करावा, यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यांनी सांगितलेली गोष्ट त्यांनी कायम लक्षात ठेवली. “धडपडत पुढेच जात राहा. तुला तुझा मार्ग नक्की सापडेल,” असा उपदेश त्यांनी केला होता, तो विक्रांत यांनी निश्चितच अनुसरला. सुरुवातीला तेही इतरांसारखेच ’सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन’चे काम करायचे. सुरुवातीची काही वर्षे काम केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, आपण हे जे काम करतोय, त्याला पुष्कळ मर्यादा आहेत. आधीच या क्षेत्रात काम करणारे अनेक उद्योग सध्या बाजारात आहेत, जे हेच काम करत आहेत. फरक असेल, तर तो जास्तीत जास्त किमतीचा. फार काही वेगळेपण यात नाही किंवा कुणी आणूही शकणार नाही. त्यामुळे या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याचा विचार विक्रांत यांच्या मनात आला.
हेच काम करत असताना विक्रांत यांच्या हेही लक्षात आले होते की, बर्याचदा ज्या ’सर्व्हिसेस’ आपल्याकडून या ‘सोलर इन्स्टॉलेशन’च्या वेळेस दिल्या जातात, त्यांची खरेच ग्राहकांना फार गरज असते का? मात्र, याचा विचार कोणी करताना दिसत नाही. याच गोष्टीचा विचार करून विक्रांत यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्यांना कामाच्या संधीही मिळाल्या. त्यांना मोठ्या-मोठ्या कंपन्यांकडून याच ‘इन्स्पेक्शन’साठी बोलावले जाऊ लागले. जेव्हा त्यांनी हे काम केले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, याच कामात जास्त वाव आहे आणि हेच काम खूप मोठे आहे. तेव्हा याच कामात आपण लक्ष घातले पाहिजे आणि यातूनच सुरुवात झाली, ती ’सस्टेनिफाय एनर्जी’ची.
या संपूर्ण उद्योगात असेच आढळून आले आहे की, जेव्हा एखादा ग्राहक त्याच्याकडे ’सोलर पॅनेल्स’ बसवतो, त्याबद्दल त्या ग्राहकाला काहीच माहिती नसते. त्यांना हे पण माहिती नसते की, आपण जे बसवले आहे ते योग्य आहे की नाही किंवा ते योग्य काम करत आहे का? हे कशा पद्धतीने तपासता येईल? याची काहीच माहिती त्यांना नसते. त्यामुळे बरेचदा ग्राहकाचे नुकसानच होण्याची शक्यता असते. असेच काही अनुभव विक्रांत यांना आले.
पुण्यातील भोसरी येथील एका उद्योजकांचा फोन विक्रांत यांना आला. त्यांचे म्हणणे असे होते की, मी ’सोलर पॅनेल्स’ तर बसवले आहेत, पण ते व्यवस्थित काम करत आहेत की नाहीत, ते मला माहीतच नाहीत. त्यामुळे मला त्याचा फायदा होतोय की तोटा, तेच मला कळत नाही. त्यासाठी तू मला मदत कर. विक्रांत यांनी त्यांची साईट संपूर्णपणे ’इन्स्पेक्शन’ केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, त्यांच्याकडे बर्याच गोष्टी या ’मिसिंग’ आहेत, ज्या त्यांच्याकडे ‘इन्स्टॉल’ करताना त्यांना कबूल केल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना फायद्यापेक्षा तोटाच होत होता. हे विक्रांत यांच्या लक्षात आले. त्यापद्धतीचे काम तिकडे केल्यावर त्यांना आता बराच फायदा होतो आहे. जवळपास दीड लाखांपर्यंतच्या गोष्टी त्यांना जास्तीच्या मिळाल्या, ज्या त्यांना कबूल करूनसुद्धा ‘डीलर’कडून दिल्या गेल्या नव्हत्या. दुसरी अशीच एक केस विक्रांत यांच्याकडे आली होती. त्यांच्याकडचा ‘सोलर’चा ‘प्लांट’ तर पूर्ण बंद अवस्थेत पोहोचला होता. त्याच्यापासून काहीच काम होत नव्हते. जेव्हा विक्रांत यांनी या गोष्टीत लक्ष घातले, तेव्हा त्यांनी प्रथम तो प्लांट सुरु केला. त्यानंतर ‘वॉरंटी क्लेम’ करून बर्याच गोष्टी बदलण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन त्यांचा असा प्लान आहे की, सर्वच गोष्टी त्यांच्या ‘वॉरंटी क्लेम’मधून त्यांना बदलता याव्यात, असा विक्रांत यांचा प्रयत्न आहे.
आपण सर्वच जण सौरऊर्जेच्या बाबतीत जागरूक जरी असलो, तरी त्याच्या एकूणच कामाबद्दल त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, याबद्दल खूपच कमी माहिती आपल्याला असते. जर हे चित्र बदलायचे असेल, तर प्रथम लोकांना या गोष्टींबद्दलची माहिती करून देणे गरजेचे आहे. कशा पद्धतीने आपण ‘सोलर प्लांट्स’ ‘इन्स्टॉल’ करावेत, त्यांचा आपल्याला खरेच उपयोग होतो का, हे तपासून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि याची माहिती सर्वसामान्य ग्राहकांना होणे हेही गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांना याबद्दलचे शिक्षण देणे गरजेचे आहे, ही सर्वात मोठी गरज आहे. भारत हा खूप मोठा देश आहे. त्यात कितीतरी असे ‘सोलर प्लांट्स’ असतील त्यांची देखभाल करायची असेल...त्यासाठी अनेकांचे सहकार्य गरजेचे आहे आणि असे काम करणार्या अनेक कंपन्यांनी पुढे येऊन हे काम करणेही गरजेचे आहे. त्यामुळे नवीन व्यावसायिकांना या क्षेत्रात काम करण्यासाठी खूप वाव आहे आणि त्यांनी ते केले पाहिजे.
या क्षेत्रात अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे, या क्षेत्रातील ज्या काही फुकट जाणार्या काही गोष्टी आहेत, त्यांना ‘रिसायकल’ करून परत त्याच क्षेत्रात वापरता यायला हव्या. म्हणजे त्या क्षेत्रातील कचरा आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. ज्या कोणा व्यावसायिकांना या क्षेत्रात काम करायचे असेल, तर त्यांना सर्वप्रथम ग्राहकांच्या सर्व मागण्यांना न्याय देता आला पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि हेच या क्षेत्रातील नवीन व्यावसायिकांनी लक्षात घेऊन काम करावे, असा सल्ला नवीन व्यावसायिकांना विक्रांत देतात.
‘सोलर सर्व्हिसिंग’सारख्या अत्यंत नव्या, दिवसेंदिवस विकसित होणार्या क्षेत्रात काम करणारे, स्वबळावर नवीन व्यवसाय उभा करणार्या विक्रांत बनकर यांना पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.
- हर्षद वैद्य